Wednesday, April 14, 2021

 थोडंसं खटकलेलं.......

 मी रोज सकाळी ६ वाजता फिरायला जात असते. माझ्या फिरण्याच्या  रस्त्यावर श्री गजाननमहाराजांचं मंदिर आहे. तिथे दर्शनासाठी मी  हमखास थांबतेच. तिथे ठराविक भक्त मंडळी आरतीसाठी जमली असतात . तीन मध्यमवयीन महिला तिथे न चुकता असतातच. त्यापैकी एक महिला खूप व्यवस्थित तयार झालेली असते.  रोज नवीन साडी, मॅचिंग बांगड्या,मॕचिंग हेअर क्लिप, हलकासा मेकअप. सगळं अगदी नीटनेटकं आणि टापटीप.  ती महिला मारवाडी असावी असं समजून मी तिचं अग्रवाल भाभी हे नावही ठेवलेलं आहे. तिच्या दोघी मैत्रिणी अगदी साध्या असतात.  त्यांची खूप घट्ट मैत्री आहे असा माझा अंदाज आहे कारण   गेल्या वर्षभरापासून मी  रोज त्यांना बघतेय आणि  त्यांचे काही ना काही संवाद कानावर  पडत असतात . मला त्यांच्या मैत्रीचं  खूप अप्रूप वाटतं. दुसरं म्हणजे अग्रवाल भाभींचं प्रचंड कौतुक वाटतं. इतक्या पहाटे इतकं व्यवस्थित तयार होऊन निघणं, सात जन्मातही  माझ्याकडून होणार नाही. किंबहुना अग्रवाल भाभींकडे बघताना मला माझ्या 'अवताराची' प्रकर्षानं जाणीव होते. सकाळी उठल्यावर तोंडावर मारलेलं पाणी, केसांवरून फिरवलेला हात- (कंगवा नाही), आणि समोर दिसणारा कोणताही कुर्ता चढवला की माझी तयारी पूर्ण होते. नाही म्हणायला, अधून मधून, चांगलं तयार होऊन फिरायला जाण्याचे संकल्प असतातही माझे.... पण सकाळी ते रीतसर ढासळतातच. असो. तर रोज भेटूनही, आमची ओळख फक्त 'स्माईल' पर्यंतच होती कारण मी नेहमी घाईत. आणि त्या तिघीजणी मस्त निवांत.

     परवा मात्र अग्रवाल भाभींची  साडी मला फारच आवडली. न राहवून मी त्यांच्याजवळ जाऊन म्हटलं ,

  'भाभी मी रोज तुमच्या कडे बघते. खरंच, खूप सुरेख साड्या असतात तुमच्या .आणि तुम्ही किती व्यवस्थित तयार झालेल्या  असता. मस्त वाटतं तुम्हाला बघून.'

     मी बोलत होते आणि माझ्या शब्दागणिक अग्रवाल भाभींचा चेहरा आनंदाने फुलत चालला होता. माझ्या बोलण्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांनी ओठांची हालचाल केली तोच त्यांच्या दोन मैत्रिणी  हसत हसत म्हणाल्या,

 ' तिला काय काम आहेत घरी? नुसती बसली असते. इकडची काडी तिकडेही करत नाही. सुना आहेत कामं करायला. रात्रीच, उद्याची साडी , बांगड्या, क्लिप, पर्स काढून ठेवते. तुमच्या माझ्यासारखी मरमर कुठे  करावी लागते तिला घरात?'

  माझ्या रोजच्या  अवतारावरून 'मरमर' हा शब्द त्यांना सुचला असणार नक्कीच .असो.पण  त्या बोलत असतांना अग्रवाल भाभींच्या चेहऱ्यावरुन, आनंद अक्षरशः झरझर उतरतांना मी बघितला.

