"आई एक नाव असतं.
घरातल्या घरात,एक गजबजलेलं गाव असतं."फ.मु.शिंदेंच्या या दोन ओळीतच आख्खी "आई" सामावली आहे-
तुमची ,माझी,सगळ्यांचीच.
आयुष्यभर अनेक निरर्थक गोष्टींच्या मागे पळताना आईप्रती साधी कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज आम्हाला भासत नाही इतकं त्या माऊलीला गृहीत धरल्या जातं.
मला मिळालीय संधी.....
तिच्या वाढदिवसाची........
बघतेय,आभाळभर भावना चिमूटभर शब्दात मांडता येतात का????
"अगं, लवकर इकडे ये"..... आईची भल्या सकाळी आलेली हाक ऐकून मी ताड्कन उठून बसले. क्षणभर छातीत धस्स झालं. धावत जाऊन बघितलं तर आई खिडकीसमोर उभी.
"अगं बघ. सूर्योदय किती छान दिसतोय. तो लालभडक गोळा हळूहळू वर येतोय ना,ते बघतांना माझी नजर हटतच नाहीये "- - तिचा उत्तेजित आणि आनंदित स्वर .
"आई काय हे? पहिल्यांदा बघतोय का आपण सूर्योदय ?" - - झोप मोडल्यामुळे माझा चिडका आणि रागीट स्वर. आणि मी तणतणत परत पलंगावर.
रोजचा सूर्योदय,सूर्यास्त, रोज झाडावर येणारे पक्षी, रोज फुलणारी फुलं- - ही नक्कीच ऊर्जा देणारी आणि सकारात्मकता जोपासणारी निसर्गाची रूपं असली तरी त्यांना बघून लहान मुलांसारखं उत्तेजित होणं आणि त्याहीपुढे जाऊन फोनवर त्याचं वर्णन दुसऱ्याला ऐकवणं - ही वृत्ती नेमकी कोणत्या वयात असावी?
विश्वास बसणार नाही पण नव्वदाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या माझ्या आईत हे एक लहान आनंदी मूल कायम बागडत असतं.
आणि तिच्यातल्या त्या लहान बालकाच्या उत्साहावर विरजण घालण्यासाठी आम्ही तिघीही "पोक्त" वयाच्या तिच्या मुली अगदी सज्ज असतो.
पण तिनं असं कधीच केलं नाही.
आमच्या लहानपणी सगळ्यात मौल्यवान असं तिनं आम्हाला काही दिलं असेल तर ते म्हणजे मोकळे श्वास घेण्याचं स्वातंत्र्य.......
सूचनांचा भडिमार नाही किंवा शिस्तीचा बडगा नाही...
संस्कारांचा जाणीवपूर्वक अतिरेक नाही किंवा उपदेशाचे डोस नाहीत ...
एक बंधनमुक्त बालपण तिनं आम्हाला दिलं.
आजही जगतांना तो मोकळेपणा आम्हाला बळ देतोय .
मी माझ्या मुलांना देऊ शकले असला मोकळा श्वास ???नाहीच बहुतेक .
हात धरून जाणीवपूर्वक तसं तिनं आम्हाला काहीच शिकवलं नाही.
मात्र तिच्या जगण्यातून कितीतरी महत्त्वाचे धडे आम्हाला मिळाले आणि अजूनही मिळताहेत .पण नेहमीप्रमाणे "आई "जशी गृहीत धरली जाते तसे कितीतरी धडे हे गृहीतच धरले गेले.......
काही धडे मनापासून अभ्यासले गेले ......
काही धडे रक्तात मुरले...... बरेचसे आचरणातही आले .....
"आई "नावाच्या पाठशाळेला कितीतरी काळ गंभीरपणे घेतलंच नाही कधी.
हल्ली तर.........
" आई तुला कसं काहीच समजत नाही???"....
