Creative writing such as.....Inquisitive to explore new subjects, Concise expressive way, Informal tone,,humorous, Sarcasm, Reviews, Health related, Current issues, Experiential, & any topic which triggers me to write.
Saturday, March 25, 2023
पेंच सहलीतले "पेच"
Tuesday, November 8, 2022
खरा पुरुषोत्तम
Tuesday, October 11, 2022
आजच्या महानायकास ्
आजच्या महानायकास.......
प्रिय अमिताभ ........
आज तुझा ८० वा वाढदिवस.काय बोलावं तुझ्याबद्दल? तसाही तुझा आणि 'वयाचा' काही संबंध आहे?
आमची पिढी पंचविशीत असतांना पासूनच तू आमचा हीरो आहेस.
आज मी साठीत पदार्पण केलंय.
तुझे फोटो भिंतीवर लावणं,
तुझ्या सिनेमाच्या तिकीटासाठी तासनतास लाईनीत उभं राहणं,
तुझ्या सिनेमाची पारायणं (की आवर्तनं?) करणं,
तुझे डायलॉग्ज तोंडपाठ करणं,
तुझ्या अभिनयावर शंका घेणार्यांशी रक्त आटेपर्यंत वाद घालणं,
तुझ्या आजारपणात डोळ्यात पाणी आणून प्रार्थना करणं.........हे सगळं आम्ही त्या वयात केलंय.
आता मात्र या कलाकारा पलिकडचा तू जास्त समजू लागला आहेस आणि अधिक भावू लागला आहेस.
केबीसी करताना समोरच्या स्पर्धकाचं बोलणं तू ज्या पद्धतीनं ऐकतोस ना, तिथेच तू जिंकतोस.हा अभिनय नाही हे सांगण्यासाठी तुझी नजर आणि तुझी देहबोली पुरेशी आहे.त्यावेळेस तुझ्या नजरेत काय नसतं? समोरच्या व्यक्तीबद्दल सन्मान, आत्मीयता, कौतुक, सुसंस्कृता, मिष्किलता आणि विलक्षण माणुसकी. तुझं आख्खं व्यक्तिमत्व तुझ्या डोळ्यात प्रतिबिंबित होत राहतं आणि आम्ही परत परत अमिताभ नावाच्या,कमालीची उंची गाठलेल्या माणसाच्या प्रेमात पडत जातो.
तुझी ऊर्जा,तुझी सकारात्मकता, तुझं कामाप्रती समर्पण,तुझं सामाजिक भान हे सगळं अचंबित करणारं आहे आणि त्यामुळे तुझ्या अभिनयाला एक लखलखीत धार येऊ लागलीय.
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व कोण? अर्थातच पुलं.
याच चालीवर भारताचे लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे अमिताभ बच्चन- - -तुझंच नाव घ्यावंसं वाटतं.तुम्ही दोघंही असामान्य आणि एकमेवाद्वितीय कलाकार आहात , त्याबरोबरच "माणूस" म्हणून तुम्ही त्याहीपेक्षा अधिक मोठे आहात.सामान्य माणसाला पुलं अगदी जवळचे वाटतात तसा तू ही हल्ली जवळचा ,आपला माणूस वाटतो.आणि म्हणूनच हे लाडकेपण निर्माण होतं.
पुलंनी ज्या कलाकृती चं कौतुक केलं ती कलाकृती हमखास अमर होत असे.तुझंही तसंच आहे.मिडास राजासारखा हात लावशील त्याचं सोनं करित असतोस.
नायिकेवर प्रेम करावं ते तूच.
व्हिलनला चारीमुंड्या चीत करावं ते तूच.
केबीसी करावं ते तूच.
हरिवंशरायांच्या कविता म्हणाव्या त्या तूच.
गुजरात ची जाहिरात करावी ती तूच.
पिकू मधला विक्षिप्त म्हातारा रंगवावा तो तूच.
शौचालयाची मिष्कील जाहिरात करावी ती तूच.
अलाहाबादी भाषा बोलावी ती तूच.
बिकाजी नमकीन ची जाहिरात करावी ती तूच.
आणखी काय आणि किती लिहावं?
अरे काय हे?
किती राज्य करशील आमच्या मनावर?
तुला पर्यायच नाही.
तुझा आवाज, तुझी देहबोली, तुझं बोलणं , तुझं प्रतिसाद देणं,तुझं काव्य वाचन,तुझं सगळंच मापदंडाच्या फुटपट्ट्या ठरलेल्या आहेत.
तू म्हटलेले पसायदान आणि ब्रम्हपुत्रेची आरती ऐकताना अक्षरशः कानात जीव गोळा होतो.
आमची पिढी भाग्यवान की आम्ही तुझ्या संपूर्ण प्रवासाचे साक्षीदार आहोत.
एक उच्च दर्जाचा आनंद देऊन तू आमचं सांस्कृतीक जीवन समृद्ध केलं आहेस.तुला उदंड, निरोगी आयुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!
#अमिताभबच्चनवाढदिवस
#महानायकवाढदिवस
Monday, September 5, 2022
लाभले आम्हास भाग्य..... शिक्षक असण्याचे
मध्यंतरी एका व्यासंगी आणि सुप्रसिद्ध व्यक्तिचे व्याख्यान ऐकण्याचा योग आला. व्याख्यानाच्या आरंभी ते म्हणाले, 'आज मी तुमच्या समोर जो उभा आहे त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या शिक्षकांना जातं'.....आता या वाक्यात वेगळं असं काहीच नाही. सामान्यतः अनेक विद्वान कर्तृत्ववान व्यक्तींच्या जडणघडणीत त्यांच्या शिक्षकांचा मोलाचा वाटा असतोच. पण खरी मेख पुढेच आहे. वरचं विधान करून दोन क्षण वक्त्यांनी विराम घेतला आणि म्हणाले, 'मी त्या शिक्षकांना माझ्या यशाचं श्रेय देतो... ज्यांनी मला कधीच शिकवलं नाही. ज्यामुळे मी स्वतः अध्ययन करण्यास प्रवृत्त झालो'.
आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने मला हा प्रसंग आठवला. मी स्वतः एक शिक्षक असल्याने वरिल विधानाचा सगळ्या बाजूंनी सांगोपांग विचार केला. खरंतर प्रत्येक शिक्षकाने आत्मपरीक्षण करावे असे हे विधान आहे. एक सुसंस्कारित, सुशिक्षित, संवेदनशील नागरिक घडवण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते. ही जबाबदारी समर्थपणे पेलण्याची क्षमता आपल्यात आहे का? हे आत्मपरीक्षण प्रत्येक शिक्षकाने शिक्षक दिनाच्या निमित्ताने अवश्य करायला हवे.
पण हल्लीच्या 'स्मार्ट' शिक्षणात शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही 'स्मार्ट' असल्याने हे आत्मपरीक्षणही स्मार्ट नाही झालं तरच नवल. हे कसे काय??? प्रश्न पडला असेल ना? सोप्पंय. 'ओटीडी' द्वारे हो .आम्हा महाविद्यालयीन शिक्षकांचा प्रत्येकाचा एक 'ऑनलाइन टीचर डाटाबेस' असतो. त्यात आपली इत्यंभूत कुंडली मांडलेली असते. वेळोवेळी आपण केलेले उपक्रम - उदा. लेखन, व्याख्यान, प्रकल्प इत्यादी त्यात 'अपलोडायचे' असतात. जितके जास्त अपलोड तितका शिक्षक भारी. 'ओटीडी' हा शिक्षकाचा आत्माच की हो...'स्मार्ट' आत्मा बरं का.
