Sunday, April 18, 2021

आयुर्वेदातील अभिनव आहार संकल्पना

 आयुर्वेदातील  अभिनव  -   

       आहार संकल्पना

आज संपूर्ण जग कोविडच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी धडपड करीत आहे. आज आपलं आरोग्य ही आपली सर्वोच्च प्राथमिकता झाली आहे. इतकी वर्ष ...ज्या आरोग्याला गृहीत धरून, आम्ही वाटेल तसं स्वच्छंदी वागत होतो.... तेच आम्ही, आता या आरोग्याला जपण्यासाठी काहीही करायला तयार आहोत. हल्ली माझ्या दवाखान्यात कोणत्याही रुग्णाचा हमखास एक प्रश्न असतो,

" मॅडम आहार कसा असावा जेणेकरून आम्हाला कोणतेही आजार  होणार नाहीत?" सोशल मिडीयाद्वारे इम्युनिटी किंवा व्याधी प्रतिकारक्षमता अबाधित ठेवणाऱ्या वेगवेगळ्या आहार/ डाएट च्या माहितीचा  दररोज रतीब असतो.' हाय प्रोटीन', 'लो कार्ब', ' फायबर रिच' , 'शुगर फ्री', क्रॕश डाएट.....असे वेगवेगळे डाएट्स आपल्याला तंदुरुस्त ठेवण्याची हमी देत असतात .पण  काटेकोर आहार आणि नियमित व्यायाम हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे का???

याशिवाय कितीतरी अशा गोष्टी आहेत,ज्यांचा आपल्या आरोग्यावर साधक-बाधक परिणाम  होत असतो . इथे आपल्याला मदत करतं ते आयुर्वेदशास्त्र. कारण आयुर्वेद हा व्याधींचा नाही तर आयुष्याचा वेद आहे .

    मुळात आहार संकल्पना - ही 'भोजन' या क्रियेशीच संबंधित आहे हा आपल्या  सगळ्यांचा गैरसमज आहे. आयुर्वेदाच्या आहार संकल्पनेचा विचार केला तर आपला  आजवर किती संकुचित विचारांचा दृष्टिकोन  होता हे स्पष्ट होईल. 

शरीराचं पोषण, वाढ करणारा - -तो आहार. ही आहाराची साधी ,सोपी व्याख्या.  बाह्य सृष्टीतून शरीर पोषणासाठी ,शरीराच्या आत जे जे काही आहरण केलं जातं ते म्हणजे आहार---ही आहाराची शास्त्रीय व्याख्या .

आता आयुर्वेदानुसार 'शरीर' म्हणजे काय?

 देह, इंद्रिये, मन व आत्मा यांचा समुदाय म्हणजे शरीर.

 देहाचा आहार म्हणजे अन्न पाणी आणि हवा.

 इंद्रियांचा  म्हणजेच कान, त्वचा, डोळे, जीभ, आणि नाक यांचा आहार  (विषय / अर्थ/ senses). म्हणजेच - शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध.

 मनाचा आहार -विचार आणि भावना.

 आत्म्याचा आहार- करुणा आणि सहसंवेदना.(compassion ).

आता आजवर, आहार म्हणजे केवळ  भोजन ही समजूत किती एकांगी आणि चुकीची  आहे हे स्पष्ट व्हायला हरकत नसावी .  या सर्वांगीण आहाराचा - अर्थातच देह,इंद्रिये ,मन आणि  आत्मा यांच्या योग्य आणि संतुलित आहाराचा आरोग्याशी अत्यंत जवळचा संबंध  आहे.आम्ही फक्त आणि फक्त भोजनाला आरोग्याशी जोडतो आणि 'चांगलंचुंगलं' खाऊनही आजार का होतात यावरुन डाॕक्टरांशी वाद घालतो. 

