Friday, August 6, 2021

दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती.....


   


   काही व्यक्ति या केवळ व्यक्ति नसून त्या संस्था असतात. आदरणीय शिवशंकरभाऊ पाटील यांच्या बाबतीत असंच म्हणावं लागेल. श्री गजानन महाराज संस्थान आणि  श्री भाऊ यांना एकमेकांपासून वेगळं करताच येणार नाही. या उत्तुंग, आभाळाची उंची लाभलेल्या,  ऋषितुल्य  आणि कर्मयोगाची साक्षात व्याख्या असणाऱ्या  व्यक्तिचा मलाही एकदा जवळून अनुभव आलेला आहे. तो अनुभव म्हणजे माझ्या आयुष्यातला एक अमूल्य असा ऐवज आहे.आणि मला त्याचा अभिमान आहे.

    2006 साली आम्ही अकोला येथील काही समविचारी डॉक्टर मैत्रिणींनी  'निमा विमेन्स फोरम' या संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. 2010 पर्यंतच्या चार वर्षात  महाराष्ट्रात निमा विमेन्स फोरमच्या अनेक शाखा निर्माण झाल्या. 2010 साली मी महाराष्ट्र राज्य निमा  विमेन्स फोरमची अध्यक्ष होते. त्यावेळी विमेन्स फोरमची पहिली राज्यस्तरीय  परिषद घेण्याची कल्पना डोक्यात आली. हा प्रस्ताव आम्ही बुलढाणा येथील डॉ. गजानन पडघन यांच्या समोर ठेवला कारण तेव्हा डॉ पडघन महाराष्ट्र राज्य निमाचे अध्यक्ष होते .

'ही राज्यस्तरीय परिषद तुम्ही शेगावला घ्या'... डॉ.पडघन यांनी सुचवले.

 'शेगाव? शेगाव ला का??'

 'तिथे तयारी कशी करणार??'

 'तिथे आमची कुणाशी ओळख नाही.'

'अकोल्यात राहून शेगावला परिषदेचं आयोजन अशक्य आहे.'......हे प्रश्न  मनात होते .

 आमची टीम नकारावर ठाम होती.

  शेगाव संस्थान चे सर्वेसर्वा श्री शिवशंकर भाऊ पाटील डॉ. पडघन यांचे  निकटवर्तीय होते. श्री भाऊंच्या नियोजन कौशल्याची, कामाच्या  पद्धतीची, कामाच्या प्रचंड आवाक्याची डॉ. पडघन यांना कल्पना असल्यानेच त्यांनी शेगाव चा पर्याय आम्हाला सुचविला होता. शिवाय संपूर्ण राज्यातून जास्तीत जास्त प्रतिनिधी हे 'शेगाव ' या नावामुळेच येतील ही मात्र  सगळ्यांना खात्री होती. डॉ. पडघन यांनी  श्री भाऊंना सगळी पूर्वकल्पना आधी देऊन ठेवली आणि आमच्या टीमची श्री भाऊंसोबत मीटिंग ठरवली. श्री भाऊंबद्दल माहिती बरीच होती पण त्यांना कधी बघण्याचा योग आला नव्हता .

  आम्ही भाऊंना पहिल्यांदा भेटलो तेव्हा मनावर दडपण होतंच. अत्यंत साधं, मृदुभाषी, मितभाषी आणि विलक्षण आश्वासक व्यक्तिमत्व. त्यांच्यासमोर आम्ही परिषदेची कल्पना मांडत असतांना, ते ज्या पद्धतीने प्रतिसाद देत होते तेव्हाच  मनातले सगळे शंकेचे ढग निवळायला लागले होते. प्राथमिक बोलणी झाल्यावर आम्ही खर्चाचा विषय काढला.

'आधी परिषद होऊ द्या ,मग बघू.

बरं ,महाराजांचं दर्शन घेतलं का?

 निघताना श्री भाऊंनी विचारलं. 

'आत्ता घेणार आहोत. कारण आलो तेव्हा बरीच मोठी रांग होती'-आम्ही म्हटलं.

' यांना दर्शनाला घेऊन जा'. श्री भाऊंनी एका सेवेकर्याला सांगितलं. लगेच दोन सेवेकरी आमच्या जवळ आले आणि  म्हणाले,' चला माऊली '.

एका सेवेकर्याच्या हातात पूजेचं ताट होतं. त्यात फुलं, तुळशी, बेलपत्र, प्रसाद ,नारळ, उदबत्ती  हे सगळं अतिशय  कलात्मक पद्धतीने मांडलं होतं. आम्हा सर्वांसाठी ही खास दर्शनाची सोय म्हणजे ........आंधळा मागतो एक....अशीच होती. त्या दिवशी नमस्कार करतांना,  डोक्यात परिषदेची कल्पना,समोर श्री गजानन महाराजांची मूर्ती आणि पाठीशी श्री भाऊंचा होकार ....येवढंच हाती होतं पण परिषद यशस्वी होणार याची खात्रीही होती.

    आनंद सागर विसावा येथे दुसऱ्या मजल्यावर चा हॉल आम्हाला परिषदेसाठी देण्यात आला. बाजूच्याच खोल्यांमध्ये प्रतिनिधींची राहण्याची सोय करण्यात येणार होती. आम्हाला श्री भाऊंनी हॉल आणि खोल्या दाखवल्या. आनंद सागर विसावा चे व्यवस्थापक श्री मोरघडे यांच्याशी आमची ओळख करून दिली.

 'तुम्हाला जे काय लागेल ते यांना सांगा आणि काहीही अडचण आली तर मला भेटा'- असं श्री भाऊंनी सांगितलं.

    झालं. आमची दर आठवड्यात शेगाव ची वारी, मोरघडेंं सोबत बैठक ,श्री महाराजांचे दर्शन आणि अगदीच आवश्यक असल्यास श्री भाऊंची भेट असं सत्र सुरू झालं. या सगळ्या सत्रांमध्ये एकच वैशिष्ट्य होतं. आमच्या गरजा आम्ही बारीक-सारीक तपशिलानुसार सांगायच्या आणि  मोरघडे यांनी  रजिस्टर मध्ये लिहून घ्यायच्या.

' नाही ','जमणार नाही', 'शक्य नाही', 'कशाला' 'काय गरज आहे' ,'पाहू' .....हे शब्द आम्ही कधीही,चुकूनही ऐकले नाहीत.

जेव्हा जेव्हा श्री भाऊंची भेट झाली तेव्हा त्यांना परिषदेच्या तयारीचा संपूर्ण तपशील माहित असायचा.आणि खर्चाचा विषय काढला की ठरलेलं उत्तर....

'बघू पुढे'.

     आम्हाला दिलेला हॉल पूर्ण रिकामा होता. परिषदेसाठी स्टेज आवश्यक होतं. धन्वंतरी पूजनासाठी, दीपप्रज्वलनासाठी, परिषदेचं सामान ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था हवी होती. 