असं म्हणून तिचीच शाळा आम्ही सगळेच घेत असतो. ती सुद्धा शहाण्या विद्यार्थ्याप्रमाणे आमचं ज्ञानामृत शांतपणे पचवते.
१९३१चा तिचा जन्म. छिंदवाडा गावातलं लहानपण, लग्नानंतरचं मॕट्रिक ते पीएचडी पर्यंत शिक्षण ,एकत्र कुटुंब , सोवळंओवळं,प्राध्यापिकेची नोकरी ,आम्हा तिघींची शिक्षणं, तिघींची लग्नं,बाबांचं दीर्घ आजारपण,नातवंडं, त्यांची लग्नं,नागपूरहून पुण्याला आणि पुण्याहून नाशिकला स्थलांतर आणि आताचं हे तंत्र युगातलं यांत्रिक जगणं..........ही सगळी स्थित्यंतरं, सुखदुःखाचे चढउतार अनुभवून,सोसून,पचवून तिच्यातलं ते आनंदाचं झाड अजूनही तेवढंच हिरवं आणि टवटवीत कसं आहे हे मला अजूनही उमगलेलं नाही.
अंगभूत शांतता ,आनंदी स्वभाव आणि स्थिरचित्त वृत्ती हे तिचे "इनबिल्ट अॕप्स" मला डाऊनलोड करता आले असते तर????
आई- -आज तुझा एकोणनव्वदावा वाढदिवस .
तुला या वाढदिवसाला काही द्यावं असं माझ्याकडे तरी काहीच नाही.
उलट मीच तुला काहीतरी मागतेय.......
तुझं रक्त तर माझ्या नसानसात आहेच पण.....
तुझ्या शरीरातल्या रक्तासोबत वाहणारा तो निखळ आनंद .....
तो माझ्या नावावर करुन दे ना एकदाचा.
तुझ्या कपाटात,तुझ्या सामानात मी खूप शोधली ती अक्षय आनंदाची कुपी........
सापडली नाही कधीच .
हल्ली मला खूप गरज भासतेय त्या आनंदाच्या कुपीची...
आजकालच्या आयांसारखा आटापिटा कर,काहीही कर पण माझी मागणी पूर्ण करच.
आणि हो. हे करतांना तुझ्यातलं ते हिरवं आनंदाचं झाड असंच बहरलेलं राहू दे.
नेहमीसाठीच.


Inbuilt apps......
ReplyDeleteविलक्षण कल्पना. मी आता 50 शीत आहे. माझी आज्जी (आईची आई) same to same ह्या वर्णनात बसते.
मला वाटतं, आपण आई च्याच रक्तामासाने बनल्यामुळे जमीन जरी तीच असली तरी भौतिक सुख आणि लौकीक समाधानाच्या मागे धावताना त्याचा कस कमी होत असावा. म्हणुन आपण त्यांच्यासारखे चिरतरुण रहु शकत नसु.
क्या बात है..आनंदाची कुपी आईच्या कपाटात सापडत नाही ..वा मस्तच लेख
ReplyDeleteसोनल
So true!!! We do need such attitude.especially in these times. I always love this thing about Aaji.. specially her laughter!! Its so hard to find such innocence in this world..even if we attain half of her nature, our life will become so easy!!!
ReplyDeleteकिती सुंदर कल्पना आणि तितकीच सुंदर लिखाणाची शैली !
ReplyDeleteमी बघितलं नाहीयं त्यांना पण डोळ्यासमोर मूर्ती साकार झाली !
"आई" खरंच जगातली सर्वात सुंदर आणि अमूल्य निर्मिती आहे विधात्याची ! खूप छान भावना व्यक्त केल्यात मॅडम ! 🙏🏻
खूप छान लिहिलंय मॅडम
ReplyDeleteआई ह्या शब्दाचा विस्तार आपला ईश्वर असा करता येईल .
सर्व विश्व व्यापेल असे सामर्थ्य या दोन अक्षरात आहे !!