खरंच डिजिटल युगाने, वेगवान काळाने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने प्रत्येक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला आहे. मग शैक्षणिक क्षेत्र त्याला अपवाद कसे राहणार? शिक्षक केंद्रित शिक्षण आता जुने झाले आहे. त्याऐवजी विद्यार्थी केंद्रित शिक्षण हे योग्य मानले जाते. त्याही पुढे जाऊन आजचे शिक्षण हे परीक्षा केंद्रित शिक्षण आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. प्रचंड संख्येत वाढलेल्या खाजगी शाळा - महाविद्यालये, मोठ मोठ्या शिक्षणसंस्था, संस्था पूरक ध्येयधोरणे, बदललेली शिक्षण पद्धती, शाळांचे कॉर्पोरेट स्कूल आणि पब्लिक स्कूल मध्ये झालेले रूपांतर, सतत चालणाऱ्या परीक्षा, वारेमाप शिक्षणशुल्क, शिकवण्या व्यतिरिक्त राबवले जाणारे असंख्य उपक्रम...... या सगळ्यांमुळे आजचा शिक्षक हा ओझे वाहणारा भारवाही झालेला आहे. त्याच्यातला खरा प्रामाणिक शिक्षक अर्धमेला होतो आहे ही वस्तुस्थिती आहे. शिक्षक विद्यार्थी हे नाते कोरडे आणि रुक्ष होत चालले आहे. शालेय शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात तुलनेने आपुलकी आणि जिव्हाळा आजही टिकून आहे. पण कोरोनाच्या धुमाकूळामुळे ऑनलाइन शिक्षणाचा शाळेत प्रवेश झाला आणि नात्यातली ही ओलही आता आटते की काय अशी भीती वाटतेय. 'गुगल' सरांनी शालेय शिक्षणातही चंचुप्रवेश केलाय. महाविद्यालयीन विद्यार्थी तर 'गुगल विद्यापीठच' खिशात घेऊन फिरत असतात. त्यांना शिक्षकाची गरजच नसते. महाविद्यालयीन शिक्षक तर बरेचदा -'उरलो सह्या पुरता' अशा स्थितीत असतात.पूर्वीसारखे शिक्षक आणि पूर्वीसारखे विद्यार्थी आता राहिलेच नाही अशी ओरड हल्ली नेहमीच होत असते.
ही वस्तुस्थिती खरी असली तरी सगळेच चित्र नकारात्मक नक्कीच नाही. आजही असंख्य हाडाचे शिक्षक आपलं विद्यादानाचे कार्य तळमळीने करत आहेत. आणि असंख्य विद्यार्थी आयुष्यभर अशा शिक्षकांच्या ऋणात राहत आहेत. शिकवण्याच्या, शिकण्याच्या पद्धती बदलल्या, तंत्र बदलले तरीही शिक्षकाची जागा कोणीच भरून काढू शकत नाही. शिक्षण ही एक चैतन्य पूर्ण अशी सजीवां कडून सजीवांवर घडून येणारी विकासाची प्रक्रिया आहे. तत्व, पद्धती, तंत्र, साधन, साहित्य, पुस्तके या सगळ्या निर्जीवच गोष्टी. शिक्षक आपल्या स्पर्शाने त्यात चैतन्य निर्माण करीत असतो. त्यामुळे शिक्षकाचे स्थान नेहमीच अनन्यसाधारण होते आणि राहील.
"The art of giving shape to human powers and adapting them to social service is the supreme art of education " असे प्रख्यात शिक्षण तज्ञ 'जॉन ड्युई' ने म्हटले आहे. मानवी शक्तींना वळण लावून त्यांना समाज कार्यासाठी सक्षम करणे हे शिक्षणाचे सर्वोच्च उद्दिष्ट लक्षात घेण्याची गरज आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने नव्याने समजून घ्यायला हवी.फक्त अभ्यासक्रमाला बांधून न घेता,चौकटीबाहेरच्या शिक्षणालाही अंतर्भूत केले पाहिजे. कितीही प्रतिकूल असली तरी शिक्षकाने सकारात्मक राहून, "Successful teaching is a teaching that brings about effective learning" या 'मर्सेल' च्या व्याख्येवर विश्वास ठेवून शिक्षक असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे.
शिक्षक हा राष्ट्रपती पेक्षाही मोठा असतो याचे भान दिले ते 'सर्वपल्ली राधाकृष्णन' यांनी .उत्कृष्ट अध्यापन, इंग्रजी वरील असाधारण प्रभुत्व, अलौकिक वक्तृत्व, तत्त्वज्ञानाचा प्रगाढ व्यासंग असणाऱ्या डॉ.
राधाकृष्णन यांनी अध्यापनाचा आरंभ मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेज पासून केला. त्या नंतर म्हैसूर, कलकत्ता येथेही त्यांनी विद्यादानाचे कार्य केले. आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू ते १९३१ते १९३५ पर्यंत होते. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठात 'स्पाॅडलिंग प्रोफेसर' या पदावर त्यांची नियुक्ती झाली. हा मान मिळवणारे ते पहिले भारतीय होत. १९३८ ते १९४७ पर्यंत त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरुपद स्वीकारून या विद्यापीठाला उंचीवर नेऊन ठेवले. डॉ. राधाकृष्णन हे नुसतेच तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक नव्हते तर श्रेष्ठ तत्त्वज्ञ होते. त्यांची मर्मदृष्टी व त्यांचे मूलग्राही चिंतन त्यांच्या विविध देशांमधल्या व्याख्यानांमधून आणि ग्रंथसंपदेमधून निर्विवाद सिद्ध झाले आहे.
"मी परदेशात शिकायला जाणार नाही तर शिकवायला जाईन"... हे विद्यार्थी दशेतील त्यांचे उद्गार त्यांनी सिद्ध केले. १९४९ साली ते रशियात राजदूत म्हणून गेले. १९५२ सालापासून दहा वर्षे ते उपराष्ट्रपती होते. १९६२ साली ते राष्ट्रपती पदावर आरूढ झाले. राष्ट्रपती झाल्यावर आपला जन्मदिवस हा 'शिक्षक दिन' म्हणून मानला जावा अशी त्यांनी राष्ट्राला सूचना केली. अत्युच्च पदावर असतानाही स्वतःमधल्या शिक्षकाचे विस्मरण त्यांना झाले नाही. चाळीस वर्षे 'शिक्षक' म्हणून आपण केलेले कार्य सर्वात श्रेष्ठ व मौलिक आहे अशी त्यांची धारणा होती .'पाच सप्टेंबर रोजी माझे गुणगान न करता शिक्षकांचा सन्मान करा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा'..... असा संदेश देऊन त्यांनी शिक्षक व शिक्षण व्यवसाय यांना उदात्त ,श्रेष्ठ पातळीवर नेऊन बसविले.
आज अनेकदा माझ्यातल्या शिक्षकाचे खच्चीकरण होईल असे बरेच प्रसंग येतात.शिकवणं निरर्थक वाटू लागतं.पण अशावेळेस मला माझ्या शाळेतल्या मराठे बाई आठवतात. कॉलेजमधले जोशी सर आठवतात. शिकवतानाची त्यांची तळमळ आताही तीव्रतेने जाणवते. मनातले वैफल्य, उदासीनता नष्ट करण्याची शक्ती त्यांनी केलेल्या संस्कारात आहे याची प्रचिती येते. अगदी पुलंचे चितळे मास्तर ही येतात मदतीला....
"पहिली, दुसरीच्या वर्गा बाहेरून जाणाऱ्याला आत इंग्रजी चालले आहे की पोरे ज्ञानेश्वरीतल्या ओव्या म्हणत आहेत ते कळत नसे. अजूनही मला त्यांची ती, 'आय?' 'गो'. 'यू ?' 'गो'. 'वुई?' 'गो'.
' ही?' 'गोऽऽऽज' !!.... ची चाल आठवते. मास्तर इंग्रजी साभिनय शिकवायचे. तुरूतुरू चालत , 'आय अॅम??'..की
पोरे 'वॉऽऽकिंग'.. म्हणून कोकलत. मग खुर्चीवर मान टाकून, डोळे मिटून पडत आणि म्हणत , 'आय अॅम??'... 'स्लीऽऽपिंग'... अशी पोरांची गर्जना झाली की झोपेतून दचकून जागे झाल्यासारखे उठून, 'गाढवांनो, माझी झोप मोडलीत ?' म्हणत."
आजही अनेक शाळांमध्ये असे अनेक चितळे मास्तर आहेत जे जीव तोडून शिकवत आहेत आणि आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या ह्रदयात जिवंत आहेत,आपुलकीच्या आणि जिव्हाळ्याच्या नात्याने कायम बांधले आहेत.
श्रेष्ठ शिक्षणतज्ञ 'प्लेटो' म्हणतात, " If you ask me what is education, the answer is easy, that which makes good men and good men act nobly".