त्यांचे सगळे तपशील मोरघडेंना द्यावे लागायचे. म्हणजे, 

उदा.स्टेज ची लांबी रुंदी उंची-

 स्टेजवरच्या खुर्च्यांची संख्या-

 मान्यवरांच्या सोफ्यांची संख्या- 

स्टेज आणि हॉलमधल्या खुर्च्यां मधील अंतर -

हॉलमध्ये खुर्च्या लावल्यावर वावरण्यासाठी मोकळ्या पॕसेजची लांबी रुंदी-

श्री धन्वंतरी आणि श्री गजानन महाराजांच्या फोटोंची लांबी रुंदी -- - -

 हे आणि अशाच कितीतरी बाबी बारकाईने विचारून तशीच्या तशीच त्वरित  अंमलबजावणी करायची - - ही श्री भाऊंची शिस्त आणि पद्धत आजपर्यंत कुठेही अनुभवली नव्हती. समस्त सेवेकर्यांमधील नम्रता आणि सांगितलेलं काम तत्परतेनं आणि चोखपणे करण्याचे श्री भाऊंचे संस्कार पदोपदी जाणवायचे.तिथल्या  स्वच्छतेच्या सवयींनी तर आम्हाला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडलं.

       परिषदेच्या  सगळ्या प्रतिनिधींना  शेगाव प्रसादालयातील नाश्ता आणि भोजन देण्याचं आधी ठरलं होतं. शेगावचा महाप्रसाद हा उत्तम चवीचा, उत्तम दर्जाचा असतो याबद्दल कुणाचंच दुमत नव्हतं. पण परिषदेच्या दृष्टीने हे जेवण अतिशय साधं होईल त्यामुळे बाहेरून केटरिंग सेवा घ्यायची का? असा सूर आमच्या  एका बैठकीत  निघाला. मोरघडे यांनी अर्थातच ' भाऊंना विचारून सांगतो'- हे उत्तर दिलं.खरं तर 'प्रसाद नको '- हे सांगणं खूप अवघड वाटत होतं पण मोरघडें समोर कशीबशी  ती हिम्मत केली.आता यावर श्री भाऊंची प्रतिक्रिया काय होईल,या कल्पनेनं जीव धास्तावला होता.शेगाव हून  आम्ही अकोल्यात पोचत नाही तोच मोरघडेंचा फोन आला.   

 'मॅडम,भाऊंशी बोलणं झालंय. प्रतिनिधींच्या भोजनासाठी आपण एक वेगळा हाॕल ठेवणार आहोत. बाहेरचं केटरिंग नको. संस्थान कडूनच भोजनाची आणि  नाश्त्याची व्यवस्था होईल .आणि त्यात हे पदार्थ राहतील.'

पदार्थांंची भली मोठी यादी ऐकताना मी स्वतःला चिमटा घेऊन पाहिला.आणखी वर मोरघडे विचारत होते,

'याशिवाय काही वेगळं लागेल का मॕडम?'

माझ्या तोंडून शब्द फुटणं अशक्य होतं त्यावेळी.

  परिषद चार दिवसांवर आली असताना आम्ही शेवटच्या तयारीसाठी शेगाव ला पोचलो. नेमका आनंद सागर विसावा  समोरचा रस्ता खोदून ठेवलेला होता. रस्त्याचं काम सुरू झालं होतं त्यामुळे आनंद सागर विसावा मध्ये समोरुन प्रवेश करणं शक्य नव्हतं. विसावा च्या मागच्या बाजूला जे फाटक आहे त्यातून रहदारी सुरु होती.  त्यासाठी गोल फिरुन जावं लागणार होतं.रस्त्याचं काम चार दिवसात आटोपणार नव्हतंच.दर्शनी प्रवेशद्वारावर आमचं मोठ्ठं बॕनर लागणार होतं, ते आम्ही मागच्या फाटकावर लावायचं ठरवलं. थोडा विरस झाला पण रस्त्याचं काम आमच्यासाठी का थांबावं?

 आम्ही वर हॉलमध्ये आलो.खुर्च्या लावल्या होत्या. एन्ट्री पासून स्टेज पर्यंत जाण्यासाठी हिरव्या किंवा लाल  मॕट्स टाकायला हव्या असं आमचं आपसात बोलणं सुरू होतं.संस्थानमध्ये अशा मॅट्स उपलब्ध  नसल्याने आम्ही तो विषय वाढवला नाही.

    परिषद 24 जानेवारी 2010 ला होती. 23 जानेवारीला आम्ही दुपारी आनंद सागर विसावा समोर आमची गाडी थांबवली आणि आमचे डोळे विस्फारले. रस्ता व्यवस्थित तयार झाला होता. हा रस्ता कुणाच्या आदेशाने इतक्या लवकर  तयार झाला असावा हे कोणी  सांगायची गरजच नव्हती. या धक्क्यातून सावरत सावरत  आम्ही हॉलवर पोचलो. तिथे खाली टाकलेल्या लाल मॕट्स आमचे स्वागत करायला सज्ज होत्या. आम्ही आणलेल्या  श्री धन्वंतरी आणि  श्री गजानन महाराजांच्या फोटोच्या आकारानुसार एक सुबक लोखंडी स्टॅन्ड कोपऱ्यात विराजमान होता. त्या स्टँडला समई ठेवायची जागा होती. आणि पूजेच्या इत्थंभूत साहित्याने सजलेलं एक तबक सुद्धा होतं. हे सगळं बघून आम्ही अक्षरशः  निशब्द झालो. क्षणभर पुढचं काही दिसेनासं झालं कारण डोळे भरून आले होते. 

     


परिषद कमालीची यशस्वी झाली. दोनशे प्रतिनिधींची अपेक्षा असताना हजार प्रतिनिधींनी हजेरी लावली. त्यानंतर अनेक ठिकाणी, अनेक नामवंत हॉटेल्समध्ये परिषदा झाल्या पण शेगावच्या परिषदेचा  अनुभव , त्यामागचं श्री भाऊंचं नियोजन आणि परफेक्शन, आपुलकी,स्वच्छता आणि श्रद्धेने संस्कारित प्रत्येक सेवेकरी.....याची सर  कोणालाच नाही. श्री गजानन महाराजांचा आशिर्वाद आणि श्री भाऊंचं पाठीशी असणं- - ही पुंजी  आजही आमच्या संघटनेला बळ देते आहे. आम्ही कोण, कुठली अनोळखी सामान्य माणसं. नुकतीच निर्माण झालेली आणि धडपडणारी आमची संघटना. का आम्हाला एवढी मदत करावी श्री भाऊंनी???अर्थात  डॉ पडघान यांचं यात 90 टक्के  श्रेय आहे.

      या परिषदेत आम्ही  श्री भाऊंना व्यासपीठावर बसण्याची विनंती केली पण अर्थातच  त्यांनी  ते ऐकलं नाहीच. परिषदेत भाषण करताना मी एक वाक्य म्हटलं होतं.

     'श्री भाऊं सारख्या हिमालयाची उंची असलेल्या,  व्यक्तीचे आभार मांडण्याचा मी उद्धटपणा करणार नाही'- आणि  हे म्हणताना माझ्या घशात आवंढा दाटला होता. आता हे लिहितांना आजही माझी  तीच अवस्था आहे. 

श्री शिवशंकर भाऊ पाटील यांच्यातील देवत्वाचा एक चिमुकला कवडसा माझ्या ओंजळीत आला जो मी प्राणपणाने जतन करुन ठेवलाय. 