या लेखात आपण इंद्रियांच्या आहाराविषयी चर्चा करणार आहोत . इंद्रियांद्वारे आपण वेगवेगळी  माहिती मेंदूत साठवत असतो पण हाच इंद्रियांचा आहार आहे याबद्दल आपण पूर्णपणे  अनभिज्ञ असतो. माणसाचा जन्म होता क्षणी बाह्य वातावरणाशी त्याचा संबंध येतो - तो त्वचेच्या माध्यमातून. म्हणजेच स्पर्शनेन्द्रिय. त्यानंतर लगेच जिभेचं- रसनेन्द्रियाचं काम सुरू होतं.  मूल मोठं होतं जातं तसतसे  डोळे आणि कान सक्रीय  होऊ लागतात .म्हणजे त्या लहान बाळाच्या प्रत्यक्ष भोजनापेक्षा (दुध)  इंद्रियांच्या आहाराचं प्रमाण बरंच जास्त असतं. बाह्य वातावरणाचा जास्तीत जास्त परिणाम किंवा दुष्परिणाम होणारे शरीर घटक कोणते तर ती इंद्रिये आहेत. अविरतपणे शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हा आहार आपली इंद्रिये ग्रहण करीत असतात. अगदी झोपेत सुद्धा ही इंद्रियबुद्धी जागृत असते. 

    देहाचा आहार म्हणजे हवा, पाणी, अन्न हा मर्यादित प्रमाणात असतो. श्वासाद्वारे हवेचं ग्रहण निरंतर असलं तरी ते नियंत्रित स्वरुपात असतं पण इंद्रियांचा आहार हा अनियंत्रित आणि  अमर्यादित असतो. म्हणूनच माणसाच्या आयुष्यात इंद्रियांचं आयुष्य कमी असतं. इतर शरीर घटकांच्या तुलनेत इंद्रिये ही लवकर कमकुवत होतात. म्हणूनच उपनिषदात, वेदात "जीवेत शरदः शतम्" असं म्हटल्यानंतर,

" पश्येम शरदः शतम्  

श्रुणुयाम शरदः शतम् "

अशी प्रार्थना केलेली आहे. यातूनच इंद्रियांची योग्य जपणूक व्हावी हे अधोरेखित होतं.      भोजन घेतल्यानंतर त्यावर जाठराग्नी चे सोपस्कार होऊन पचन होत असतं ,जे आपल्याला समजतही नाही.  पण इंद्रियांद्वारे जाणता-अजाणता, आवश्यक- अनावश्यक, चांगली- वाईट, उपयुक्त -घातक अशी माहिती सतत ग्रहण केली जात असते. हल्लीच्या काळात तर या इंद्रियांचे विषय अक्षरशः शरीरावर बदाबदा कोसळत असतात. अशावेळी मन आणि बुद्धीचे त्यावर योग्य सोपस्कार आणि संस्कार  झाले नाहीत तर परिस्थिती गंभीर व्हायला वेळ लागत नाही. आपण स्वतः याबाबतीत जाणीवपूर्वक काही करतो का? अजिबात नाही. उलट लहान बाळांना-  ज्यांचं मन म्हणजे  ओल्या मातीचा गोळा असतो आणि ज्यांची बुद्धी  अद्याप प्रगत झाली नसते - - अशा बाळांना त्यांच्या  सहाव्या, सातव्या महिन्यापासून टीव्ही, व्हिडिओ दाखवायला सुरुवात करतो. बाळही ते बघताना रमून जातं आणि त्याची त्याला चटक लागते. आणि आमचं बाळ आत्तापासून कसं 'टेक्नो ' आहे हे भूषण आम्हाला वाटतं. स्वतःवर   आपण नियंत्रण ठेवतच नाही आणि कहर म्हणजे लहान बाळांना ही त्याची सवय लावतो.

    पूर्वीच्या काळी दृक्श्राव्य माध्यमं अस्तित्वात नव्हती आणि माणसाचं जगणं हे नैसर्गिक असल्याने इंद्रिये आपोआपच नियंत्रणात होती. पण आज परिस्थिती बदलली आहे .माध्यम आणि तंत्रज्ञानाचा गुलाम असल्याप्रमाणे आज आपण बुद्धी गहाण ठेवून वागतो आहोत. पण इंद्रियांच्या या अतिवापराने नेमकं घडतं काय???