या महान शिक्षणतज्ञांचा शिक्षणाविषयीचा व्यापक दृष्टिकोन आज आपल्याला स्वतःमध्ये रुजवायचा आहे. मी शिक्षक आहे. परीक्षेच्या पलीकडे, अभ्यासक्रमाच्या पलीकडे, पुस्तकांच्या, तंत्रांच्या
पलीकडे माझ्याजवळ बरंच काही आहे, जे मी माझ्या विद्यार्थ्यांना, प्लेटोच्या व्याख्येनुसार देऊ शकते..... हा आत्मविश्वास आजच्या दिवशी आपण समस्त शिक्षकांनी मनात रुजवू या आणि हा पवित्र व्यवसाय करण्याची जी संधी मिळाली आहे,त्याचे सोने करु या.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
डॉ.साधना आशुतोष कुळकर्णी
अकोला
९४२२९३९५१०
Sunday, July 10, 2022
काय झाडी, काय डोंगार, काय हाटील......एकदम ओक्केमध्ये
या वर्षीच्या आषाढी एकादशी ची बातच निराळी आहे. तब्बल दोन वर्ष वारी शिवाय काढताना विठुराया सुद्धा कासावीस झाला असेल. वारकऱ्यांच्या बाबतीत तर बोलायलाच नको. पुढे पडणाऱ्या एकेका पावलागणिक त्यांची ऊर्जा वृद्धिंगत होत असते. आपल्या लाडक्या दैवताचे दर्शन घेताना 'आनंदाचे डोही आनंद तरंग' अशी त्यांची अवस्था घरात बसूनही आपल्याला समजू शकते. वारकऱ्यांची अपार श्रद्धा, निर्मळ आणि निरपेक्ष भक्ती, त्यांचं समर्पण, विठ्ठलाच्या भेटीचा ध्यास, त्यांचा विश्वास-हे सारं काही दरवर्षीच्या आषाढी वारीला तेवढ्याच तीव्रतेने आपल्या ही हृदयाला भिडतं. हेवा वाटतो त्यांचा. त्यांच्या धमन्यांमधून रक्ताबरोबर वाहणाऱ्या परमानंदाचा अनुभव आपल्याला घेता येईल कधी ? त्यांच्यातल्या चैतन्याचा, टिकून राहणाऱ्या ऊर्जेचा ओझरता तरी स्पर्श आपल्याला होईल? हे प्रश्न दरवर्षी वारी सुरू झाली की छळतातच. घरबसल्या वारीचे दृश्यं बघताना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडणाऱ्या समाधानाचा, निर्लेप सात्विक आनंदाचा अनुभव आपल्यालाही श्रीमंत करतो. वारीच्या या आनंद सोहळ्याचे आपण दुरून का होईना पण साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो मग .आणि यावर्षी तर विचारूच नका. दोन वर्ष मनात दाबून ठेवलेली तळमळ ,असोशी, तो ध्यास.. सारं काही पावलांमध्ये एकवटून चालणारे वारकरी बघून आनंदाचा काटाच येतो अंगावर. गळ्यात टाळ घालून ,भान हरपून मृदंगाच्या तालावर थिरकणारी पावलं बघतांना घशात आवंढा दाटून येतो. डोळ्याच्या कडा पाणावतात. वारीतल्या परमानंदाची मग आपल्यालाही होते लागण.
अशाच भक्तिमय आनंदात अख्खा महाराष्ट्र डुलत असताना अचानक एक नवीनच आनंदाचं सूत्र धाडकन अंगावर आदळलं......'काय झाडी, काय डोंगार ,काय हाटील,.... एकदम ओक्के मध्ये'. 'ग्यानबा तुकाराम,ग्यानबा तुकाराम' म्हणता म्हणता महाराष्ट्रातली सामान्य जनता चक्क -'काय झाडी, काय डोंगार........' चा जप करू लागली .अरेच्चा!!!कसलं भारी सूत्र आहे राव. लईच 'क्लिक' झालं. बघा ना. महाराष्ट्राच्या राजकारणात 'भूकंप' होऊ घातला होता. सरकारचं आसन डळमळीत होऊ लागलं होतं .असंतुष्टांची 'वारी' पार गुवाहाटी ला पोचली होती .इकडे भक्तमंडळी कासावीस. लांबलेला पाऊस, हिंसाचार, महागाई, आणि पुन्हा दार ठोठावणारा कोरोना ...हे सारं कमी होतं की काय ,तर हा राजकारणातला 'भूकंप '...
अशा कठीण समयी गुवाहाटी च्या दिशेने डोळे लावून बसलेल्या भक्तांना काय मंत्र मिळाला? तर- -' काय झाडी, काय डोंगार, काय हाटील...एकदम ओक्के मध्ये'. कुठल्याही जबाबदारीच्या, बांधिलकीच्या,अडचणीच्या गुंत्यात अडकून न पडता, अलगदपणे बाहेर पडून स्वतःची सोय आणि चैन कशी शाबूत ठेवायची, ही आनंदाची गुरुकिल्लीच मिळाली जणू आम्हाला. आणि आम्ही 'एकदम ओक्के' मध्येच गेलो. बघता बघता वारकऱ्यांचा आनंदाचा हेवा वाटेनासाच झाला की हो.
वारकऱ्यांचं सोडा हो. त्यांची वर्षातून एकदाच वारी असते .पण आपले लोकप्रतिनिधी- - ते तर हाडाचे वारकरी. अध्यात्म धमन्यांमधून वाहतंय हो त्यांच्या. सत्तेच्या देवाची हाक आली की सगळं सोडून धावणार देवापाशी. निष्ठा, तत्त्व, मूल्य, सत्य, सेवा, विवेक या षडरिपूंना सहजतेनं झटकून टाकणारी ही जात. काहीही म्हणा,पण महाराष्ट्रातील जनता भाग्यवान खरीच. यावर्षी एकाच वेळी दोन दोन वार्यांचा अनुभव आला की हो. लोकप्रतिनिधींच्या वारीमुळे तर झोपच उडाली आमची .आज काय १५, उद्या काय २०, परवा काय ३५..... अशी आकडेमोड ऐकून ऐकून मेंदूचा पार भुगा झाला. त्यात पंढरपूरच्या वारीचा विसरच पडला हो .आणि मग एकाएकी आनंदाचा मंत्रच हाती आला, 'काय झाडी, काय डोंगार .....'
देशात, राज्यात काहीही होवो लोकप्रतिनिधी मात्र कायम 'ओक्के' मध्ये .जनतेच्या समस्या, जनतेची दुःखं, जनतेची हतबलता, काहीही अंगाला लावून न घेणाऱ्या या 'ओक्के' मध्ये असणाऱ्या निर्लेप, निस्संग महारथींची वृत्ती तर हेवा करण्यासारखीच. यांच्या धमन्यांमधून कोणतं रसायन वाहतंय,हे त्यांच्या तथाकथित 'देवालाच' ठाऊक. पण काहीही असो, या वारीतल्या वारकऱ्यांनाही त्यांचा 'विठ्ठल' भेटलाच आणि तो सुद्धा पायी चालत जाऊन नाही तर ,'काय झाडी, काय डोंगार ,काय हाटील.... एकदम ओक्केमध्ये' असतानाच भेटला. शेवटी जिवाशिवाची भेट झाली आणि वारी एकदाची सुफळ संपूर्ण झाली.
यातला विनोदाचा आणि उपहासाचा भाग सोडला, तर सर्वसामान्य जनता सुद्धा हल्ली 'ओक्के' मध्येच असते.सुजलेला चंगळवाद आणि समाज माध्यमांवरील वाढत जाणारं अवलंबित्व यामुळे भल्याभल्यांचा सारासार विवेक पार तळाशी जाऊ लागला आहे. परिणामी, आभासी आनंदालाच खरं समजून या खोट्या विश्वात माणूस रममाण होत चाललाय आणि 'एकदम ओक्के' मध्ये असल्याचा समजतोय. हल्ली आनंद हा मनात नसतो तर तो दाखवून सिद्ध करावा लागतो. समाज माध्यमांवर ही आनंदाची दिवली सतत तेवत ठेवण्यासाठी मग आम्ही वाहवत जातो. व्हाॅट्सअप वर, फेसबुक वर, इंस्टाग्राम वर ,ट्विटर वर वाढदिवसाचे, सहलीचे ,लग्नाचे, मुंजीचे, केळवणाचे, मेंदीचे, हळदीचे, बारशाचे, पाल्याच्या गुणपत्रिकेचे ......आणि कशाकशाचे शेकडोंनी फोटो टाकून आम्ही आनंदात आहोत, 'एकदम ओक्केमध्ये' आहोत हे दाखवण्याची मग अहमहमिकाच सुरू होते.