श्री भाऊंसारख्या नरश्रेष्ठाचा कधीच मृत्यू होत नसतो. ते आहेतच मंदिराच्या भिंती विटांमधे...,प्रत्येक सेवेकर्यांच्या आचरणामधे......श्री महाराजांच्या मूर्ती शेजारी



#शिवशंकरभाऊपाटील

#श्रीगजाननमहाराजसंस्थान

#शेगाव

Sunday, June 13, 2021

"एक शून्य मी" - पुलंचं निराळेपण


      १२ जून. पुलंचा स्मृतिदिन. पुलंना आठवायला स्मृतिदिन कशाला हवा? ते तर रोजच कुठे ना कुठे तरी भेटतातच. - - हे घासून गुळगुळीत झालेलं वाक्य असलं तरी ते वास्तव आहे हे नाकारता येत नाही. पण त्यामुळे स्मृतिदिनाचं महत्त्व कमी होत नाही. या दिवशी या लाडक्या व्यक्तिमत्वाच्या आठवणींना,साहित्याला, कर्तृत्वाला व्याख्यानाद्वारे, लेखाद्वारे, काही नियोजित कार्यक्रमाद्वारे उजाळा मिळतो आणि त्या व्यक्तिमत्त्वाची परत नव्याने ओळख होते. नवीन पिढीला  प्रेरणा मिळते. मनात आनंद आणि अभिमानाची भावना जागृत होते.आपल्या श्रद्धेय व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचं ते एक निमित्त असतं.  त्यासाठीच हा लेखन प्रपंच. 

     


योगायोगाने १२ जून २०२१ ला पुलंच्या "एक शून्य मी" या पुस्तकालाही वीस वर्ष पूर्ण झालेली आहेत. पुलंच्या निधनानंतर, त्यांच्या स्मृतिदिनी मौज प्रकाशनाने हे पुस्तक १२ जून २००१ साली प्रसिद्ध केलं.  अनेक नियतकालिकांमधून  प्रसिद्ध झालेल्या पुलंच्या वैचारिक लेखांचा हा संग्रह आहे. या पुस्तकात अगदी १९६२, ६४आणि ६९ साली लिहिलेल्या लेखांचा समावेश आहे तर काही लेख हे १९९२, ९६ आणि ९९ सालातले आहेत. उर्वरित लेख हे १९७० ते ९० या कालावधीतले आहेत. 

      खरंं तर "एक शून्य  मी" हे पुलंच्या पुस्तकाचं शीर्षक वाचूनच मनात प्रश्न निर्माण होतो आणि यात नेमकं काय असेल ही उत्सुकता ताणल्या जाते.  पुलंचं साहित्य ढोबळमानानं विभागायचं ठरवलं तर, - विनोदी, वैचारिक, व्यक्तीचित्रणात्मक आणि नाटकं -- असं होऊ शकेल. त्यातल्या त्यांच्या वैचारिक आणि व्यक्ती चित्रणाच्या लिखाणाचा बाज नेहमीच सकारात्मक आणि कौतुकाचा आणि गुणग्राहकतेचा राहिलेला आहे. व्यक्तिंविषयी, सामाजिक कार्याविषयी,संस्थांविषयी लिहितांना पुलंनी उत्तम, उदात्त उन्नत, सुंदर  अशा बाजूंवर प्रकाश टाकलेला आहे त्यामुळे ते लिखाण अत्यंत टवटवीत , ऊर्जस्कर  आणि दिशादर्शक झालं आहे. यावर अर्थातच मधून मधून विनोदाचा  तडका असल्यामुळे ते परत परत वाचावंसं वाटतं. त्यांच्या लेखनात कुठेही नकारात्मकता, वैफल्य, निराशा, वैताग असा सूर कधीच नसतो. मग ते कोणतेही लिखाण असो. अशा वेळी "एक शून्य मी" या पुस्तकातून पुलंना नेमकं काय सांगायचं असेल, ही उत्कंठा होतीच.खरंतर, "एक शून्य मी" पुस्तकाच्या सहा आवृत्त्या निघाल्या आहेत.आजवर अनेक वाचकांनी त्याची पारायणंही केली असतील. पण या पुस्तकातला "एक शून्य मी" हा लेख नेहमीच मला व्यथित करुन जातो.त्यातून एका निराळ्या पुलंचं दर्शन होतं. स्मृतिदिनाच्या निमित्तानं 'त्या' पुलंचं स्मरण............

      आजच्या या अतिवेगवान तांत्रिक युगामुळे माणसांमधील बोथट होत जाणाऱ्या संवेदना आणि खिळखिळ्या झालेल्या  जाणिवांमुळे पुलं व्यथित झालेले आहेत आणि ती खंत त्यांनी विविध लेखांद्वारे व्यक्त केली आहे, हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. 

    आपल्या अनेक व्यथा, विवंचना, वैताग तसंच उदासीनतेवर उत्तर मिळवण्यासाठी किंवा निखळ मनोरंजनासाठी पुलंच्या साहित्याचा आधार घेण्याची सवय लागलेल्या वाचकांना "एक शून्य मी" या पुस्तकात प्रश्नांच्या फेर्‍यात अडकलेले पुलं दिसतात, तेव्हा मन खिन्न होतं.  "एक शून्य मी" हा या पुस्तकातील एक लेख आहे आणि  तेच नाव पुस्तकाला दिलेलं आहे.  अर्थात पुस्तकातील  सगळेच  लेख खिन्न करणारे नाहीत.पण "एक शून्य मी" हा लेख अस्वस्थ करतो. 

    आपल्या देशातली ढासळत चाललेली मूल्यं बघून,  

"कधी कधी वाटते,की हे संगीत, साहित्य, नाटके- आनंदनिधाने शोधण्याची हौस आपल्याला मुळातच नसती तर फार बरे झाले असते"- असं पराकोटीचं निराश  विधान  त्यांनी या लेखात केलेलं आहे.

" कारण असल्या क्षणांची झपाझप वजाबाकी होत असते. आणि बाकीचे जे जे काही पाहायला लागते ते मात्र कमालीचे विसंवादी असते."  असं त्यांनी लिहिलेलं आहे. जे वाचतांना पुलंचा कधीही न दिसलेला निराशेचा सूर काळजात कळ आणतो. 

   ज्या श्रद्धास्थानांच्या बळावर  पुलंनी आयुष्यात जगण्याची  दिशा ठरवली होती त्यांच्याबद्दलही कमालीच्या विषण्णतेनं त्यांनी  लिहिलं आहे.

     "कधी कधी  मनापासून चिनी भोजनाचा आनंद लुटल्यावर नेमकं लक्ष रस्त्यावरच्या एखाद्या   चिंध्यांनी अब्रु लपवलेल्या भिकारणीकडे आणि तिच्या अस्थिपंजर पोराकडे का जावं? सगळ्या चैनीची क्षणात वजाबाकी होते. अशा वेळी राग येतो तो फुले, आगरकर, टिळक,  गांधी, साने गुरुजी ह्यांसारख्या मला सतत फसवत गेलेल्या  लोकांचा! मनाचे आणि बुद्धीचे नाही ते कोपरे उजळून जायला ह्या लोकांना कोणी सांगितलं होतं?"                 

        प्रत्येकालाच आजूबाजूच्या परिस्थितीमुळे अनेकदा  वैफल्य  येतं, निराशा दाटून येते.  पुलंनाही असे अनुभव   असणारच. पण मनातली ती खळबळ, वाचकांसमोर खुल्या दिलानं मांडण्यासाठी, या प्रसिद्ध लेखकाला काही पायऱ्या उतरुन खाली यावं लागलं - - जे त्यांनी सहजपणे  केल्यामुळे, "एक शून्य मी" हे पुस्तक, पुलंचं एक पारदर्शक रुप वाचकांसमोर घेऊन आलेलं आहे .

