हल्ली कळेनासं झालंय की आपल्या समाजाचा चेहरा नक्की कसा आहे?? सप्टेंबर महिन्यात प्रामुख्याने महाराष्ट्रात बलात्कारांच्या घटनांनी उच्चांक गाठला. तक्रार न झालेल्या अशा घटना आणखी किती असतील देव जाणे. समाजाचा हा हिडीस, विकृत आणि माणुसकीला काळिमा फासणारा चेहरा डोळ्यासमोर असतानाच नवरात्र सुरू होतंय. आता हा समाज 360 अंश कोनातून गर्रकन फिरेल आणि नऊ दिवस देवीच्या भक्तीचा उन्माद सुरू होईल. उपवास, नऊ दिवसाचे नऊ रंग,ओटी भरणे, सवाष्ण, कुमारीका पूजन, गरबा, अखंड दिवा.... इ. सारी कर्मकांडे समस्त स्त्रिया यथास्थित आणि रीतसर करतील..... बलात्कार, स्त्रियांवर होणारा हिंसाचार, अन्याय - सगळं विसरून.... दृष्टीआड करून.....भक्तीच्या उन्मादात सगळ्या विकृत वृत्तिंचा सोयीस्कर विसर पडेल.
नऊ दिवसांची देवीची ही पुजा, आम्हा स्त्रियांना आत्मभान देत नसेल आणि आमच्या विचारात आणि कृतीत परिवर्तन घडवून आणत नसेल तर काय अर्थ असल्या पूजेत? देवीमधल्य एखाद्या तरी गुणाचा थोडाफार अंश आपल्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो का आम्ही?मुळात आमची पूजा ही श्रेयसासाठी की प्रेयसासाठी??
आपल्या नवरात्र पूजेमागे अनेक पौराणिक कथा आहेत. पण मी जेव्हा सखोल विचार केला, तेव्हा माझ्या बुद्धी आणि तर्कानुसार मला असं लक्षात आलं की स्त्रीचं आयुष्य हे नऊ टप्प्यात पूर्ण होतं. हे नऊ टप्पे आणि नवरात्राच्या नऊ दिवसांचं देवीचं स्वरूप विलक्षण मिळतंजुळतं आहे.ही नऊ दिवसाची पूजा म्हणजे आपल्याच जीवनातला एक एक टप्पा डोळस,समृद्ध,सक्षम आणि परिपूर्ण करणं होय.
पहिली देवी 'शैलपुत्री' म्हणजेच पार्वती. पार्वतीचा आदिशक्ती म्हणून गौरव केला आहे . आदी म्हणजे आरंभ. घटस्थापना करतांना आपण माती मध्ये धान्य पेरत असतो. म्हणजेच पहिल्या दिवशी स्त्री मधल्या 'सृजनशक्तीची','निर्मिती क्षमतेची' पूजा असते. त्याच बरोबर गर्भाशयात रूजलेल्या इवलाश्या स्त्री गर्भाची पूजा असते. या दिवशी प्रत्येक स्रीनं देवीसमोर डोकं टेकवताना स्त्री भ्रूणहत्ये विरुद्ध लढण्याची शपथ घेणं गरजेचं आहे.गर्भनिर्मिती करणाऱ्या अवयवांप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. शैलपुत्री देवीच्या डाव्या हातात कमळ तर उजव्या हातात त्रिशूळ आहे .या त्रिशूळाचा उपयोग केव्हा आणि कसा करायला हवा हे प्रत्येक स्त्रीनं समजून घेणं हे आत्मभानाच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल........
दुसऱ्या दिवशीची देवी म्हणजे ब्रह्मचारिणी. ब्रह्म म्हणजे तपस्या आणि चरणी म्हणजे तपस्या करणारी. ही देवी शुभ्र वस्त्रांकित असून तिच्या एका हातात जपमाळ व दुसऱ्या हातात कमंडलू आहे. ही देवी पार्वती असून तिने शंकराच्या प्राप्तीसाठी तप केलं हे आपण जाणतोच. स्त्री जीवनातला पहिला टप्पा म्हणजे जन्मापासून बारा वर्षापर्यंत.दुसऱ्या दिवसाची पूजा ही 'ध्यासाची' आहे. स्त्रीने आपल्या घरातील, समाजातील बाल्यावस्थेतील मुलींचा विचार करायचा आहे. या मुलींना काही छंद, नाद, ध्यास असेल तर तो त्यांना जोपासू द्यावा, त्यांना पाठिंबा द्यावा. तरच मेरी कोम, पी व्ही सिंधू,मिताली राज घराघरात निर्माण होतील. फक्त या ध्यासामध्ये जपमाळेतील सातत्य आणि शुभ्रवस्त्रातील सात्विकता जपण्याकडे लक्ष देणं हेच आत्मभानाच्या च्या दिशेने टाकलेलं दुसरं पाऊल......