कोरोना च्या पहिल्या आणि दुसर्या जीवघेण्या लाटेचा नुकताच भीषण अनुभव असूनही आम्ही त्यातून काहीही धडा घेतलेला नाही. त्यावेळी पाळलेले नियम, त्यावेळी 'साधी राहणी, उच्च विचारसरणी'.. यांचा झालेला साक्षात्कार, त्यावेळी स्वतः मध्ये केलेले बदल..... हे सगळं स्मशानवैराग्य होतं असं आता लक्षात येतंय .आता कोरोना परत उंबरठ्यावर उभा आहे. त्याला पुरेपुर ठेचल्याच्या भ्रमात आणि उन्मादात आम्ही जीवाची चंगळ करायला ऊर फोडून धावतोय, उतावीळ झालोय. कोरोनानं दिलेल्या भयंकर धक्कयाचा आम्हाला पार विसर पडला आहे.
म्हणूनच 'काय झाडी, काय डोंगार .......'या वाक्याची जरी खूप खिल्ली उडवली गेली, तरी ते वाक्य आजच्या काळाचं प्रातिनिधीक वाक्य आहे -- लोकप्रतिनिधींसाठी ही आणि सामान्य जनतेसाठी ही-- हे दुर्दैवानं अधोरेखित करावंसं वाटतं. मूळ समस्या, मूळ प्रश्नांना बगल देत केवळ चंगळवादाच्या भरवशावर आम्ही 'एकदम ओक्के' मध्ये आहोत, ही स्वतःची फसवणूक नाही तर दुसरं काय?? खरे कर्मयोगी, सच्चे समाजसेवक, शास्त्रज्ञ, सीमेवरील सैनिक आणि प्रत्येकच क्षेत्रातील कितीतरी विद्वान, नामवंत मंडळी -आज प्रसिद्धीपासून दूर राहून, निष्ठेनं आपलं कार्य करित आहेत. ही मंडळी समाज माध्यमांवर कधीही झळकत नाहीत. त्यांचं कार्य हीच त्यांची ओळख असते. उलटपक्षी,
'काय झाडी ,काय डोंगार .......' असं म्हणणारे लोकप्रतिनिधी मात्र २४ तास डोळ्यासमोर असतात 'कालाय तस्मै नमः' दुसरं काय??
आज आषाढी एकादशी आहे .आम्ही एसीत बसून, मोबाईल मध्ये चॅटिंग करत,विठ्ठलाचे फोटो टाकत,उपवास 'साजरा' करतोय. खरंतर आमचं शिक्षण, आमची विद्वत्ता,आमचा दर्जा, आमची संपत्ती ,आमच्या सुखसोयी,आमची जीवनशैली... हे सगळं
त्या वारकऱ्यांच्या पायपीटी समोर मातीमोल आहे. वारीत जाणारा, डोक्यावर गाठोडं
घेतलेला वारकरी हा 'माणूस' नाही तर ती एक 'वृत्ती' आहे - - भक्ती आणि श्रद्धेनं ओथंबलेली, भ्रामक सुखांची पुटं गळून पडलेली, विश्वास आणि जिद्दीच्या भरोशावर पुढे जाणारी. लाखो-करोडो वारकरी ही 'संख्या' नाही तर तो - 'भेटी लागी जीवा, लागलीसे आस' या उन्नत भावनेचा सागर आहे.
जगण्याची उंची वाढवणार्या वारकरी पंथाची परंपरा अभिमानानं मिरवणारे आपण- काय करायचं,हे आता ठरवायची वेळ आलीय - 'काय झाडी, काय डोंगार ......'म्हणून 'एकदम ओक्के' मध्ये राहायचं की 'तीर्थ विठ्ठल ,क्षेत्र विठ्ठल' म्हणून सच्च्या वारकर्याची वृत्ती अंगात रुजवायची?? हे ठरविण्याची बुद्धी आपण आज विठूरायाकडेच मागू या.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
#कायझाडीकायडोंगार
#एकदमओक्केमधे
Friday, May 27, 2022
निमाचा सुवर्णमयी इतिहास, भाग १ला.
एन आय एम ए- एका सुवर्णमयी इतिहासाचा आढावा
=================
एन आय एम ए चा अमृत महोत्सव नुकताच सुरू झालाय. 75 वर्ष झालीत .शून्यातून निर्माण झालेल्या या संघटनेची ओंजळ आज पूर्णपणे भरलेली आहे .पण 75 वर्षांपूर्वी, रित्या ओंजळी पासून सुरू झालेला हा प्रवास आज पर्यंत कसा घडला असेल?
ही संघटना सुरू करण्याची गरज केव्हा आणि कशासाठी भासली असेल? संघटनेचा प्रवास हा खाच खळग्यातून एका पाऊल वाटेपर्यंत...
पाउलवाटेपासून एका सडके पर्यंत....
सडके पासून एका रस्त्यापर्यंत....
रस्त्यापासून एका महामार्गा पर्यंत .....
आणि महामार्गापासून एक्स्प्रेस हायवेच्या दिशेने जाणारा हा प्रवास कसाअसेल?
संपूर्ण भारतात या संघटनेचा प्रसार कसा झाला असेल?
आज हे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना दूरदृष्टी ठेवून कार्यक्रमाचं आयोजन करणं जितकं गरजेचं आहे, तितकंच इतिहासात डोकावून बघणं,सुद्धा आवश्यक आहे. आज समस्त निमाच्या सदस्यांना निमा चा इतिहास, त्यावेळचा संघर्ष, त्यासाठी प्राणपणाने प्रयत्न करणारे निमाचे पदाधिकारी, यांच्याबद्दल माहिती देणं... हा सुद्धा अमृत महोत्सवाचा एक अपरिहार्य भाग आहे.इतिहास हा नेहमीच मार्गदर्शन करित असतो. विशेषतः आजच्या तरुण निमा कार्यकर्त्यांना संघटनेच्या इतिहासाची जाणीव असणं फार गरजेचं आहे.
चला तर मग......
जाणून घेऊया संघटनेचा हा प्रवास. कधी उत्कंठापूर्ण ...कधी मनोरंजक... कधी व्यथित करणारा... कधी निराश करणारा.... पण नेहमीच प्रेरणा देणारा.......!
चाळूया संघटनेच्या इतिहासाची पाने....... दर पंधरा दिवसांनी.
एन आय एम ए - एका सुवर्णमयी इतिहासाचा आढावा ....
. भाग २
===================
प्रत्येक देशाची काही ना काही वैशिष्ट्ये असतात .आपला देश ही अनेक समृद्ध अशा परंपरांमुळे विश्वात ओळखला जातो. त्यापैकी एक परंपरा म्हणजे 'वैद्यकशास्त्र'- अर्थातच 'आयुर्वेद'. सुमारे चार ते पाच हजार वर्षांपूर्वीचं हे शास्त्र आजही समाजाला निरोगी ठेवण्यात अग्रेसर आहे. असं म्हणतात, की काळाच्या ओघात जे टिकून राहतं तेच सत्य होय. सत्याची ही व्याख्या आयुर्वेद शास्त्राला तंतोतंत लागू पडते.
पण अशा या त्रिकालाबाधित शास्त्राचं अस्तित्व वेळोवेळी सिद्ध का करावं लागतं हा प्रश्न आजच्या पदवीधारकांना पडणं सहाजिकच आहे.
आयुर्वेद शास्त्र भारतीय जनमानसांच्या दैनंदिन जगण्यात रुजलं आहे. परंपरा, उत्सव, सण आणि संस्कृती यातून आयुर्वेदाची तत्त्वे सहजपणे आचरणात आणली जातात. पूर्वीच्या आजीबाईच्या बटव्यापासून तर नुकत्याच कोविडच्या महामारीत आयुर्वेदानं कायम समाजाला आजारपणातून दिलासा दिला आहे.