     प्रश्नांच्या फेर्‍यात अडकलेले पुलं उत्तर शोधताना, "एक शून्य मी" या लेखात लिहितात, 

 "प्रश्नांचे भुंगे जन्मालाच कशाला येतात? डोक्याला ही प्रश्नांची सवय लागलीच मुळी कशासाठी? म्हणजे प्रश्नातून सुटका नाही. माझीच नव्हे. कुणाचीच नाही. मग जगणे म्हणजे नुसते श्वासोच्छ्वास घेणे की लक्ष लक्ष प्रश्नांच्या उत्तरांमागून धावणे? शेवटी प्रश्न म्हणजे तरी काय आणि उत्तर म्हणजे तरी काय? हा देखील एक प्रश्नच. मी त्या प्रश्नचिन्हाकडेच  निरखून पाहतो. आणि युरेका! त्या प्रश्नचिन्हातच माझे उत्तर कसल्याशा सांकेतिक भाषेत दडवले आहे हे मला ठाऊक नव्हते. प्रश्नचिन्हाच्या त्या आकड्याखालीच शून्य हे त्याचे उत्तरही असते. विरामचिन्हे इतकी विचारपूर्वक बनवली असतील याची मला कल्पना नव्हती." 

   स्वतःला शून्य म्हणून घेण्याची ही पुलंची अस्वस्थता आणि सच्चेपणा वाचकांनाही व्याकूळ आणि अंतर्मुख करून सोडते.त्यांचं, हे असं परखड  आत्मपरीक्षण शब्दबद्ध करून वाचकांसमोर ठेवणं किती धाडसाचं आहे - हे या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य .  अर्थातच या अस्वस्थतेचे मूळ कारण म्हणजे पुलंची टोकदार संवेदनशीलता आणि जीवनातल्या चांगुलपणावरची  प्रबळ निष्ठा. 

     "एक शून्य मी" हा लेख १९७४ साली लिहिलेला आहे. आज ४७ वर्ष उलटली आहेत.  आज परिस्थिती बदललीय पण छळणारे प्रश्न आजही तसेच आहेत. आजही हा लेख कुठेही कालबाह्य वाटत नाही.आजही त्या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीतच.

 याच पुस्तकात विनोबांबद्दल लिहिताना पुलं म्हणतात,    "विनोबांनी तीन प्रकारच्या संततीचे वर्णन केले आहे. औरस, दत्तक आणि मानस. मानस संतती सर्वात उत्तम कारण ही संतती आपल्या मानलेल्या बाबांच्या विचारांचा आणि आचारांचा वारसा घेऊन तो वाढीला लावते. विनोबांना बाबा म्हणण्याचा अधिकार या मानस संततीचा. हा अधिकार मला नाही"

    विनोबांचा विलक्षण  प्रभाव पुलंवर  होता.विनोबांचं साहित्य हे त्यांचं श्रद्धास्थान. पण त्यांना  बाबा म्हणण्याचा अधिकार मला नाही हे कबूल करण्याचा पुलंचा  मोठेपणा  त्यांच्या स्वभावाची उंची दाखवून देतो. 

   आज या  स्मृतिदिनाच्या निमित्ताने "एक शून्य मी" या पुस्तकाचा आवर्जून उल्लेख करावासा वाटला कारण त्यातून पुलंचं स्वतःचं परखड मूल्यमापन करणारं  "माणूसपण" पानापानातून डोकावत राहतं.प्रसिद्धीची,मोठेपणाची,लाडकेपणाची झूल उतरवून,सामान्य माणसाच्या पातळीवर उतरुन, समाजातल्या छोट्या छोट्या प्रश्नांचा शोध घेणं.आणि त्याबरोबरच स्वतःचाही शोध  घेणं - म्हणजे "एक शून्य मी". सामाजिक बांधिलकी जपण्याचं तत्व आयुष्यभरासाठी अंगिकारल्यावर,  जगण्यातल्या चांगूलपणावर असलेला विश्वास   जेव्हा डळमळीत होऊ लागतो तेव्हा प्रांजळपणे दिलेला कबुलीजबाब म्हणजे "एक शून्य मी".

पुलंच्या याच उन्नत प्रांजळ स्वभाववैशिष्ट्यांना आज आपण वंदन करु या.




#एकशून्यमी

#पुलदेशपांडे

#मौजप्रकाशन

#विनोबाभावे

Tuesday, May 18, 2021

बाबा - तुमच्या साठी...

     आई वडिलांच्या संपत्तीवर त्यांच्या वारसांचा जसा हक्क असतो तसाच  त्यांच्या गुणांवर, प्रतिभेवर, वैशिष्ट्यांवर, सामर्थ्यावर, कौशल्यांवर हक्क असता तर?? पण असं नसतंच. कधी आई-वडिलांची गुणवैशिष्ट्ये अपत्यांमध्ये जशीच्या तशी उतरतात. कधी थोडी थोडी  झिरपतात तर कधी अजिबात उतरत नाही. याला कोणताही नियम किंवा तर्क लागू होत नाही. यावर काही इलाजही नाही.

      मी लिहीत असताना  कायम मला माझ्या वडिलांची - डॉ म.बा.कुंडले - यांची  आठवण येत असते. ते उत्तम लेखक , प्रभावी वक्ता, हाडाचा शिक्षक  आणि प्रसिद्ध शिक्षणतज्ञ होते. त्यांचं चौफेर वाचन, व्यासंगी लेखन आणि मंत्रमुग्ध करणारं वक्तृत्व यापैकी   काही थेंब तरी माझ्यात झिरपलेत का अशी शंका  मला येते. असो. एका समृद्ध व्यक्तिमत्त्वाच्या पोटी माझा जन्म झाला हे ही नसे थोडके.

     आज दिनांक १९ मे. आज त्यांचा वाढदिवस. आज ते असते असते तर ९४ वर्षांचे झाले असते.  ते २०१४ साली आमच्यातून  निघून गेले.  माझ्या कोणत्याही 'लिंबू टिंबू' लेखनाचं - वडील म्हणून त्यांना खूप कौतुक होतं. पण त्यांना अपेक्षित असणारं लेखन माझ्या कडून होतं आहे की नाही देव जाणे.  न सांगता येण्यासारखं आणि  न दाखवता येण्यासारखं - पण माणूस म्हणून समृद्ध करणारं असं खूप काही, आम्हा तिघी बहिणींना त्यांच्याकडून मिळालं आहे. आणि त्या भक्कम पायावरच आज आमची वाटचाल सुरु आहे. 

      आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त काय  करावं ,याचा मी बराच विचार केला.आणि  माझ्या  एका जबाबदारीची मला जाणीव झाली. बाबांनी अमूल्य असं अक्षरधन समाजातील शिक्षकांसाठी निर्माण करून ठेवलं आहे . ते अक्षरधन  यानिमित्ताने समाजातल्या नवीन शिक्षकांसमोर आणण्याचं काम तर मी नक्कीच करू शकते.कितीतरी शिक्षकांच्या पिढ्या बाबांच्या  पुस्तकांमुळे समृद्ध झाल्या आहेत.पण आजच्या गुगल युगातल्या ,अर्धवट माहितीवर विद्वान होणाऱ्या पिढीला, बाबांच्या पुस्तकांमुळे  जर अस्सल ज्ञान मिळालं,  तर बाबांच्या  लिखाणाचं सार्थक होईल असं मला वाटतं. 

   विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षण महाविद्यालयात (एम एड कॉलेज) बाबा प्रोफेसर होते. आणि आई बीएड कॉलेज मध्ये अध्यापक होती.एकत्र कुटुंब असतानाही त्या काळात ,मॕट्रिक झालेल्या आईला, बाबांनी बीए,एमए,बीएड,एमएड ते पीएचडी पर्यंत शिकण्यासाठी उत्तेजन दिलं.आम्ही तिघीही बहिणींनी आपल्या पायावर उभं राहिल्यावरच आमच्या  लग्नाचा विचार करायचा,आणि त्या दृष्टीने, हवं ते शिक्षण पूर्ण करायचं,हे त्यांचं आधीच ठरलं होतं आणि तसं त्यांनी केलंही.


बाबांचं पहिलं पुस्तक म्हणजे 'अध्यापन शास्त्र आणि पद्धती'. १९६२ साली व्हीनस प्रकाशन पुणे यांनी ते प्रकाशित केलं होतं. त्यावेळी बाबा ३५ वर्षाचे होते. या पुस्तकाच्या आजवर नऊ आवृत्या निघाल्या आहेत. त्या काळात ते बीएड कॉलेजमध्ये शिकवत असत. 'अध्यापन शास्त्र'( Principles of Teaching Methods) यावर मराठी भाषेत पुस्तक नसल्यामुळे बाबांनी हे पुस्तक लिहिलं. शिक्षकांना मार्गदर्शन करणारं हे पुस्तक त्या काळात प्रचंड लोकप्रिय झालं.                                                                                                                                       

बाबांचं दुसरं पुस्तक म्हणजे 'शैक्षणिक तत्त्वज्ञान आणि शैक्षणिक समाजशास्त्र'. हे पुस्तक १९७३ साली, श्री विद्या प्रकाशन पुणे, यांनी प्रकाशित केलं. त्या वेळच्या बीएडच्या  अभ्यासक्रमावर आधारित हे पुस्तक आहे. हे पुस्तक बीएड साठी, एक टेक्स्ट बुक म्हणून इतकं उपयुक्त ठरलं की त्याची तेरावी आवृत्ती निघाली आहे. त्या काळात या पुस्तकाला बीएडचा 'दासबोध' असं म्हणायचे. या पुस्तका संदर्भात एक गमतीशीर आठवण आहे. माझी लहान बहीण पुण्याच्या बीएड कॉलेज मध्ये नुकतीच रुजू झाली होती. त्यावेळेस तिची मुलगी लहान होती. तिला सांभाळून कॉलेजचं काम व्यवस्थित जमेल की नाही, हा तिच्या समोर प्रश्न होता. तिची सहाध्यायी तिला म्हणाली, 'अगं टेन्शन घेऊ नकोस, सरळ डॉ. म.बा. कुंडले यांचं शैक्षणिक तत्वज्ञान हे पुस्तक वर्गात न्यायचं आणि वाचून दाखवायचं. मी असंच करते.'  बहिणीनं तिला शांतपणे उत्तर दिलं, '

   'मी त्यांचीच मुलगी आहे'.        



बाबांचं तिसरं पुस्तक म्हणजे 'मराठीचे अध्यापन'. हे १९७४ साली, श्री विद्या प्रकाशन पुणे, यांनी प्रकाशित केलं आहे. विदर्भ साहित्य संघाच्या 'युगवाणी' या मासिकात बाबांची  या विषयावर  लेखमाला प्रसिद्ध होत असे . त्यात काही फेरबदल करून हे पुस्तक जन्माला आलं. या पुस्तकाच्या ही सहा आवृत्त्या निघालेल्या आहेत.
   बाबांच्या मराठी प्रेमावरुन आठवलं.... आमच्या शाळेतले सगळे शिक्षक  बीएड झाले असल्याने, त्यांना 'कुंडले सर' हे जवळून परिचयाचे. मी - सरांची मुलगी. त्यामुळे माझ्यावर सगळ्यांचं बारीक  लक्ष . माझ्या हातून मराठी लिखाणात थोडी जरी चूक झाली तर, 
"तू कुंडले सरांची मुलगी ना? तुझ्याकडून भाषेच्या चुका?" असे टोमणे नेहमीचेच.


      चवथं पुस्तक म्हणजे 'शैक्षणिक समस्यांचा इतिहास' हे पुस्तक १९७८ साली , श्री विद्या प्रकाशन पुणे, यांनी प्रकाशित केलं. त्या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या निघाल्या आहेत.   या पुस्तका पासूनच्या पुढील लिखाणाची मी साक्षीदार आहे. त्याआधी लहान असल्याने,बाबा सतत  काहीतरी लिहीत असतात, एवढंच समजायचं. बाबांना पोटदुखीचा कायम त्रास व्हायचा. त्यामुळे ते जास्त वेळ बसून लिहू शकत नसत. त्यासाठी  त्यांनी डाव्या कुशीवर झोपून लिहीण्याचं कसब आत्मसात केलं होतं. डोक्याखाली उंच लोड घेऊन, डाव्या हाताने रायटिंग पॅड हलू नये म्हणून आधार देत, ते दीड दोन तास सहज लिहू शकत . मी मोठी झाल्यावर  मला जशी मराठी भाषेची आणि शुद्धलेखनाची समज आली, बाबा मला डिक्टेट करित असत. हॉलमध्ये फेऱ्या मारत, एक हात पोटावर ठेवून ते सांगायचे आणि मी लिहायचे. हे लिखाण कशासाठी, कुणासाठी, हा विचार त्यावेळी मला करण्याची गरजच वाटली नाही. पण त्याही वयात बाबांचं एक वैशिष्ट्य  जाणवलं, की खाडाखोड, फेरफार, दुरुस्ती,रफ-फेअर -  हे प्रकार त्यांच्या लिखाणात कधी नव्हतेच. त्यांच्या डोक्यातून थेट फायनल कॉपीच उतरायची. आता विचार केला की आश्चर्य वाटतं-  पुस्तकांची सॉफ्ट कॉपी त्यांच्या डोक्यात कशी काय तयार असायची? कारण  माझी पंधरा वीस पानं लिहून झाली की त्यावर फक्त नजर फिरवून ,ते लिखाण थेट धंतोलीतल्या बनहट्टी प्रेस मधे जायचं.प्रेसमधे लिखाण पोचवणं आणि प्रुफं आणणं - ही आमचीच कामं.

 

त्यांचं पाचवं पुस्तक हे 'टेस्ट ऑफ लिटररी क्रिएटिविटी'. १९७९ मध्ये, साहित्य प्रसार केंद्र नागपूर येथून प्रकाशित झालं. सर्जनशीलतेवर बाबांचा पीएचडीचा प्रबंध - पुस्तक रुपात काढला होता. या पीएचडी च्या प्रबंधासाठी, सायन्स शाखेच्या,दहावीच्या विद्यार्थ्यांमधे मराठी भाषेतली सर्जनशीलता किती प्रमाणात आहे,हे संशोधन केलं होतं.

 

सहावं पुस्तक, 'सर्जनशीलता'. हे १९९१ मध्ये नूतन प्रकाशन,पुणे, यांनी प्रकाशित केलं.सर्जनशीलता हा बाबांचा आवडीचा आणि प्रभुत्व  असलेला विषय. या विषयावर मराठीतून एकही पुस्तक उपलब्ध नसल्याने, मराठी विद्यार्थ्यांची ही अडचण या पुस्तकामुळे बऱ्याच अंशी दूर झाली.