तिसऱ्या दिवसा ची देवी ही 'चंद्रघंटा'. हिची कांती सोनेरी असून ही देवी लावण्यवती आहे. तिच्या डोक्यावर चंद्राच्या आकाराची घंटा असून त्या घंटा नादानं असूर भयभीत झाले होते. स्त्री जीवनातला दुसरा टप्पा म्हणजे तारूण्य. ही पूजा 'सौंदर्य' आणि 'शक्ती'ची असते. तारुण्यावस्थेत स्त्री शरीरातले इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन सक्रिय असल्याने तिचं सौंदर्य आणि कांती झळाळून उठतं आणि याच हॉर्मोनमुळेच या वयात धाडसी वृत्ती असते. देवीसमोर नतमस्तक होताना मुलींचं खच्चीकरण न करता तिच्यातील स्फुल्लिंग जपणं,धिटाईला योग्य वळण देणं आणि सौंदर्यप्रदर्शनास विरोध करणं - हा संकल्प करणं - हेच आत्मभानाच्या दिशेनं टाकलेलं तिसरं पाऊल........
चौथ्या दिवसा ची देवी म्हणजे 'कुष्मांडा'. या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्या चेहऱ्यावर हास्य आहे. तिने आपल्या हास्यापासून ब्रम्हांडाची निर्मिती केली अशी कथा आहे.चौथी पूजा ही 'हास्याची' म्हणजेच आनंदाची आहे. स्त्री जीवनातला चौथा टप्पा म्हणजे विवाह. विवाहानंतर स्त्री आपलं नवीन जग निर्माण करित असते. पण यासाठी तिच्या चेहऱ्यावर हास्य, आनंद आहे का, हे बघण्याची जबाबदारी कुटुंबातल्या प्रत्येकाची- नवरा, सासू, नणंद, दीर इत्यादींची आहे. अंतर्मनातून फुलणारंं हास्य,स्वातंत्र्य आणि आनंद हे प्रत्येक सासुरवाशिणीला, माहेरवाशिणी ला मिळावं यासाठी देवीसमोर संकल्प करणं- हेच आत्मभानाच्या दिशेने टाकलेले चौथं पाऊल.......
पाचव्या दिवसाची देवी आहे 'स्कंदमाता'. ही देवी पार्वती असून हिच्या हातात कार्तिकेय आहे. या देवीचं वैशिष्ट्य हे, की तिला चार हात असून एकाही हातात शस्त्र नाही कारण ही पूजा ' वात्सल्याची ' आहे. विवाहानंतर चा महत्त्वाचा टप्पा म्हणजे मातृत्व. मातृत्वाच्या थोरवी बद्दल मी नव्याने काही सांगण्याची गरज नाही. पण या देवीसमोर नतमस्तक होताना आजच्या आयांनी काही संकल्प आवर्जून करावे. ते म्हणजे घरातील पुरुषांना (नवरा/मुलगा) स्त्रियांकडे एक 'माणूस' म्हणून बघायला,सन्मान करायला शिकवावं.घरातल्या सगळ्या कामांची- स्वयंपाकाची- सवय लावावी .अशी आई होणं म्हणजेच आत्मभानाच्या दिशेनं टाकलेलं पाचवं पाऊल.........
सहावी देवी आहे , 'कात्यायनी'. हिने महिषासुराला ठार मारले असून, हिच्या एका हातात तलवार व दुसऱ्या हातात कमळ आहे. हिच्या अचाट सामर्थ्याच्या अनेक कथा आहेत. या देवीचं पूजन म्हणजे 'असामान्य सामर्थ्याचं' पूजन आहे. स्त्री जीवनातला पाचवा टप्पा हा मुलांच्या संगोपनाचा,घरकामाचा,नोकरीचा- अत्यंत व्यस्त असा असतो. या काळात ती 'मल्टिटास्किंग' करत असते. या दिवशी देवीची पूजा करताना, तिचं सामर्थ्य स्वतःसाठी मागायचं आहे. पण ही अफाट क्षमता, ऊर्जा - घरातील आणि समाजातील सकारात्मक आणि रचनात्मक कार्यासाठी मागायची आहे. आजच्या कृत्रिम आणि पोशाखी दिखाऊपणा साठी नाही किंवा 'सुपरवुमन' बनण्यासाठी नाही. हे आत्मभानाच्या दृष्टीनं सहावं पाऊल............