पण ............
पण हेच शास्त्र जेव्हा पाठ्यपुस्तकात बंदिस्त झालं, विद्यापीठातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचू लागलं, कायदे ,ठराव, नियम, अधिनियमाच्या चौकटीत अडकलं, विद्यार्थ्यांच्या पदवीत विराजमान झालं तेव्हा मात्र शास्त्राच्या प्रवासात खाचखळग्यांची शृंखला सुरू झाली ती आजतागायत.
या पूर्ण इतिहासाच्या कालखंडात परिस्थिती बदलत होती, शासनकर्ते बदलत होते, शास्त्राचे पदवीधर बदलत होते,शैक्षणिक धोरणं बदलत होती पणआयुर्वेद पदवीधरांसमोरचे प्रश्न मात्र कायम होते. प्रश्नांचं स्वरूप काळानुरूप बदलत होतं पण प्रश्नांमधून आजपर्यंत सुटका झाली नाही हे मान्य करावेच लागेल.
1918 साली महाराष्ट्रात मुंबई,पुणे,नगर, सातारा ,नागपूर, सूरत, नदियाड याठिकाणी आयुर्वेद आणि पाश्चात्त्य वैद्यक एकत्रित शिकवणारी महाविद्यालये सुरू झालीत.
1920 मध्ये जळगाव जिल्ह्यातील फैजपूरला काँग्रेसचे एक अधिवेशन भरले होते. त्यामध्ये सरदार वल्लभ भाई पटेल ,महात्मा गांधी, पंडित नेहरू, इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. त्यावेळी वैद्यकीय शिक्षणाचा प्रश्न चर्चेला आला असताना पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक ठराव मांडला.
"Everything good in Modern Science and Ancient Ayurved should be fused and a new course should be started suitable for the people of this country ".
हा ठराव म्हणजे पंडित नेहरूंच्या सखोल विचारांचं आणि दूरदृष्टीचं एक उदाहरण आहे. हा ठराव सर्व संमतही झाला .1925 मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयात तसेच डॉक्टर अजमल अली खान यांनी युनानी- पाश्चात्त्य- आयुर्वेद एकत्रित शिकण्यासाठी अलिगड येथे महाविद्यालय सुरू केले.
1942 मध्ये मुंबई येथे डीएएसएफ हा कोर्स सुरू झाला. भारतात अनेक ठिकाणी संमिश्र पॅथीची महाविद्यालयै सुरू झालीत.
1947 साली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वैद्यकीय शिक्षणात एकसूत्रता आणण्यासाठी अनेक समित्या स्थापन झाल्या. चोप्रा कमिटी, उडूपा कमिटी इत्यादींनी पाठवलेले ठराव मात्र आरोग्य समितीकडून नाकारले गेले. परंतु या कालावधीत आपल्या पदवीधारकांकडून मात्र समाजाला उत्कृष्ट आरोग्य सेवा दिली जात होती. शिक्षणातील सुसूत्रीकरण, नोकर्यांमधील समानता,विविध कमिट्यांनी सुचविलेले प्रस्ताव.,पदवीला राजमान्यता......याकडे मात्र शासनाचं होणारं दुर्लक्ष ही अत्यंत व्यथित करणारी बाब होती.
किती काळ हा अन्याय सहन करायचा????
किती काळ ही मुस्कटदाबी सोसायची????
आपले हक्क आणि अधिकार सहजपणे मिळत नसतील तर ते भांडून मिळवायचे असतात ही स्वातंत्र्यसैनिकांची वृत्ती आयुर्वेद पदवीधारकांमधे उपजत होतीच.
सगळ्यांनी एकत्र येऊन आपणच आपले प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करणे ही त्या काळाची गरज होती. त्यामुळे 13 एप्रिल 1948 रोजी आंध्रप्रदेशचे डॉक्टर सूर्यनारायण राव यांच्या मार्गदर्शनाखाली सभा होऊन नॅशनल मेडिकल असोसिएशन या संघटनेची स्थापना झाली.
आणि सुरुवात झाली एका अविरत संघर्षाची......एका अस्तित्वाच्या लढ्याची.......
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
==================
एनआय एम ए - एका सुवर्णमयी इतिहासाचा आढावा
भाग ३
===================
"नॅशनल मेडिकल असोसिएशनची" मुहूर्तमेढ 1948 साली रोवण्यात आली. आता संमिश्र चिकित्सा पद्धतीची महाविद्यालये संपूर्ण भारतात सुरू झाली होती. एकीकडे समाजाचे आरोग्य मिश्र चिकित्सकांमुळे उत्कृष्टपणे सांभाळले जात होते तर दुसरीकडे शासनमान्यता, रजिस्ट्रेशन,पदवीधरांचे हक्क... इत्यादी कायदेशीर बाबींमध्ये मात्र अडचणी वाढत होत्या. अशा परिस्थितीत एकत्र येऊन लढा देणं ही काळाची गरज होती आणि लढण्यासाठी संघटना आवश्यक होती. अनेक समविचारी पदवीधरांनी एकत्र येऊन आपल्यातील नेतृत्व पणाला लावले.अनेक बैठकी,अनेक चर्चांच्या मंथनातून अखेर नॅशनल मेडिकल असोसिएशन चा पाया हा 1948 साली रचला गेला.
दिल्ली येथे अखिल भारतीय वैद्यकीय परिषद भरली असताना, विजयवाडा येथील डॉक्टर सूर्यनारायण राव यांना अध्यक्षपदावर तर दिल्लीचे डॉक्टर भद्रा सेन यांना सचिव पदावर नियुक्त केले केले. या संघटनेच्या बांधणीमध्ये दक्षिण भारतातील डॉक्टर वाय कुंडल राव, डॉक्टर सी द्वारकानाथ, डॉक्टर महादेव शास्त्री, पंजाबचे डॉक्टर प्यारेलाल गुप्ता, उत्तर प्रदेशचे डॉक्टर आर.डी. ग्रोवर, डॉक्टर पी एन गुप्ता, दिल्लीचे डॉक्टर पी के सेठ, मुंबईचे डॉक्टर पी एन अवस्थी यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
या संघटनेमुळे शासन प्रणाली शी संघर्ष करण्याचा राजमार्ग आयुर्वेद स्नातकांसाठी मोकळा झाला.
यापुढे 1950 मध्ये महाराष्ट्रात बॉम्बे मेडिकल असोसिएशन, पुना मेडिकल असोसिएशन, खानदेश मेडिकल असोसिएशन, अहमदनगर मेडिकल असोसिएशन, नाशिक मेडिकल असोसिएशन ,या संघटनांची निर्मिती झाली.
1952 मध्ये महाराष्ट्रात जी एफ ए एम हा कोर्स सुरू झाला.
1953 मध्ये महाराष्ट्रा बाहेर म्हैसूर मेडिकल असोसिएशन, मद्रास मेडिकल असोसिएशन, तसेच उत्तर प्रदेशात यूपी नॅशनल मेडिकल असोसिएशन, कलकत्ता येथे असोसिएशन ऑफ फिजिशियनस ऑफ कलकत्ता, गुजरात मेडिकल असोसिएशन अशा विविध राज्यांमध्ये संघटनेची पायाभरणी झाली.
थोडक्यात सांगायचे झाल्यास, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भारतीय जनतेने दिलेल्या लढ्याची ठिणगी आपल्या व्यावसायिकांमधेही धगधगत होतीच. त्या ठिणगीचं रूपांतर संघटनेत झालं.
संघटनेचं महत्त्व, संघटनेत असणारी शक्ती - या काळात प्रकर्षाने अधोरेखित झाली. आयुर्वेद शास्त्राच्या पदवी धारकांच्या उज्वल भवितव्यासाठी संघटनेची भूमिका अत्यंत मोलाची आहे- याची जाणीव सगळ्यांना झाली. .आपले विविध प्रश्न सोडवण्यासाठी संघटना रुपी हुकुमाचा एक्का अस्तित्वात
आल्याने आपल्या स्नातकांना खूप दिलासा मिळाला.....आणि सुरुवात झाली एका संघर्षाची...
एका धडपडीची.......
आत्मसन्मान टिकवण्याची......