सातवं  पुस्तक हे, 'शैक्षणिक  पत्रकारिता'. १९९६ मध्ये, शिक्षण समीक्षा प्रकाशन,  नागपूर, यांनी प्रकाशित केलं.  पत्रकारितेमध्ये शैक्षणिक पत्रकारिता या एका नवीन संकल्पनेचा अंतर्भाव  होणं गरजेचं आहे असा त्यांचा आग्रह होता. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा,उत्कृष्ट वाङमय निर्मितीचा  पुरस्कार मिळाला आहे.                                                           


                                                
आठवं पुस्तक हे, 'शिक्षणोपनिषद. २००८ साली प्रकाशित झालं. यात, भगवद्गीतेतील,ज्ञानेश्वरीतील, संत 
वाङमयातील शिक्षणाचा धांडोळा घेतला आहे. धर्मशास्त्रातील शिक्षणाचा ऊहापोह केला आहे. या पुस्तकाच्या आधीपासूनच बाबांची तब्येत बिघडत चालली होती .तब्येतीमुळे हळूहळू ते लेखन, वाचनापासून दूर होत गेले.                                                            

'
शिक्षण समीक्षा' नावाचं द्वैमासिक त्यांनी सुरू केलं  होतं.ते त्यांचं चौथं अपत्यच होतं. चाळीस वर्षे त्यांनी ते निष्ठेनं,जीव ओतून चालवलं. बरेचदा अंक काढण्यासाठी लेख कमी पडायचे. त्यावेळेस स्वतःच एखाद दुसरा लेख दुसऱ्याच्या नावाने लिहून, त्यांनी अंक प्रकाशित केलेला आहे .

ही सगळी बाबांची पुस्तकं, आजच्या पिढीच्या शिक्षकांपर्यंत जायला हवीत असं मला वाटतं.  बाबांची शिक्षणाबद्दल, शिक्षणपद्धती बद्दल  शिक्षकाबद्दल, मराठी भाषेबद्दल असणारी विलक्षण तळमळ  या पुस्तकांमध्ये उतरली आहे. अध्यापन क्षेत्रात सतत प्रयोगशील राहून, नवनवीन संकल्पना  शिक्षकांसमोर मांडण्याची त्यांची पराकोटीची सर्जनशीलता  या पुस्तकांद्वारे व्यक्त झाली आहे.शिक्षण क्षेत्रातील बाबांच्या कार्याची दखल घेऊन 'नगरकर प्रतिष्ठान',पुणे तर्फे उत्कृष्ट शैक्षणिक कार्य पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 

     हा लेख आजच्या दिवशी, मी माझ्या बाबांना समर्पित करते आहे. त्यांनी आम्हा बहिणींना सद्विचारांची, तत्वनिष्ठेची,श्रद्धेची,विनम्रतेची अक्षय संपदा प्रदान केलीय.त्याचबरोबर त्यांचं ज्ञानप्रचुर  अक्षरधन  ही समाजातल्या शिक्षकांसाठी त्यांनी निर्माण केलेली  संपत्ती आहे. 


      एक मुलगी म्हणून , मी त्यांना काय देऊ शकले, हा प्रश्न मला नेहमीच छळत आलेला  आहे .आता हा लेख, मी त्यांच्या हयातीत का लिहिला नाही, या प्रश्नाचाही समावेश या छळवादात झाला आहे.शेवटी बाबांचं श्रद्धास्थान असलेल्या ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे ,

 न्यूनते पुरते,

करुनि घ्येयावे तुम्हाते.

 विनवतु असे' .

 अशी बाबांना विनवणी करते. कारण आम्हा लेकरांमधली न्यूनता वडील समजून घेणार नाहीत असं घडू शकेल कधी??




#अध्यापनशास्त्रआणिपद्धती

#शैक्षणिकतत्वज्ञानआणिशैक्षणिकसमाजशास्त्र

#मराठीचेअध्यापन

#शैक्षणिकसमस्यांचाइतिहास

#Atestofliterarycreativity

#सर्जनशीलता

#शैक्षणिकपत्रकारिता

#शिक्षणोपनिषद

#शिक्षणसमिक्षा







Thursday, May 13, 2021

देव तारी त्याला कोण मारी


त्यादिवशी ओपीडीत बसले असताना, समोर एक मध्यमवयीन स्त्री येऊन उभी राहिली. तिच्या संपूर्ण चेहर्‍यावरुन हास्य ओसंडत होतं. आम्हा डॉक्टरांना दवाखान्यात येणाऱ्या पेशंटच्या चेहऱ्यावर  इतकं निर्मळ हास्य बघण्याची  सवय नसल्यानं मी क्षणभर दचकलेच आणि प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे बघू लागले.

' मला ओळखलं नाही मॅडम? मी शांताबाई भिसे -(नाव बदललंय) - बार्शीटाकळी. हा बघा माझा मुलगा. वीस वर्षाचा झालाय.' 

'शांताबाई भिसे ,बार्शीटाकळी' म्हणताक्षणी मेंदूत पटापटा दिवे लागले आणि सगळं लख्ख आठवलं.

' अगं काय शिकतो तुझा मुलगा? किती छान दिसतोय.' मी विचारलं. 

' मॅडम, काॕम्प्युटर चा डिप्लोमा घेतला आणि  आता नोकरी करतोय. अरे पाया पड मॅडमच्या'. हे शेवटचं वाक्य मुलासाठी होतं .

'अगं,किती वर्षाने भेटते आहेस तू?'- मी.

 थोडावेळ हालहवाल सांगून  शांताबाई निघून गेली. ती निघून गेली पण मी वीस वर्षांपूर्वीच्या त्या प्रसंगात जाऊन पोचले.                         

        वीस वर्षापूर्वी जेव्हा मी आरएमओ म्हणून काम करीत होते, तेव्हाचा हा एक विलक्षण अनुभव. काही काही अनुभव मनात पक्के  रुतून बसतात, त्यापैकीच हा एक.

 त्यावेळी मी हॉस्पिटलच्या क्वार्टरमधे राहत होते. आणि माझा विभाग म्हणजे प्रसुती विभाग . त्यामुळे रात्री ,बेरात्री, अवेळी वाॕर्डमधून कॉल येणं हे नेहमीचंच होतं. त्या दिवशीही असंच मध्यरात्री दोन वाजता दारावरच्या थापांनी आणि 'मॅडम- मॅडम' या हाकेने मी ताड्कन उठले. आताशा मला दारावरच्या थापांवरून पेशंटच्या परिस्थितीचा अंदाज येऊ लागला होता. कॉलबेल एकदाच  सौम्यपणे वाजली, की नुकत्याच हलके हलके कळा सुरू झालेली  पेशंट असणार. 

कॉलबेल न थांबता  वाजत राहिली, की पेशंट च्या प्रसूती कळा वाढलेल्या असणार. 

कॉलबेल न वाजवता दारावर जोरजोरात थापा पडू लागल्या, की - 'मॅडम, चला. पेशंटला टेबलवर घेतलं आहे' हा निरोप असणार. 

दारावर थापांबरोबरच हाका सुद्धा  असल्या, की नक्कीच काहीतरी इमर्जन्सी असणार.  

त्या रात्री तसंच झालं. मी ताड्कन उठून दार उघडलं. 'मॅडम, लवकर चला. पेशंटची रस्त्यात ऑटोतच डिलिव्हरी झाली. खूप ब्लीडिंग होतंय. पेशंट अर्धवट शुद्धीत आहे.' सिस्टर एका दमात बोलल्या.