 आयुर्वेदात व्याधी निर्मितीची अगदी प्राथमिक आणि सामान्य कारणं सांगताना ,अगदी पहिलं कारण सांगितलं आहे ते म्हणजे 'असात्म्यइंद्रियार्थसंयोग '. म्हणजेच - - -

असात्म्य- म्हणजे न पटणारं, सहन न होणारं, विकृत, सवय नसणारं

 इंद्रियार्थ - म्हणजे इंद्रियांच्या जाणिवा (senses) म्हणजेच शब्द ,स्पर्श, रूप, रस, गंध. आणि संयोग म्हणजे या अनावश्यक घातक विषयांचा इंद्रियांशी सतत येणारा संबंध . घातक, विकृत, अनैसर्गिक विषयांचा  इंद्रियांशी सतत संयोग होत असेल तर व्याधि निर्मितीचं ते अत्यंत महत्त्वाचं कारण असतं. आयुर्वेद शिकताना दुसऱ्याच वर्षी हा संदर्भ आमच्या समोर येतो.  विद्यार्थीदशेत गंमत वाटायची की आजारी पडण्यासाठी अशी  सुद्धा कारणं असू शकतात? पण आज   जेव्हा उत्तम संतुलित भोजन, नियमित व्यायाम आणि सगळ्या तपासण्यांमध्ये 'क्लिनचीट' मिळालेल्या व्यक्तीही आजारी पडताना दिसतात तेव्हा 'असात्म्येंद्रियार्थसंयोग' खुणावू लागतो. कारण इंद्रियांच्या आहाराचं आपण कधीच नियोजन केलं नसतं आणि तो ग्रहण करताना आपल्याला नीरक्षीरविवेकही नसतो .आज जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोविड महामारीला प्रतिकार करताना नेमका हा 'असात्म्येंद्रियार्थसंयोग'  कसा आणि किती कारणीभूत ठरतो आहे हे लक्षात आलंच असेल. शरीराला व्याधींपासून सुरक्षित ठेवण्यासाठी नाक, त्वचा आणि जिभेचा आपापल्या विषयांशी/ अर्थांंशी अकारण,अवाजवी,  अजाणता संयोग व्हायला नको ही कोविडने जगभराला शिकवण दिली जी आयुर्वेदशास्त्रात पाच हजार वर्षांपूर्वी ग्रंथात लिहून ठेवली आहे. तसंच कानाने व डोळ्याने अनावश्यक ,अतिरंजित ,असत्य आणि अति प्रमाणात माहिती ऐकणं, वाचणं, ती दुसऱ्याला सांगणं हे मानसिक आजाराचं प्राथमिक कारण आहे. आज कान आणि डोळ्यांवर अतिरेकी माहितीचा ताण आल्यामुळे नैराश्यात जाणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसागणिक वाढते आहे ही वस्तुस्थिती आहे. हे सगळं किती भयावह आहे. जे उपाय अत्यंत साधे, सोपे, आपल्या आवाक्यातले आणि निःशुल्क आहेत ते पाळण्याचंही भान आपल्याला राहिलेलं नाही. 

रोज आपण डोळ्यांनी आणि कानांनी किती अनावश्यक आणि घातक माहिती मेंदूत साठवत असतो याचा हिशोब करण्याची  वेळ आता आलीय.रोजच्या जेवणाचा मेन्यू जसा ठरवला जातो तसंच काय आणि किती बघायचं,ऐकायचं हे ठरवणं आपल्याच हातात आहे.या मेन्यूत सकारात्मक, ज्ञानवर्धक,आनंददायक माहितीचीच निवड केली तर त्या आहारानं नक्कीच शरीराचं पोषण होईल.

जिव्हालौल्य तर आपल्या जिव्हाळ्याचा विषय.कोविडमुळे बाहेरच्या खाण्यापिण्यावर बंधन  आलंय ही तर इष्टापत्तीच आहे.जिभेचे चोचले आणि गरज यातला फरक समजून रिजनल,सीझनल,आणि ओरिजीनल खाद्यपदार्थ खाण्याची सवय नक्कीच आरोग्यपूर्ण ठरेल यात शंका नाही.

कृत्रिम गंध जितके टाळता येतील तेवढं उत्तम .डिओ, रुम फ्रेशनर्स,उदबत्या,कॉस्मेटिक्स इ.पासून दूरच राहणं योग्य.तसंही मास्क हा एक उत्तम पर्याय आहेच.