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
===================
🔆 *एन आय एम ए - एका सुवर्णमयी इतिहासाचा आढावा* 🔆
*भाग ४*
===================
"There is no reason why we should not bring out an alliance of old experience and knowledge as exemplified in the Ayurvedic and Unani systems, with the new knowledge, that the modern science has given us.The question is thus, not of conflict between the various systems but of sound education in knowledge as it is today and then the freedom to apply in accounting to any system. It is the scientific approach that is important."
हे शब्द आहेत भारताचे पहिले पंतप्रधान "पंडित जवाहरलाल नेहरू" यांचे. भारताच्या सामाजिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करून अत्यंत अमूल्य आणि मूलभूत असा विचार त्यांनी मांडलेला होता - जो त्या काळातही योग्य होता आणि आजही काळाच्या कसोटीवर तो खराच आहे. परंतु काही सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक स्वार्थापोटी ही सत्याची बाजू कायम झाकून ठेवण्यात राज्यकर्ते यशस्वी ठरले हे नाकारता येत नाहीच. सूर्यप्रकाशा सारखं सत्य सर्वज्ञात असलं, तरी ते पदरी पाडून घेण्यासाठी वर्षानुवर्षे लढा द्यावा लागावा...... हे दुर्दैव नाही तर दुसरं काय???
संघर्ष तर आपल्या व्यावसायिकांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. 1950 मध्ये पंजाब सरकारने आपल्या पदवीधारकांनी नावामागे डॉक्टर लिहू नये असा फतवा काढला. त्यावेळी आपल्या पदवीधारकांना अर्थातच हा अन्याय मोडून काढण्यासाठी शक्ती आणि युक्ती खर्च करावी लागली. अन्यायाला वाचा फोडण्यात यश आल्यामुळे तत्कालीन स्वास्थ्य मंत्री श्री गोपीचंद भार्गव यांनी मध्यस्थी केली व हा अपमानकारक फतवा मागे घेण्यात आला
1959 साली लोकसभेत ड्रग रुल्स अंतर्गत टू (ee)(iii) या कायद्याचा समावेश केला. त्यामुळे राज्य सरकार द्वारे अधिकृतरित्या आपल्या स्नातकांना आर. एम. पी. ही पदवी देण्याचा आदेश काढण्यात आला.
महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात ही राज्ये प्रामुख्याने आपल्या स्नातकांच्या भविष्याबाबत जागरूक होती. या राज्यांमध्ये विविध संघटनांच्या माध्यमातून सतत स्नातकांच्या न्याय्य मागण्यांचा पाठपुरावा केला जात असे.
म्हैसूर येथे "गव्हर्मेंट आयुर्वेद अँड युनानी ग्रॅज्युएट असोसिएशन"- ही डॉक्टर गुंडप्पा यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत सक्रिय अशी संघटना होती.
1958 साली "नॅशनल मेडिकल गॅझेट" या नावाचे मुखपत्र ग्वाल्हेर येथून प्रसिद्ध होऊ लागले. डॉक्टर हणमंतराव मुजुमदार व डॉक्टर अशोक मुटरजाट यांचा त्यात पुढाकार होता.
1960 मध्ये "इंटिग्रेटेड मेडिकल जर्नल" हे म्हैसूर येथे सुरू झाले .त्यामुळे आयुर्वेद स्नातकांच्या वैचारिक आदान-प्रदानाला अधिक चालना मिळाली व व्यक्त होण्यासाठी एक सशक्त माध्यम निर्माण झाले.
1961 साली कर्नाटकात "कर्नाटक आयुर्वेद युनानी रजिस्ट्रेशन ॲक्ट" ची निर्मिती झाली. त्याच वेळी "कर्नाटक आयुर्वेदिक युनानी प्रॅक्टिशनर बोर्ड" ची स्थापना झाली. या घटनेमुळे कर्नाटकातील स्नातकांना विलक्षण दिलासा मिळाला हे काही वेगळं सांगायला हवं??
याच वर्षी म्हणजे 1961 डिसेंबर मध्ये पुण्यात लक्ष्मी रोड येथील गोखले हॉलमध्ये राज्यव्यापी अधिवेशन भरविण्यात आले. अधिवेशनाचे अध्यक्ष पुण्याचे डॉ. वा.क. साठे हे होते. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री "श्री यशवंतराव चव्हाण" यांच्या हस्ते झाले. डाॅ. वा.क. साठे, डॉ. बा.शं. बिडकर, डॉ.अ.वि. गोहाड, डॉ. मोहन देशपांडे, डॉ. के व्ही शहा, डॉ. व्ही व्ही भागवत, डॉ. ज. के बर्डे या दिग्गजांनी हे अधिवेशन यशस्वी यशस्वी करण्यासाठी जीवापाड परीश्रम केले.
या अधिवेशनाचं मुख्य फलित म्हणजे या एकत्रीकरणातून महाराष्ट्रात संघटनेचा पाया रचणारी अनेक महनीय व्यक्तिमत्वे उदयास आली. आयुर्वेद स्नातकांच्या सुरक्षित आणि सन्मान्य भविष्याचा या महान व्यक्तिंनी घेतलेला ध्यास व त्यासाठी केलेले प्रयास.......
आणि अमृत महोत्सवानिमित्त आपल्यासमोर येत असलेला हा गौरवपूर्ण इतिहास.........
हा इतिहास तरुण कार्यकर्त्यांना प्रेरणादायक ठरावा.......हीच अमृतमयी आशा
===================
🔆 *एन आय एम ए- एका सुवर्णमयी इतिहासाचा आढावा* 🔆
*भाग ५*
===================
मागील लेखात लिहिल्याप्रमाणे, १९६१ मध्ये पुण्यात भरविलेले, समन्वित चिकित्सेचा पाठपुरावा करणारे राज्यव्यापी अधिवेशन हे अनेक अनेकार्थाने यशस्वी झाले. महाराष्ट्रातील या अधिवेशनाची प्रसिद्धी आणि चर्चा संपूर्ण देशात होऊ लागली आणि मिश्र चिकित्सा पद्धतीच्या चळवळीचा केंद्रबिंदू म्हणून महाराष्ट्राकडे बघण्यात येऊ लागले .अनेक स्नातकांमधील सुप्त नेतृत्वगुण प्रगट होण्यासाठी या परिषदेने बराच हातभार लावला. तसेच महाराष्ट्रातील चळवळीला एक योग्य दिशा मिळण्यास मदत झाली.
१२ व १३ मार्च १९६६ रोजी ग्वाल्हेर येथे "अखिल भारतीय चिकित्सा परिषद" आयोजित केली होती. त्यावेळी सर्वानुमते "नॅशनल मेडिकल असोसिएशन" चे नामकरण नव्याने करण्यात आले - म्हणजेच त्यात " इंटिग्रेटेड "या शब्दाचा अंतर्भाव करून, "नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन "हे नामाभिधान करण्यात आले.
या "इंटिग्रेटेड" शब्दा मागची कहाणी अशी की २१ एप्रिल १९५९ रोजी राज्यसभेत "फार्मसी अॅक्ट अमेंडमेंट बिल" यावर चर्चा सुरू असताना मिश्र चिकित्सेच्या संदर्भात, तत्कालीन आरोग्य मंत्री माननीय श्री. डीपी करमरकर यांनी "इंटिग्रेशन" हा शब्द उच्चारला होता. हा शब्द आपल्या संघटनेचे नेमकेपणाने प्रतिनिधित्व करेल असे संघटनेतील नेत्यांच्या मनात आले होते. मिश्र चिकित्सेचा आग्रह धरणाऱ्या चळवळीला "इंटिग्रेशन" या शब्दाइतकं अचूक वर्णन दुसरं कोणतं असू शकेल? पण हे नवीन नामकरण होण्यासाठी तब्बल सात वर्षे लागली.