'पेशंट रजिस्टर्ड आहे का?'- मी.

'हो.दोनवेळा येऊन गेलीय तपासायला'.- सिस्टर.

 'आणि बाळ कसं आहे  ग?'- मी चपला घालता घालता विचारलं. 'मॅडम, ते बाळ गेलेलंच होतं, असं त्या पेशंटची सासू आणि नवरा सांगताहेत.

 'गेलेलंच बाळ?' माझ्या मनात शंका आली. काय कारण असू शकेल?

'बाळ बघितलं तुम्ही?'

'नाही मॕडम.ते गेलेलंच आहे म्हणून ......'

हे बोलणं होईपर्यत पर्यंत आम्ही वाॕर्ड मध्ये पोचलो.

पेशंटचे नातेवाईक डोक्याला हात लावून बसलेले दिसले.पेशंटला बघूनच त्यांच्याशी बोलायचं ठरवलं .  आत टेबलवर शांताबाईला झोपवलं होतं. सगळी  साडी रक्ताने भिजली होती. माझ्या  हाऊस ऑफिसरने बीपी,पल्स बघून सलाईनची तयारी करुन ठेवली होती.  

'शांताबाई , कसं वाटतंय आता?काय त्रास  होतोय?' - तिच्या डोक्यावर थोपटत,नाडीवर हात ठेवत,तिचे डोळे बघून तिच्या हिमोग्लोबिनचा अंदाज घेत, तिला विचारलं.  अर्धवट डोळे उघडणं - एवढाच तिचा प्रतिसाद होता. रस्त्यात होणारी डिलिव्हरी आणि त्यानंतर होणारा रक्तस्त्राव घेऊन येणारा पेशंट  आम्हाला नवीन नव्हता. एक तर, अशा वेळेला प्रसूती मार्ग वेडावाकडा फाटला जातो किंवा प्लॕसेंटा चा एखादा तुकडा  गर्भाशयातच  राहतो. ही दोन मुख्य कारणं रक्तस्रावाची असू शकतात. शांताबाईचं  यापैकीच एक कारण असावं हा माझा अंदाज  होता. पण त्याआधी  तब्येत गंभीर असल्याची लेखी संमती ,आयव्ही सलाईन लावून तिचं पल्स, बीपी नॉर्मल च्या जवळपास आणणं - हे आणि बरेच काही सोपस्कार महत्त्वाचे असतात.  सगळ्या  स्टाफला ही कामं सरावाची असल्यानं,ती लगेचच हातावेगळी झाली. मला प्रामुख्याने रक्तस्त्रावाचं कारण  शोधायचं होतं. सिस्टर ने पेशंट स्वच्छ केल्यावर मी तपासलं तेव्हा तिचा प्रसूती मार्ग  वेडावाकडा फाटलेला आहे, हे लक्षात आलं. त्यासाठी आत पर्यंत व्यवस्थित टाके घालणं आणि ॲनस्थेशिया आवश्यक होता. स्टाफला सगळ्या सूचना देऊन तयारी करण्यास सांगितलं आणि ॲनस्थेटिस्ट ला फोन केला. परत एकदा पेशंटची  अवस्था बघितली आणि ती आपल्या आटोक्यात येणारी आहे हे लक्षात आल्यामुळे जवळजवळ १०मिनीटांनी एक शांत आणि  दीर्घ श्वास घेतला.  

 मी तिच्या नातेवाईकांशी बोलायला बाहेर आले.सासू आणि नवरा खूप  घाबरले होते. तिच्या तब्येतीविषयी सगळी कल्पना तिच्या नवऱ्याला आणि सासूला दिल्यावर  मी बाळाबद्दल चौकशी करु लागले.

' बाळ पूर्ण दिवसाचं होतं की  अपुऱ्या दिवसाचं?आणि ते पोटातच गेलं  होतं की जन्म झाल्यावर लगेच गेलं?आॕटोमधे डिलीव्हरी झाल्यावर कुठे लागलं होतं का बाळाला?'

' मॅडम डिलीव्हरी कधी झाली हे पण समजलं नाही. बार्शीटाकळीहून आॕटोत बसलो.रस्त्याने अंधार होता.शांताची शुद्ध  हरपली म्हणून तिला आम्ही आडवं केलं तेव्हा लक्षात आलं. बाळाचा रडायचा आवाज पण आला नाही. बाळ निपचित होतं. श्वासही घेत नव्हतं. म्हणून आम्हाला वाटलं पोटातच गेलं असेल'.- सासू .

'बाई,तुम्ही बाळ दाखवा बरं'- असं म्हणताच  तिचा नवरा ऑटो जवळ गेला आणि एक कापडी पिशवी घेऊन आला. त्या पिशवीत त्यांनी त्या बाळाचं मुटकुळं ठेवलं होतं. ती पिशवी  बघून मला अक्षरशः ढवळून आलं. सिस्टरने ते बाळाचं गाठोडं बेबी ट्रे मधे ठेवलं.त्याला वरवर पुसून स्वच्छ केलं. पांढरंफट्ट पडलेलं, निपचित झालेलं पण  गुटगुटीत असलेलं बाळ बघून मनातला शंकासुर जागा झाला. बाळाच्या मृत्यूचं नेमकं काय कारण असावं??

       मी सहज त्याच्या छातीवर हात ठेवला. त्या थंडगार स्पर्शाने अंगावर काटा आला. पण  क्षणभरातच त्याच्या हृदयाचा एक मंद ठोका मला जाणवला आणि माझ्या छातीचे ठोके वाढले.स्टेथोने आणखी दोन क्षीण ठोके मला ऐकू आले आणि .........'सिस्टर' - मी जोरात  ओरडले . माझ्या ओरडण्याने  सिस्टर आणि हाऊस ऑफिसर काय समजायचं ते समजल्या. बाळाला उलटं पकडणं, त्याचं सक्शन करणं,त्याच्या पोट/पाठीवर थंड/गरम पाण्याचे सपकारे मारणं, त्याला ऑक्सीजन लावणं, आणि आवश्यक ती इंजेक्शन देणं - - या सगळ्या स्टेप्स आम्ही भराभरा करायला सुरुवात केली आणि लगेच जवळ असणाऱ्या एनआयसीयु मधे  फोन करुन कल्पना देऊन ठेवली. सातव्या मिनिटाला त्या बाळाचा रंग बदलायला लागला. बाळाचे पंजे गुलाबी दिसायला लागले. त्याची छातीची धडधड क्षीण का होईना पण  सुरू झाली. आणि बाळाने डोळे अर्धवट उघडले. बाळाचा सकारात्मक प्रतिसाद बघून त्या बाळाला व्यवस्थित दुपट्यात गुंडाळून एनआयसीयुत भरती करण्यासाठी  नातेवाईकांच्या  सुपूर्द केलं. एनआयसीयु मध्ये  लगेच त्याची ट्रीटमेंट ही सुरू झाली. तोपर्यंत अॕनस्थेटिस्ट आले. पेशंटला व्यवस्थित टाके घातले गेले ज्यामुळे  रक्तस्त्राव नियंत्रित झाला. आणि सलाईन सुरु असल्यामुळे शांताबाई ची तब्येत व्यवस्थित होऊ लागली . हे सगळं आटोपेपर्यंत सकाळचे सहा वाजले . एनआयसीयु मधून निरोप आला की बाळाचा धोका अजून टळलेला नाही. पण आशा आहे की ट्रीटमेंटला  चांगला प्रतिसाद मिळेल. आणि तेव्हा कुठे आम्ही सगळे आमच्या नॉर्मल स्थितीमध्ये आलो.