Khup sundar madam.
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteअप्रतिम शब्दचित्र,मनाला भिडणारे सूत्रण,मनातल्या भावनांना समर्पक शब्दांचे कोंदण
ReplyDeleteअगदी यथार्थ वर्णन आईचे। अप्रतिम शब्दांकन। अगदी मनातले। ---------माधवी सहजे
ReplyDeleteफार फार आवडलं. आमच्या आजी पण त्यांचीच ताई. तशाच होत्या त्या पण. कुमुद आजी हसतात तेव्हा त्यांचीच आठवण येते. कुमुद आजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार
ReplyDeleteगुलु,तुमची ती आई आहे आणि माझी मासी, म्हणजे आई सारखी आई ,तिच्यातला आनंदाचा झरा अनुवांशिकतेने आपल्यात असावा आणि आपल्या कडून तो पुढे जावा।हा एवढा गुण जरी आपण अंगी बाणला तर आपलेही आयुष्य आनंदाचे झाड होइल,
ReplyDeleteमावशी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आम्हां दोघांन कडुन, आणि नमस्कार
आई🙏👌👍
ReplyDeleteअप्रतिम, यथार्थ वर्णन
ReplyDeleteआईकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा हवा हा संदेश यातुन मिळतो.समाजात आईला घालून पाडून बोलणारे, प्रसंगी घराबाहेर काढणारे खूप आहेत. त्यांनी यापासून काही बोध घ्यावा.
लेखिकेच्या आईवरील प्रेमाला,आदराला,भक्तीला सलाम
खूप सुंदर
ReplyDeleteभावनात्मक
आईला वंदन
Tumhi nashibwan aahat aashya aaichya poti janmalat...shikleli aani chirtarun rahnari aai nashibane labhate
ReplyDeleteअप्रतिम.
ReplyDeleteलिखानातुनच आई अगदी डोळ्यापुढे साकारली,
ReplyDeleteशब्दांनी मन भरुन आले.कलामन असलेल्या आईनां नमस्कार ।
👌🙏🌹☑️
ReplyDeleteMastach likhan
ReplyDeleteजिवेत शरद: शतम् काकु ! आई ही अशीच तनामनात रुजलेली ,तिच्य़ा अवती भोवतीच आपली सर्व जीवनगाथा असते,चालतं बोलतं विद्यापीठच जणु.तिचं लेकरांवरचं प्रेम हे कोणत्याही वय़ात तसच भाबडं आणि निरपेक्ष असते.
DeleteKhup chhan, nicely written.
ReplyDeleteह्यापेक्षा अधिक योग्य आईचं अभिष्टचिंतन असू शकत नाही. खूप सुंदर, अगदी यथार्थ !
ReplyDeleteखरंच माझी आई सुद्धा खूप छान आहे ,खूप सुंदर आहे आणि माझ्यासाठी तर ती माझा कल्पतरु आहे.. 🙏 खूप छान लिहिले मॅडम
ReplyDeleteखरंच माझी आई सुद्धा खूप छान आहे ,खूप सुंदर आहे आणि माझ्यासाठी तर ती माझा कल्पतरु आहे.. 🙏 खूप छान लिहिले मॅडम
ReplyDeleteआपल्या पिढी ने अनुभवले त्यापेक्षा कितीतरी स्थित्यंतरे आपल्या वरच्या पिढीने अनुभवले आहेत, ती स्विकारुन,अंगीकरून आनंदी राहणे, आपल्यातील लहान मुलं जपणे.... वाह वाह!!!! लिखाण अप्रतिम मॅडम.... शब्दांची मांडणी 👌👌. आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा व नमस्कार🙏🙏 आरोग्यपूर्ण दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🙏
ReplyDeleteमाझं गावही असंच होतं काहीसं.. छान लिहिलंय आणखी असे प्रसंग, अनुभव वाचायला आवडले असते
ReplyDelete