याच दरम्यान देशात "निखिल भारतीय आयुर्वेद" विद्यापीठातून शिकून बाहेर पडणार्या, शुद्ध आयुर्वेदाच्या स्नातकांची संख्याही भरपूर प्रमाणात वाढत होती. शुद्ध आयुर्वेदाचा आग्रह धरणाऱ्या या मंडळींनी "आयुर्वेद महासम्मेलन" ही संघटना निर्माण केली होती. १९६७ साली पंडित शिव शर्मा यांनी लोकसभेत मिश्र चिकित्सा व मिश्र चिकित्सकांना कडाडून विरोध केला. त्यांच्या विरोधाला उत्तर म्हणून एन आय एम ए च्या नेत्यांनी केंद्र तथा राज्य सरकारच्या स्तरावरील सगळ्या खासदारांसमोर आपली भूमिका लेखी स्वरूपात मांडली होती. एकाच पॅथीचा अट्टाहास न करता , इंटिग्रेशन मुळे व्यावसायिकांचा आणि समाजाच्या आरोग्याचा स्तर उंचीवर कसा जाऊ शकतो, यावर लेखी निवेदनात विस्तृत प्रकाश टाकला होता.
याचाच परिणाम म्हणून, याच संदर्भात १९६९ मध्ये "इंडियन मेडिसिन" यावर एक बिल संसदेत मांडण्यात आले. हे बिल पुढे चर्चेसाठी स्टॅडिंग
समितीकडे पाठवण्यात आले. हे बिल मिश्र चिकित्सा पद्धतीला पूरक होते आणि अनेक खासदारांचा त्याला पाठिंबा होता. पण त्यावेळी सुद्धा
महासंमेलनाचे नेते या बिलाच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिले. त्यावेळी तत्कालीन आरोग्यमंत्री श्री बी एस मूर्ती व श्री के के शहा यांनी आश्वासन दिले कि शुद्ध आयुर्वेद आणि मिश्र चिकित्सा पद्धती या दोन्हीचे ही वेगवेगळे शेड्युल्स करण्यात येतील. परंतु कायदा व मी विधी मंत्रालयाने यावर आक्षेप घेऊन दोन शेड्युल्स करणे अडचणीचे ठरेल असे जाहीर केले. व असे करण्यासाठी कायद्यात वेगळी तरतूद करावी लागेल असेही त्यांनी सांगितले. संसदेत मिश्र चिकित्सा पद्धतीचा पुरस्कार करणारे "श्री व्ही एन गाडगीळ", "श्री बापू काळदाते", "श्री मधु दंडवते" यांच्यासारखे कुशल संसदपटू नेहमीच आपल्या इंटिग्रेशनच्या भूमिकेचे समर्थन करीत असत.
शासन स्तरावरील या सगळ्या घडामोडी बघता, संपूर्ण देशात एकच संघटना असणे हे गरजेचे होते कारण त्यामुळे लढ्याला बळ प्राप्त होणार होते. म्हणून १९६९साली एक फेब्रुवारीला, भोपाळ येथे अखिल भारतीय वैद्यक परिषद भरली असताना, सगळ्या राज्यस्तरीय संघटनांनी एकाच देशव्यापी संघटनेत विलीन व्हावे असा निर्णय घेण्यात आला. आणि देशस्तरावर "नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन" ची निर्मिती झाली.
संघटनेची घटना याच परिषदेत लिहिली गेली.
१९६९ एप्रिल मध्ये संघटनेची प्रथम केंद्रीय परिषद दिल्ली येथे संपन्न झाली. "डॉक्टर पी एन अवस्थी", मुंबई यांचे अध्यक्षपदी आणि "डॉक्टर के एस पोद्दार", दिल्ली यांची सचिव पदी निवड करण्यात आली.
संघटना निर्माण झाल्यानंतर चॅरिटी कमिशनर कडे नोंदणी करणे गरजेचे होते. "डॉ. एस पी किंजवडेकर", मुंबई यांनी २४|४|७२ रोजी, "सोसायटीज एक्ट अँड पब्लिक ट्रस्ट, नं.एफ २४६९, मुंबई येथे नोंदणी केली.
पाया जितका खोल आणि पक्का, तितकीच वरची इमारत मजबूत आणि टिकाऊ असते.आज,अमृत महोत्सवानिमित्त, संघटनेतील भक्कम पाया रचणाऱ्या शिलेदारांचे स्मरण करणे आवश्यक आहे . याचे पहिले कारण म्हणजे ते शिलेदार आजही दीपस्तंभासारखे आपल्याला मार्गदर्शन करित आहेत, प्रेरणा देत आहेत. दुसरे कारण म्हणजे, शंभर वर्षानी संघटनेचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस आपण आपल्या पुढील पिढीला काय संचित देणार आहोत????? याचा अंतर्मुख होऊन विचार करण्यासाठी...............
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Sunday, February 6, 2022
आलोक - एक अस्वस्थ करणारा अनुभव
२०१६ साली साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त 'आलोक' हा आसाराम लोमटे लिखित कथा संग्रह नुकताच वाचण्यात आला. २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या या कथासंग्रहाची पाचवी आवृत्ती मी वाचली. खरंतर बऱ्याच उशिरा माझ्या हाती हे पुस्तक आलं .अनेक वाचकांचं हे पुस्तक वाचून झालं असेल आणि त्यावर प्रतिक्रियाही देऊन झाल्या असतील.उत्तम कलाकृतीचा आस्वाद घेतल्यावर त्याबद्दल दुसर्यांना सांगण्याची ऊर्मी निर्माण होणं हा मानवी स्वभाव आहे आणि याच उद्देशानं मी हातात पेन धरलं.
मी हे पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि एक एक कथा वाचताना एखादा चित्रपट डोळ्यासमोरून सरकतो आहे, असा अनुभव आला- इतकं जिवंत आणि प्रत्ययकारी हे लिखाण आहे. ग्रामीण भागात वेगवेगळ्या स्तरांवर माणसांचं होणारं शोषण, शोषित व्यक्तिंचा जगण्यासाठीचा संघर्ष, शोषितांच्या मनातले सल,आणि त्यांच्या मनाच्या तळाचा शोध - -हे सर्वसाधारण सूत्र सगळ्या कथांचं आहे.
पांढरपेशा, वातानुकूलित, नागरी समस्यांमध्ये गुरफटून स्वतःच्या अडचणींचं भांडवल करणाऱ्या शहरी वाचकांचा सुरक्षित कोष टराटरा फाडणाऱ्या या कथा आहेत. लेखकाची ग्रामीण पार्श्वभूमी, पत्रकार असल्यामुळे विविध अनुभवांची शिदोरी, घटना- प्रसंग टिपणारं संवेदनशील मन, त्यातून मानवी स्वभावाचं केलेलं चिंतन, अन्याय- शोषण यामुळे मनात साचलेली खदखद आणि अस्वस्थता....... आणि हे व्यक्त करण्याची प्रबळ ऊर्मी यांचं बेमालूम रसायन म्हणजे हे पुस्तक. या सगळ्या अस्सल अनुभवांना मांडणारी ..'भाषा'- हे या पुस्तकाचं बलस्थान आहे.
शहरी सुरक्षित चौकटीत जगणाऱ्यांच्या कल्पनेपलीकडचं एक ग्रामीण जीवन या कथांमधून समोर येतं. ते केवळ समोरच येत नाही तर थेट मेंदूवर हल्ला करतं, हृदयात कळ आणतं. नेहमीची गुळगुळीत घासलेली, मनावरून ओघळून जाणारी भाषा यात नाही. तर अस्सल ग्रामीण प्रतिमा, प्रतीकं आणि लोककथांमधून रुजलेली, मुरलेली शब्दसंपदा आपल्या मनात रुतत जाते.
- 'आभाळातून कणी कोंडा गळत राहावा तशी पावसाची भुरभुर'.......
- 'हे सरकार शेळीसारखं आस्तंय. कासेत बुक्क्या हाणल्याशिवाय शेळी पान्हा सोडत नाही'....
- 'कापसाचा कोकडा पडावा तसे सगळ्यांचे चेहरे झालेले'.....
- 'आडरानात अब्रू लुटलेल्या बाई सारखं पोरकेपण भवती दाटून आलं'.....
- 'चांगल्या वाड्याला घूस लागावी आणि तिनं रोज उकीर आणून बाहेर टाकावा तसं त्यांच्या टकूर्यात झालं'.....
- 'शंका - कुशंका -अंदाज - आडाखे अशा सगळ्या गोष्टींनी टम्म फुगलेली रात्र एखाद्या बुडून वर आलेल्या प्रेतासारखी तरंगायला लागली '........
