माझ्या भावविश्वाला आणि विचारांना समृद्ध करणाऱ्या 'पुलसाहित्याला' कोटी कोटी प्रणाम!!!
पुलंच्या नेमक्या कोणत्या साहित्याची आज उजळणी करायची......हा माझ्या समोर गहन प्रश्न .............
विनोदी की व्यक्तीचित्रण की वैचारिक ??
पुलंच्या बालपणातच जाऊ या आपण....
लहानपणी शाळेत असताना .... तुमच्या आमच्या मनात जे काही विचार यायचे ना,अगदी तसेच ........
पण शब्द मात्र पुलंचे.........मिष्किल, खोडकर आणि व्रात्य.
हसवणूक पुस्तकातील .....
बिगरी ते मॕट्रिक......
माझ्या शालेय जीवनात गणित, भाषा, इतिहास, भूगोल, ड्रॉइंग आणि व्यायाम हे षड्रिपू. त्यातला गणित हा बलाढ्य, पण मला सगळे सारखे होते. मी यापैकी एकाही विषयात गचकलो नाही, पण कोणाशीही मैत्री जमली नाही. एखाद्या दुबळ्या राष्ट्राने सर्वांशी मित्रभाव ठेवून असावे ,तसा राहिलो. पण ह्या सार्या विषयांची माझ्या बालपणाला वाळवी लागली होती. रात्रंदिवस ती माझे बाल्य पोखरीत होती. मी पाढे धडाधड म्हणत असे ,पण घाबरून. त्यातल्या तेरा,स"तरा, एकोणीस,तेवीस आणि एकोणतीस या पाढ्यांना मी आजही भितो. त्या संकटातून सुटत सुटत विसाच्या किंवा तिसाच्या पाढ्यावर आलो की आपल्या पोटात एक चिमुकले भांडे आहे, आणि त्यात जीव नावाची वस्तू पडल्यावर गार वाटते, याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे .मॅट्रिक नावाच्या जिवावरच्या दुखण्यातून उठल्यानंतर पुन्हा माझा कधीही या तेरा,सतरा,तेवीस,एकोणीसशी संबंध आला नाही. पाऊणकी, सवायकी, औटकी यातली प्रत्येक गतजन्मीची चेटकी आहे यावर माझा नितांत विश्वास बसायचा.चेटक्या लहान पोरांना पळवतात म्हणे. ह्या चेटक्यांनी माझे बाल्य पळवले.
आम्हाला डोक्याबरोबर डोळे बिघडवणार्या बारिक टायपात छापलेले गोखल्यांचे अंकगणित असे.इतके कुरुप पुस्तक त्यानंतर माझ्या पाहण्यात नाही.गणित वाले गोखले हेच गोपाळ कृष्ण गोखले हे कळल्यावर पुढच्या सर्व पिढ्या त्यांना सोडून गांधींच्या मागे का गेल्या ,हे गणित मला अचानक सुटले."........
हसवणूक पुस्तकातील शब्द न् शब्द वाचकांना विनोदाच्या झोक्यावर अलवारपणे झुलवत ठेवतो आणि मनावरचं मळभ कधी नाहीसं होतं हे कळतही नाही.
हीच पुलंची शैली महान व्यक्तींचं वर्णन करतेवेळी अचूक विश्लेषणात्मक होते - तेही साध्या सहज शब्दात .
एक शून्य या पुस्तकात गांधीजींबद्दल ते लिहीतात.......
"गांधीजींच्या लेखी एखादा वैज्ञानिक आणि केवळ अंगमेहनत करणारा भंगी ही दोन टोके नव्हती. समाज पुरुषाच्या शरीरातील समान महत्त्वाची घटके होती .शौचकूप गलीच्छ झाल्यावर मायक्रोस्कोप ऐवजी झाडू हवा आणि मलरोग तपासायला मायक्रोस्कोप वापरता यायला हवा. त्या त्या वेळी ती ती कामे समान महत्त्वाची. म्हणूनच गांधींनी लेखणी,टकळी आणि झाडू एकाच तोलाने वापरला .गांधीजी खरे कर्मयोगी होते. प्रार्थनेची जागा आणि शौचाचा संडास या दोन्ही स्थानांविषयी त्यांनी तितक्याच उत्कटतेनं विचार केला."
गांधीजींच्या स्वभाववैशिष्ट्याविषयी लिहिताना ,पुलंनी कुठेही जडपणा येऊ न देता,रंजकशैलीत गांधीजी उभे केले आहेत.पुलंच्या लेखामुळे गांधीजींच्या साहित्याकडे वळणारी बरीच मंडळी आहेत.
पुलंची निरीक्षण शक्ती अफाट तर आहेच पण ते निरीक्षण खुसखुशीत ढंगानं मांडण्याची सिद्धी तर अलौकिकच आहे.
"पानवाला" या लेखात ते लिहितात...............