सातवी देवी म्हणजे 'कालरात्री'. स्त्री जीवनातला सहावा टप्पा म्हणजे चाळिशीनंतरचा. या काळात मुलं मोठी झाल्यामुळे स्त्री थोडी निवांत असते. ही कोशातून, चौकटीतून बाहेर पडण्याची वेळ असते. तिने आता स्वतःला आणि समाजाला वेळ देणं गरजेचं आहे. कशासाठी?? तर- घरात, घराबाहेर, कुठेही अन्याय, अत्याचार होत असेल, तर प्रतिकार करण्यासाठी. कालरात्री देवी चं स्वरूप बघितलं, तर ते भयावह आहे. काळा रंग, मोकळे केस, तिसरा डोळा- - हे कशाचं प्रतीक असावं? जर काहीही चुकीचं घडत असेल, तर रंगरूपाची पर्वा न करता 'तिसरा डोळा' उघडायचा. या देवीचं वाहन 'गाढव' आहे. का?कशासाठी?? दुष्टांचा संहार करण्यासाठी, जमेल त्या मार्गानं, सुचेल त्या आयुधानं, मिळेल त्या मदतीनं- - धावून जायचं असतं. मग ते वाहन गाढव का असेना. या वयात स्त्रीला परिपक्वता, चांगल्या वाईटाची जाण,अनुभव असतो. म्हणून देवीला नमस्कार करतांना, समाजातील अपप्रवृत्तींचा नाश करण्याचा संकल्प करणं- हेच आत्मभानाच्या च्या दिशेनं टाकलेलं सातवं पाऊल.......
आठवी देवी आहे 'महागौरी'. ही श्वेत वस्त्रांकित आहे. या देवी मधील 'शांती व ज्ञानाची ' पूजा केली जाते . स्त्री जीवनातला सातवा टप्पा म्हणजे रजोनिवृत्तीचा आणि सेवानिवृत्तीचा. या काळात शारीरिक आणि मानसिक क्षमता कमी होतात त्यामुळे बरेचदा मनात उदासीनता आणि नैराश्य निर्माण होतं. पण याच टप्प्यावर महागौरी देवीची पूजा करून मन स्थिर,शांत आणि समंजस करणं गरजेचं आहे .देवीच्या हातातील डमरू हे सृष्टीतील उत्पत्ती आणि लय यांचं प्रतीक आहे .हे प्रतीक जीवनातलं अंतिम सत्य आहे हे समजून, सध्याच्या आभासी जगातले अशाश्वत मोह, सुख, मनातून बाहेर काढून, अंतर्मनाच्या शांतीचा व ज्ञानाचा संकल्प करणं- - हेच आत्मभानाच्या दिशेनं टाकलेलं आठवं पाऊल........
नवव्या दिवसाची देवी 'सिद्धीदात्री'. ही कमळात विराजमान आहे आणि हिला अष्टसिद्धी प्राप्त झाल्या आहेत. या टप्प्यावरील स्त्री ही वार्धक्यावस्थेतली असते . साधारण सत्तर वर्षापासून पुढचा हा काळ आहे. या वयातल्या स्त्रीमध्ये समाधान, सामंजस्य, शांती, परिपक्वता, निर्लेपता, निर्मळता, प्रेम आणि आनंद या अष्टसिद्धी असणं अपेक्षित आहे. यासाठी तिनं स्वतः आणि कुटुंबीयांनी जागरूक असायला हवं. या देवी समोर नमन करताना कुटुंबीयांनी तिला सन्मान देण्याचा आणि स्त्रीने स्वतःला षड्रिपु पासून दूर ठेवण्याचा संकल्प करणं हेच आत्मभानाच्या दिशेनं टाकलेलं नववं पाऊल........
अशा पद्धतीने नऊ दिवस देवीच्या मूर्तिपूजेबरोबर देवीचे गुण स्वतःमध्ये आणि आपल्या समाजात रुजवले तर नवरात्राचे श्रेयस आपल्या पदरी पडेल. घराघरांमध्ये दुर्गादेवीचं अस्तित्व निर्माण होऊन स्त्री ही खऱ्या अर्थाने समृद्ध आणि सक्षम होईल. स्त्रीमधील हे आत्मभान जागृत झाल्यावर हा समाजही सुसंस्कृत आणि विवेकी होईल.
स्त्री ही संपूर्ण समाजाला योग्य वळण लावू शकते,त्याचवेळी त्याला वठणीवरही आणू शकते.फक्त स्वतःमधील वैशिष्ट्यांचा नेमका,अचूक आणि योग्य वापर करण्याचं आत्मभान आलं तरच!!!













