माझ्या मराठीची दुर्दशा...की दुदर्शा की र्दुदशा???
अनेक बारक्या गल्ल्या, अवघड वळणं,डोक्यात जाणारा ट्रॕफिक पार करत शेवटी एकदाचं हवं ते दुकान सापडलं.आणि दुकान सापडल्याच्या आनंदाच्या फुग्याला लगोलग टाचणी पण लागली. 'आर्शिवाद ग्राफिक्स'- हे पाटीवरचं नाव वाचूनच डोकं फिरलं. 'आशिर्वाद' ला 'आर्शिवाद' लिहिणाऱ्या दुकानात कसल्या ग्राफिक्स ची अपेक्षा करणार? आणि हो - 'ग्राफिक्स' हा इंग्रजी शब्द मात्र अचूक लिहिला होता पाटीवर. दुकानात शिरल्यावर मी टोकलंच त्या मालकाला.
' हो मॅडम.लिहिताना चूक झाली, हे पाटी लावल्यावर लक्षात आलं. नंतर दुरुस्त करतो करतो म्हणतोय पण कामं इतकी असतात ना............'
ही खरी माझी डोकेदुखी. लिहीतांना चूक होणं समजू शकते मी. पण ती चूक - पदरी पडलं पवित्र झालं -च्या चालीवर स्वीकारणं - हे मला पटूच शकत नाही.
' लिहिल्या गेलं 'आर्शिवाद'.वाचताना 'आशिर्वाद' वाचा की.एवढं काय बिघडलं ?'- - -ही जी बेफिकिर वृत्ती असते ना-ती माझ्या डोक्यात जाते .
तसंही रफार आणि अनुस्वार या मंडळींचं नशीबच फुटकं. (आता रफार आणि अनुस्वार म्हणजे काय हे कृपया विचारु नका हो)बिचारे नेहमीच वेटिंग लिस्टमध्ये असतात. लिहिणारा आपल्या सोयीनुसार, ज्ञानानुसार त्यांना शब्दावर कुठेतरी बसवून मोकळा होतो - मग हर्षवर्धन चं हषर्वर्धन झालं काय किंवा आनंदमंगलचं आनदंमगंल झालं तरी कुणाला फारसा फरक पडत नाही.
ज्या शाळेत उत्कृष्ट मराठी शिक्षक आहेत अशा मराठी शाळेत माझं शिक्षण झालंय. आजच्या पिढीला हे वाचून मी पुराणवस्तु संग्रहालयातली वाटू शकेन कदाचित. आमच्या मराठीच्या बाई शुद्धलेखन आणि व्याकरण याबद्दल विलक्षण आग्रही होत्या.( हे शुद्धलेखन आणि व्याकरण म्हणजे काय रे भाऊ?- - हो. हा प्रश्न अपेक्षितच आहे मला)
ह्रस्व, दीर्घ, स्वल्पविराम पूर्णविराम, काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, रफार, या विभूतींना आमच्या डोक्याच्या हार्डवेअर मध्ये योग्य रीतीने फिट्ट करण्याचं चोख काम आमच्या बाईंनी प्रामाणिकपणे केलं. आता या ह्रस्वदीर्घादि विभूतींची नावं ऐकून आजच्या पिढीला हडप्पा-मोहंजोदारो उत्खननातून या वस्तू सापडल्या असाव्यात असा समज होणं सहज शक्य आहे. आणि हो. काना- मात्रा मधील 'काना'ला 'कान्हा' असंही लिहिलं जातं या ज्ञानाची प्राप्ती मला नुकतीच झाली आहे बरं का.
एकदा निबंधात हस्तांदोलन च्या ऐवजी हंस्तादोलन - असं मी लिहिलं होतं तेव्हा बाईंनी तो शब्द पन्नास वेळा अचूक लिहिण्याची शिक्षा मला दिली होती.(अशा अनेक शिक्षा त्या कोवळ्या वयात आम्ही निमूटपणे भोगल्या आहेत - त्याही पालकांना न समजता) बरं फक्त लिहिणंच नाही तर उच्चार कसे असावेत यावरही बाईंचं लक्ष असायचं .धडा वाचतांना मी 'भारतात' हा शब्द 'भार्तात' असा वाचता क्षणी बाईंनी डोक्यावर टपली हाणली.
'अगं तो काय 'सर्वात', 'मार्गात', 'वर्गात' असा शब्द आहे का? शारदेला शार्दा म्हणशील का?'
भाषेच्या लेखना वाचनाचे असे संस्कार झाल्यामुळे कुठेही जरा चूक दिसली की डोकं फिरतंच. माझं शास्त्र जेव्हा 'आर्यूवेद' असं लिहिल्या जातं तेव्हा मस्तकात तिडीक जातेच. पण हल्ली असल्या चुकांना महत्त्व दिल्या जात नाही किंबहुना त्या चुकाच नाहीत असंही काहींचं म्हणणं आहे. 'भावना पोचणं महत्त्वाचं - -व्याकरण नाही '- ही हल्लीची टॅगलाईन मी काही पचवू शकत नाही .बेफिकीरपणे वाटेल तिथे अनुस्वार आणि रफार देणाऱ्यांची मला खरोखर चीड येते. ज्या शब्दांमध्ये अनुस्वार आणि रफार दोन्ही आहेत ,अशा शब्दांबद्दल मला खूप सहानुभूती वाटते .अंतर्नाद, अंतर्मन, अंतर्यामी ,अंतर्बाह्य अशा शब्दांना विचारा एकदा - त्यांचे कसे हाल केले जातात ते.......
'संकर्षण', 'धैर्यवर्धन' अशी नावं असणाऱ्या व्यक्तींना विचारा त्यांच्या व्यथा ..........
प्रंचड, गुतांगुंत ,वारवांर, ससंर्ग, विर्सजन अशा स्वरूपात येणारे हे नेहमीचे शब्द वाचताना हल्ली सवय करावी लागतेय कारण कोणाला त्याबद्दल फारसं गांभिर्य नसतं. आणि हे मी सध्या फक्त रफार आणि अनुस्वार याबद्दलच लिहिते आहे. बाकी शुद्धलेखना बद्दल लिहायचं तर ह्रस्वदीर्घादि प्रत्येक मंडळींवर आणि प्रत्येक विरामचिन्हावर ( हे आणखी काय नवीन ?) एक स्वतंत्र लेख होईल .
बरेचदा असे चुकीचे शब्द वाचताना माझं मनोरंजनही झालेलं आहे .जिल्हा रुग्णालयाच्या संपूर्ण कंपाउंडवर जवळजवळ पन्नास वेळा लिहिलेलं 'छोटं कुंटुब सुखी कुंटुब' वाचताना --काहीही न खटकणाऱ्या मंडळींजवळ सुखी माणसाचा सदरा आहे याचा हेवाही वाटला आहे.
हलकंफुलकं आणि हलकफुलक व मोकळंढाकळं आणि मोकळढाकळ यातला नेमका फरक समजणाऱ्यांशी माझी नाळ जुळायला (माझीतरी) हरकत नाही.
शेवटी मराठी ही माझी मातृभाषा आहे आणि माझी मातृभाषा म्हटलं की प्रेम आलंच .प्रेम म्हटलं की जबाबदारी आलीच. त्यामुळे कुठेही चूक दिसली तर शक्यतो ती दुरुस्त करण्याचा,टोकण्याचा, निषेध नोंदण्याचा प्रयत्न करणं हा माझा खाक्या असतो. तुम्ही काय म्हणाल याबद्दल????#मराठी#शुद्धलेखन#रफार#अनुस्वार#व्याकरण#