" महात्माजींचे उघडया अंगाचे फोटो कुठेही दिसतात परंतु नेहरू सदरा घालून ,गांधी टोपी घातलेले गांधी अजूनही आमच्या पानवाल्यानेच जतन करून ठेवले आहेत .गांधी जवाहरलालजींच्या मागे शिवाजी महाराज ,राणा प्रताप,कानात लांब इयरिंग्ज आणि लांब बाह्यांचे पोलके घातलेल्या इ.स.एकोणीसशे सोळातल्या सरोजिनीदेवी - -यांच्यापुढे मारुती आणि तोसुद्धा छाती फाडून आतला रामपंचायतनाचा सीन दाखवणारा!!इतिहास ,राजकारण ,धर्मकारण यांचा इतका आटोपशीर आविष्कार !! अजून सूर्योदयाचा देखावा तर विचारायलाच नको.आकाशात विमान आहे ,विमानातून बाहेर डोकावणारा व डोळ्यांपेक्षा रुंद काळा चष्मा लावलेला पायलट आहे .पुलावर आगगाडी आहे .पुलाखाली गलबत आहे ,गलबताखाली खाडी आहे .खाडीत कमळे आहेत.खाडीच्या बाजूला राजवाडा आहे .त्याच्या कमानीवर 'वेलकम' असा बोर्ड आहे .राजवाड्यासमोर बाग आहे .बागेत भगवान श्रीकृष्ण मुरली वाजवतो आहे आणि राधाबाला मुग्ध होऊन आगगाडीकडे पहात आहे!!! स्थल,काल,विषय - कसल्याही जुलमी मर्यादा न मानणारे हे कलेचे प्रात्यक्षिक फक्त पानवाल्याच्याच काचेवर दिसू शकते!"
अशी पुलंची नर्मविनोदी शैली आणि त्यामुळे अजरामर झालेल्या असंख्य व्यक्तिरेखा.
वुडहाऊस हे पुलंचं दैवत .वुडहाऊस बद्दल लिहिताना ते कमालीचे हळवेही होतात.
"१६फेब्रु.१९७५.सकाळच्या गाडीने पुण्याहून मुंबईला जायला निघालो होतो.वर्षानुवर्षे वुडहाऊस हा माझा प्रवासातला सोबती आहे .त्याची पुस्तके शिळी व्हायलाच तयार नाहीत .माझ्या प्रवासी बॕगेत इतर कोणतीही पुस्तके असली तरी वुडहाऊस हा हवाच.तेवढ्यात दाराच्या फटीतून 'सकाळ' सरकला.पहिल्या पानावर वुडहाऊसच्या निधनाची बातमी.एका हातात कधीही न मरणारा वुडहाऊस आणि दुसऱ्या हातात ९४व्या वर्षी वुडहाऊस मरण पावल्याची बातमी सांगणारा 'सकाळ'.त्या क्षणी मला वुडहाऊसच्याच एका उद्गाराची आठवण झाली .'लेओनारा' ही त्याची अत्यंत लाडकी एकुलती एक मुलगी वारल्याची बातमी ऐकल्यावर ६३वर्षाचा वुडहाऊस उद्गारला होता - - 'आय थॉट शी वॉज इम्माॕर्टल'.आपली लाडकी लेओनारा आणि तिचा मृत्यू या दोन घटना वुडहाऊसच्या स्वप्नातही कधी एकत्र आल्या नव्हत्या .
'मला वाटलं की ती अमर आहे ' - या उद्गारात जगात अपत्यवियोगाच्या वेदना भोगाव्या लागलेल्या आईबापांच्या मनावर बसणार्या निर्घृण घावाला एखाद्या शोकसूत्रासारखी वाचा फुटली आहे.वुडहाऊसच्या निधनानंतर त्याच्या लक्षावधी वाचकांनीही हेच म्हटलं असेल की,अरे,आम्हाला वाटलं होतं की तो अमर आहे!"..........
पुलं, आम्हीही तुम्हाला असंच म्हटलंय.......आणि तुम्ही आहातच की.....आमच्या रक्तात ,स्पंदनात आणि श्वासात.कायमचे !!!
#पुलंवाढदिवस
#एकशून्यमी
#हसवणूक
#पानवाला
#बिगरीतेमॕट्रिक
#महात्मागांधी



सुंदर लिखान ....
ReplyDeleteआमच्या लाडक्या दैवताचे सकाळीं सकाळीं दर्शन झाले.खूप छान वाटले.योग्य शब्दात,योग्य मांडणी खरोखरच प्रशंसनीय आहे. पुलं ना विनम्र अभिवादन व लिखाणाला सलाम
ReplyDeleteKhoop surekh.Tuzyamule sakali sakali
ReplyDeleteP.L.chi bhet zali...Sushama.
सुंदर विश्लेषण 🌹🙏
ReplyDeleteपु.लऺ बद्दल सगळंच वाचनिय आणि आनंददायी असतं.
ReplyDeleteसुंदर विश्लेषण
ReplyDeleteपु लं यांचे १०१ जयंती निमित्त मिळालेली मेजवानी
ReplyDeleteदिवाळी आधीच दिवाळीचा आनंद.
सुंदर
पु. ल.साहित्य मस्त👍
ReplyDeleteछान ,आनंद मिळाला वाचुन.
ReplyDeleteखूप छान 👌😊
ReplyDeleteखूप छान 👌
ReplyDeleteसर्वांगसुंदर लेख.
ReplyDeleteखूप सुंदर लेख.
ReplyDeleteपुढच्या आर्टिकल ची वाट पाहतोय
ReplyDelete