यावर मी फक्त हसले आणि  माझ्या दिशेने चालू लागले . पण  भाभींचा तो उतरलेला चेहेरा माझ्या  डोळ्यासमोरुन जाईना.    मी त्यांना तशी परिचित नव्हते. त्यांच्या  घरगुती बाबींमधे मला काडीचाही रस नव्हता.माझ्या अगदीच वरवरच्या पण अस्सल प्रतिक्रियेवर त्या दोन्ही मैत्रिणींनी फक्त दुजोरा दिला असता तर काय हरकत होती? 

   जवळच्या-मैत्रिणींमध्ये चिडवणं, थट्टा करणं हे अपेक्षित असतं अणि त्या मैत्रिणी गंमतीनंच ते बोलल्या असाव्यात .भाभींनीही ते बोलणं मजेतच घेतलं असणार.

  पण  एखाद्याला सहजपणे ,अगदी चिमूटभर आनंद मिळत असेल तर त्यावर विरजण घातलंच पाहिजे का?असं विरजण घेऊन फिरणार्या भरपूर व्यक्ती आपल्या आसपास असतात मात्र त्याची जाणीव त्यांना स्वतःलाही नसते. आपण करत नसलेली  एखादी  चांगली कृती दुसरा कुणी करत असेल तर त्याचं कौतुक  करण्याची पद्धतच आपल्यात नाही.उलट ती चांगली कृती करण्यासाठी दुसऱ्या कडे कशी अनुकूल परिस्थिती आहे आणि त्याने ती चांगली कृती करणं म्हणजे 'फार काही विशेष नाही'...असं बेधडक म्हणताना आम्ही काहीही विचार करत नाही. 

आम्हा प्राध्यापकांची हल्ली बरीच प्रशिक्षणं होत असतात.त्यात स्वतःचं आणि सहकारी प्राध्यापकांचं मूल्यमापन करण्याचे अनेक प्रसंग येतात.अशावेळी बोलतांना सुरुवातीला सकारात्मकच बाजू मांडायची व नंतर नकारात्मक बाजूचं मूल्यमापन करायचं अशा कडक सूचना आम्हाला असतात.म्हणजे कोणत्याही व्यक्तीबद्दल व्यक्त होताना आधी सकारात्मक चष्मा लावण्याचा तो धडा असतो.दुर्दैवानं समाजात तसं घडत नाही आणि  

  त्या दिवशी अग्रवाल भाभींचा उतरलेला चेहेरा बघून मला ही वृत्ती प्रकर्षाने  खटकली , एवढंच.........

6 comments:

  1. फार छान लेख आहे.

    ReplyDelete
  2. खरय्, कुणाचही मनापासून कौतुक करण्याकरिता मनाला ती सवय असावी लागते, लावावी लागतेय्. आणि आपल्याकडे दुर्देवाने ती जवळपास नाहीच. त्यात काय विशेष? असाच भाव जास्त असतो. आज छान शिकायला मिळाल. धन्यवाद, मॅडम.

    ReplyDelete
  3. कुणाच कौतुक करायला लागणार मनाचा निर्मळपणा, मोठेपणा मुळातच आपल्या कडे कमीच आहे आणि कुणाला टोचून बोलण तर फारच आनंदाचे

    ReplyDelete
  4. Exceptionally patient hearing.

    Peripheral vision of everything that is happening around.

    Non judgemental observation.

    Back to business approach.

    Madam, this is what I observed from the above narrative.
    I won't elaborate on the reactions of the other two ladies. You have written nicely about it.

    This type of natural and candid narrations make a wonderful reading.
    Nitin baxi

    ReplyDelete
  5. खूप छान निरीक्षण। तुमचा मुद्दा एकदम चांगल्या प्रकारे मांडला।घटना रुटीनचीच। पण त्याचे analysis एकदम परफेक्ट।विरजण न घालण्या साठी प्रगल्भता, मोठं मन आणि appriciation power हवी।हा दुर्मिळ गुण आहे। सर्वांमध्ये असतोच असे नाही। श्री श्री रविशंकर म्हणतात appriciation is divine quality।ती सर्वांमध्ये असेल असे नाही। किंबहुना नसतेच। तुमच्या जवळ ती आहे। 👍👍
    मनिषा

    ReplyDelete

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...