जिथे गरज नाही तिथे स्पर्श करायचा नाही हे ही कोविडनंच शिकवलंय आणि ही सवय नेहमीच असावी.तसंही ऊठसूठ 'शेकहँड ' आणि 'हग' करण्याची आपली संस्कृती नाहीच.

थोडक्यात काय,इंद्रियांचा योग्य 'उपयोग' करावा.'उपभोगासाठी' त्यांचा 'वापर' होऊ नये - इतकं सोपं पण तितकंच अवघड तत्त्व आहे हे.

     आपल्या प्राचीन परंतु समृद्ध अशा आयुर्वेद शास्त्राने दिलेले इशारे अप्रगत, अवैज्ञानिक, जुनेपुराणे ठरवून तंत्रज्ञानाच्या आहारी जाणं कितपत संयुक्तिक आहे याचा आता तरी गंभीरपणे विचार होणं आवश्यक आहे. आज कोविडमुळे आधुनिक वैद्यकीय शास्त्रालाही कोडी पडली आहेत.अनेक घटनांचा कार्यकारणभाव वैज्ञानिक कसोट्यांवर बसवता येत नाहीय.अशावेळी विज्ञानाच्या पलिकडचं सत्य आयुर्वेदाच्या मदतीनं नक्कीच गवसू शकतं. आयुर्वेदात अनेक अमूल्य असे सिद्धांत आहेत ज्यामुळे समाज निरोगी होऊ शकतो. पण प्रश्न विश्वासाचा आहे ,प्रश्न समाज मान्यतेचा आहे , प्रश्न नीरक्षीर विवेकाचा आहे.

इंद्रियांच्या अतिरेकी आहाराचं नियोजन प्रत्येकानं 'मनन', 'चिंतन', 'आकलन' आणि 'अवलंबन' या पायऱ्यांनी केलं तर लसीकरणाइतकाच फायदा होईल याची खात्री आहे.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

डाॕ साधना कुळकर्णी,अकोला

9422939510

38 comments:

  1. खुप मस्त माहिती आणी लिखाण..👏👏

    ReplyDelete
  2. महत्वपूर्ण माहिती !

    ReplyDelete
  3. Inspiring Knowledge as well as writing!!

    ReplyDelete
  4. अतिशय उपयोगी
    आयुर्वेदोऽमृतानांश्रेष्ठः |

    ReplyDelete
  5. खूप सुंदर माहिती
    पाच हजार वर्ष पासून आपल्या संस्कृतीत ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याच आपण पाश्चात्य आणि पौर्वात्य कडून ऐकून अंमलात आणतो आहोत
    आपलंच ज्ञान आपल्यालाच सांगतात आहे
    खूप छान लिहिले आहेस

    ReplyDelete
  6. केवळ भोजन म्हणजे आहार नव्हे
    अगदी खरंय
    योग्य ,मार्गदर्शक लेख

    ReplyDelete
  7. माझा यावर पूर्ण विश्वास आहे. आपल्यासारखे डाॅक्टर याचा प्रसार करताहेत हे स्तुत्य, आशादायक आहे

    ReplyDelete
  8. Very informative..Have never thought this way! Will definitely try to implement this.

    Neha Deshpande

    ReplyDelete
  9. सुंदर विश्लेषण व सटीक लेख
    डाॅ आनंद चतुर्वेदी

    ReplyDelete
  10. या कोविड काळात अत्यंत उपयुक्त अशी माहिती लिहिली आहे,सर्वांनी तीचा उपयोग आपल्या दिनचर्येत करावा,सुंदर विश्लेषण

    ReplyDelete
  11. सदवर्त्त पालनच कोविद पासून मुक्तिचा मार्ग होवू शकतो। अतिशय सुन्दर विवेचन आहे मैडम। अभिनन्दन।

    ReplyDelete
  12. या कोविड काळात आहाराविषयीची उपयुक्त माहिती व विश्लेषण,अशीच विविध माहिती मिळत असावी

    ReplyDelete
  13. डॉ श्यामकांत कहाते, पूणे

    ReplyDelete
  14. खूप सुंदर माहिती व लिखाण 👌👌

    ReplyDelete
  15. ओघवती शैली , विषय उत्तम मांडलाय 👌👌

    ReplyDelete
  16. सर्वान साठी उपयुक्त माहिती दिली आहे.सुंदर वर्णन.👌👍

    ReplyDelete
  17. इंद्रिय,मन,आत्मा ...ह्यांच्या आहारावर खुप उत्तम दृष्टिक्षेप टाकला आहे.
    कारण फक्त जीभेचा विचार करून देहासाठी आहार पोटात टाकला जातो.
    मनोकायिक आजार वाढत असताना,हा लेख महत्वपूर्ण.