अशी थेट मेंदूवर धडका देणारी भाषा वाचतांना वाचक कथांमधे गुंतत जातो.
'चिरेबंद' कथेचा नायक काही काळासाठी, गावी आजोबांच्या वाड्यात आलेला आहे. आजोबा आता हयात नाहीत. एकुलता एक वारस असूनही, नायकाला वाड्याबद्दल कणभरही आस्था, ओल जाणवत नाही. कारण आजोबांनी लोकांचे शोषण करून ही वास्तू उभारली आहे- हा सल त्याच्या मनात आहे. एकीकडे ही बोच असल्यामुळे स्वतःचा हक्क नाकारणारा नातू आणि दुसरीकडे या प्रचंड वाड्यात एकट्या राहणाऱ्या आजीची जगण्याची असोशी याचा धांडोळा या कथेत लेखकाने घेतला आहे.नातवाची अनास्था आणि आजीचा चिवटपणा रंगवणारी ही कथा संथपणे अंगावर चाल करुन येते.
गावात शेती करणाऱ्या मोठ्या भावात आणि शहरात नोकरी करणार्या लहान भावात वाढत जाणारं अंतर .......पण त्याच वेळी मनाच्या तळात दाबून ठेवलेलं प्रेम- यातील अगतिकतेचं वर्णन आतड्याला पीळ पाडणारं आहे. पुढे मोठ्या भावाच्या आत्महत्येमुळे, लहान भावात निर्माण झालेला अपराधी भाव आणि विधवा वहिनीचा जगण्याचा चिवट संघर्ष - 'ओझं' या कथेतून आपल्यासमोर येतो.
आप्पांसारख्या निरलस आणि प्रामाणिक समाजसेवका बरोबर काम करित असताना, 'खुंदळण' या कथेचा नायक, आर्थिक गरजेसाठी, नाइलाजास्तव आप्पांचा हात सोडून, आमदारांच्या पक्षात दाखल होतो. पण क्षणोक्षणी बोचणारा अपराधी भाव त्याला आतून कुरतडत असतो. ही त्याची कुतरओढ अत्यंत परिणामकारकतेने लेखकाने साकारली आहे.
'कुभांड' कथेतली साधीसुधी अंगणवाडीत खिचडी शिजवणारी गवळण बाई. तिचं लहान लेकरु खेळता खेळता माली पाटलांच्या बागेतील मोसंब्या तोडतं. यावरून माली पाटील त्या मुलाला मारतात आणि गवळण बाईला वाटेल तसं बोलतात. ही संधी साधून माली पाटलांच्या विरोधात असणारे सरपंच तिला पोलिसात तक्रार नोंदवायला सांगतात. खरं युद्ध असतं माली पाटील आणि सरपंच यांचं. पण भरडली जाते गवळण बाई. तिच्या सामान्य आयुष्यात उलथापालथ होऊन तिचं जगणं कठीण होतं. फुकट ओढवून घेतलेल्या संकटाचं ओझं घेऊन जगणारी गवळणबाई वाचकालाही अस्वस्थ करते.
'जीत' या कथेतली हरी ची विधवा पत्नी, अकाली वैधव्याचा धक्का सहन करून आपल्या जमिनीच्या तुकड्यावर शेती करुन, जगण्याचा संघर्ष करण्यास सिद्ध झालीय पण पण गावातले राजकारणी तिला निवडणूक लढविण्यास बाध्य करतात. काळ्या आईकडे दुर्लक्ष करून दारोदार मतं मागताना होणारी तिची घुसमट वाचकांना सुन्न करते. निकालाच्या दिवशी ती सारं सोडून शेतात धाव घेते. भरलेली कपाशीची बोंडं बघून ती इतकी हरखून जाते की निवडणुकीतला विजयही तिला कवडीमोल वाटतो. सत्तेसाठी निष्पाप जनतेच्या शोषणाची ही कथा व्यथित करुन टाकणारी आहे.
'वळण' या कथेत लहानगी प्रयाग शाळेतून घरी येताना एका हत्येची घटना बघते. तिचं चिमुकलं भावविश्व या घटनेनं विस्कटून जातं. खरी साक्ष दिल्याने, तिच्यावर येणारा सत्ताधाऱ्यांचा दबाव तिच्या शिकण्याच्या स्वप्नालाही सुरुंग लावू लागतो. तिच्या इवलाश्या जगण्यातली उलथापालथ वाचताना मस्तकात संतापाची तिडीक उठते.
ही सगळी ग्रामीण भागातली 'नाही रे' गटातली अतिसामान्य माणसं. जगण्यातील संघर्षाला, ती त्यांच्या पद्धतीने सामोरी जात आहेत. त्यांना शिक्षण नाही. भौतिक समृद्धी नाही. सोयी-सुविधा नाहीत. पण त्यांच्यात असणारा दुःखाचा सहज स्वीकार, जगण्याचा चिवटपणा, पाय रोवून उभी राहण्याची शक्ती, आणि याबरोबरच त्यांच्यात खोलवर असणारा अगम्य ऊर्जास्रोत ....
या सगळ्यांचं मूळ कशात आहे याचा शोध लेखकाने घेतला आहे. मनाचा तळ ढवळून टाकणाऱ्या, वाचकाला सुरक्षित चौकटीतून बाहेर ओढून, ग्रामीण जीवनातील गुंते दाखवणाऱ्या, मेंदू मनावरील- शहरी- चकचकीत- गुळगुळीत समजुतींची ढापणं ओरबाडून काढणाऱ्या या कथा आहेत. आपल्या भावविश्वाच्या चौकटी विस्तारून समाजभानाच्या कक्षा रुंदावणार्या या कथा आहेत.
याशिवाय या पुस्तकाचा कळस म्हणजे यातील 'परिशिष्ट'. प्रत्येक लेखकानं ते वाचलंच पाहिजे असं. हे परिशिष्ट म्हणजे लेखकांसाठी एक वस्तुपाठच आहे.यात लेखकानं आपली लेखन प्रक्रिया आणि लिहिण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे.
" सत्ता, संपत्ती यांची अविवेकी ताकत ज्यांचे जगणे मुळापासून उखडायला निघालेली आहे आणि जी माणसे सामाजिक, आर्थिक विषमतेत, समाजाच्या तळाशी आहेत... अशी सर्व माणसे मला माझ्या आस्थेच्या परिघात जवळची वाटतात. त्यांच्या जगण्यातले बारकावे ,दुर्लक्षित कंगोरे, त्यांच्या जगण्यातील हर्ष- खेदा च्या जागा शब्दातून व्यक्त करण्याची मला गरज वाटते .त्यांच्या जगण्याची आच माझ्या पर्यंत पोचते आणि तीच लिहायला भाग पाडते".- हा एक लहानसा परिच्छेद लेखकातल्या 'माणसाची' उंची दाखवणारा आहे.
"मस्तकातला सगळा ऐवज घेऊन लेखक जेव्हा लिहायला बसतो तेव्हा केवळ अक्षरेच झरतात असे नाही तर त्याच्या उरातूनही काही झरत असते, पाझरत असते". लेखकाचे हे वाक्य 'आलोक'च्या प्रत्येक ओळीगणिक जाणवत राहतं.
परिशिष्ट वाचल्यानंतर परत नव्याने कथा वाचण्याचा मोह आवरला नाही. आणि लेखकाची भूमिका समजल्यावर कथेत अधिकाधिक खोल शिरण्याचा अनुभव आला. हा अनुभव सगळ्या वाचकांनाही यावा यासाठीच हा लेखप्रपंच.
#आलोक
#आसारामलोमटे
#साहित्यअकादमीपुरस्कार
मनोविकासाचे ध्यासपर्व “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...
-
मनोविकासाचे ध्यासपर्व “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...
-
डाकिया डाक लाया “पत्र लिही पण नको पाठवू शाई मधून काजळ गहिरे, लिपी रेषांच्या जाळीमधूनि, नको पाठवू हसू लाजरे. चढण लाडकी भुवई मधली, नको ...
-
वीण दोघातली ही तुटेना ते दिवसच वेगळे होते. ७८ ते ८२ या कालावधीतले. नागपूरला रहात असल्यामुळे पुण्या मुंबईला दिसणाऱ्या टीव्हीचं खू...