    ReplyDelete
  18. अतिशय महत्त्वपूर्ण लिहलतं खाण्यासोबतच ,इंद्रिय ,आत्मा, मनहेही कसे महत्वाचे आहेत हे छान सांगितलत. आरोग्यम धनसंपदा!

    ReplyDelete
  19. खूपच महत्वपूर्ण👌👍

    ReplyDelete
  20. आहाराचे व्यापक स्वरूप विशद केले आहे.आयुर्वेदिक दृष्टीकोन नव्याने मांडला आहे.

    ReplyDelete
  21. फारच सुंदर, पंच ज्ञानेन्द्रियांच्या आहाराचा अतियोग हिनयोग आणि मित्थायोग.रोगास कारणीभुत आहे.केवळ खाद्यपदार्थच नाहीत. मनाची स्थिती पण विचारांत घेणे आवष्यक आहे. सुंदर विवेचन.

    ReplyDelete
  22. Truly an eye opener. Great writing. You made us understand the basics, the foundation and true value of Ayurveda, in simple language with the help of day to day examples.
    As usual great content put up in great words. 🙏🙏
    Madhavi Sahaje.

    ReplyDelete
  23. देह, इंद्रिये, मन व आत्मा यांचा समुदाय म्हणजे शरीर.हे सांगून डॉ. साधना ताईंनी प्रत्येक गोष्टीचं सुंदर विश्लेषण मांडले आहे. खूप खूप सुंदर लेख आहे. -- मधुरा धारगळकर

    ReplyDelete
  24. अतिशय समाजोपयोगी उपक्रमाची सुरुवात .
    प्रज्ञापराध हा विषय सध्याच्या काळात फार महत्त्वाचा आहे.

    ReplyDelete
  25. *मनन, चिंतन, आकलन, अवलंबन...* अशी छान माहिती देणारा तुमचा हा लेख केवळ महत्त्वपूर्णच नाही तर जपून ठेवावा असा आहे. मी माझ्या संपर्कातील सर्वांना (link) share करतोय. अर्थात तुमची परवानगी गृहित धरून... *"आहार हेच औषध"* ह्या माझ्याजवळील पुस्तकाची आठवण झाली.
    लिहित राहा...प्रो अभय जोशी

    ReplyDelete
  26. Very thought provoking article..let's try to implement in our day to day life!!

    ReplyDelete
  27. सहजसुलभ विषय मांडणी आणि सत्व द्योतक चिंतन. मनापासून अभिनंदन 👍🙏

    ReplyDelete
  28. सुंदर मार्गदर्शन.एकदा वाचायलाच हवं.
    दीपक देशपांडे.

    ReplyDelete
  29. सुंदर मार्गदर्शन.एकदा वाचायलाच हवं.
    दीपक देशपांडे.

    ReplyDelete
  30. 'असात्म्यइंद्रियार्थ संयोग 'किती सोप्या भाषेत छान समजावून सांगितलंस ग ! महान तत्वज्ञान मागे टाकून जनता कुठल्या बाह्य भुलाव्यात भुलली आहे खरेतर.
    बाकी पंच ज्ञानेंद्रियांचा आहार ही वास्तविकता खूप भावली.छान आहे लेख.
    वीणा मालशे

    ReplyDelete
  31. खूप महत्वाचे मुद्दे उलगडले आणि बरच काही गावसलय तुमच्या लेखात👍🏼
    Thank you for sharing
    मीनल सोमण

    ReplyDelete
  32. खूप महत्त्वाचा लेख.
    प्रशांत असनारे

    ReplyDelete
  33. khup sundar vivechan kele ahe madam . detailing pan khup chan
    Sunita Niwane

    ReplyDelete
  34. उत्कृष्ठ विश्लेषण,सर्वांसाठी दिशादर्शक🙏

    ReplyDelete

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...