     संध्याकाळपर्यंत बाळ आणि बाळंतीण व्यवस्थित झाले. बाळाला पाच दिवस एनआयसीयु  मध्ये ठेवून मग त्याला सुट्टी दिली.आता मला  भीती ही होती की जन्मानंतर बराच वेळ बाळ रडलं नाही. त्यामुळे त्याच्या मेंदूवर सूज येऊन सेरेब्रल पाल्सी होईल की काही व्यंग निर्माण होईल का? पण याचं उत्तर काळाच्याच हातात होतं. बाळ तर वाचलं होतं .त्यानंतर जवळ जवळ वर्षभर, शांताबाई दर महिन्याला बाळाला घेऊन तपासायला येत असे. त्या वर्षभरात बाळाची वाढ व्यवस्थित होती. नंतर मात्र शांताबाई  कधीच आली नाही. आणि परवा  तो वीस वर्षाचा धडधाकट  मुलगा बघून मला अक्षरशः  भरून आलं. त्यावेळी त्या नातेवाईकांवर विश्वास ठेवून मूल गेलेलंच आहे या समजूतीत मी बाळाला मी हातही लावला नसता तर???

पण "देव तारी त्याला कोण मारी" हेच खरं.त्या मुलाच्या आयुष्याची दोरी बळकट होती  म्हणून देवानं मला त्याला हात लावून तपासण्याची बुद्धी दिली असंच म्हणावं लागेल.

Sunday, April 25, 2021

मनाचा आहार' - आयुर्वेदाची अभिनव संकल्पना

 ' मनाचा आहार' - आयुर्वेदाची    अभिनव संकल्पना 


देहाच्या आहाराबद्दल आपण फार जागरूक असतो. रोज सकाळी उठून न्याहारी , दोन्ही वेळच्या जेवणाचं पद्धतशीर नियोजन आपण करतो. भोजनातल्या पदार्थांमधे  वैविध्य, चव, स्वाद कसा निर्माण होईल याची आपण दक्षता  घेतो. काही आजार झाल्यास लगेच खाण्या-पिण्यात बदल करतो. अपचन झाल्यास हलके भोजन, सर्दी खोकला झाल्यास आंबट,थंड वर्ज्य करतो. डायबिटीस असल्यास शुगर फ्री भोजन..... हे सगळं आपण निगुतीने करतो. पण मग आपल्या शरीरात सर्वशक्तिमान आणि अत्यंत क्रियाशील असणारं जे मन आहे त्याच्यासाठी आपण काय करतो??

    या मनाचा आहार आहे 'विचार' आणि 'भावना' . मग या विचार आणि भावनांचं प्रमाण आमच्या मनासाठी किती असावं, हे आपण कधी ठरवतो का???

   वाटेल तसे भावनांचे चढ-उतार आपल्या मनासाठी किती घातक आहे याचा विचार आपण करतो का ??

  'आज मी  चांगलेच विचार आणि सद्भावना हाच मनाचा आहार घेणार'- असं कधी ठरवतो का??

उपवासाच्या दिवशी कितीही  आवडता पदार्थ समोर आला तरी तो नाकारण्याचा निग्रह आपल्यात असतो. तसंच नकारात्मक विचार आणि वाईट भावना आपण कितीदा ठरवून आणि निग्रहाने नाकारतो?? आपण मनाला  कायम गृहीत धरलेलं असतं. या मनाला आयुर्वेदशास्त्रात 'सत्व' असंही म्हटलं आहे. शास्त्रानुसार 'प्रवर सत्व' , 'मध्यम सत्व' आणि 'अवर सत्व' हे मनाचे व्यवहारातले तीन प्रकार आहेत. शास्त्रामध्ये, रुग्ण  तपासणीसाठी आला की त्याची 'सत्वपरीक्षा' सुरुवातीलाच करण्याचे निर्देश दिले आहेत कारण त्यामुळे उपचार करण्याची दिशा आधीच निश्चित होते.

 प्रवर सत्व म्हणजे 

कोणत्याही परिस्थितीत संतुलित आणि स्थिर व्यक्तिमत्व असणारे,आजार व्यवस्थित समजून घेऊन उपचारांना पूर्ण सहकार्य करणारे,आजाराचा मनावर कोणताही वाईट परिणाम होऊ न देणारे आणि  सकारात्मकता आणि तीव्र इच्छाशक्ती असणारे असतात.

    मध्यम सत्व म्हणजे एरवी स्थिर आणि संतुलित ,पण प्रतिकूल परिस्थितीत अवसान गळणारे,आजाराची सतत चिंता करणारे पण योग्य उपचार घेणारे , आजाराला मनात ठेवून गोंजारणारे,  सकारात्मकता आणि इच्छाशक्ती साठी एखाद्या सपोर्ट सिस्टीम वर अवलंबून असणारे असतात . 

     अवर सत्व म्हणजे 

नेहमीच अस्थिर आणि शंकेखोर व्यक्तिमत्व ,आजार आहे त्यापेक्षा अधिक गंभीर  भासवणारे,कायम आजाराचे रडगाणे गात राहणे व उपचारांवर अविश्वास दाखवणारे, नकारात्मक प्रवृत्ती आणि इच्छाशक्तीचा अभाव असणारे असतात .

   आता यापैकी आपण कोणत्या प्रकारात मोडतो याचं परिक्षण करणं ही पहिली पायरी. कुटुंबातील प्रत्येकाचं सत्व एकदा समजलं की त्यानुसार विचारांचा आणि भावनांचा आहार ठरवायचा.

 प्रवर सत्वाचे रुग्ण जीवघेण्या आजारातूनही सहज बरे होतात.पण  कधीकधी अति आत्मविश्वासामुळे.....'मला काहीही होणार नाही'...अशी बेफिकिरी त्यांच्यात असते.अशावेळी त्यांना  तर्कशुद्ध विचारांचा आहार  योग्य मात्रेत देणं गरजेचं असतं.

 मध्यम सत्वाच्या रुग्णांना मनोबल टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.त्यांच्या आहारातून भीतीची भावना वर्ज्य करुन सकारात्मक विचार अधिक मात्रेत दिले तर मध्यम सत्वाच्या व्यक्ती  यशस्वी होतात. पण देहाचा आजार त्यांच्या मनात ठाण मांडून बसला असतो त्यामुळे आजाराचा एकही विचार आहारात नसणे- ही खबरदारी घेणं हे गरजेचं असतं.

 हीन सत्वाच्या रुग्णांना बरे होण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात- त्यांना स्वतःलाही आणि डॉक्टरांनाही. देह निरोगी असला तरी त्यांचं मन आजारीच असतं. त्यांची नकारात्मक वृत्ती ही व्याधीमुक्ती मधला महत्वाचा अडथळा असतो.त्यामुळे सकारात्मक,आश्वासक विचार, आणि सुरक्षित भावना यांचा  रतीबच त्यांच्या आहारात ठेवावा लागतो.

    व्याधी निर्माण होण्याचं पहिलं सामान्य कारण 'असात्म्येंद्रियार्थसंयोग' यावर मागील लेखात आपण चर्चा केली आहे- जी इंद्रियांशी संबंधित आहे. आता शास्त्रात सांगितलेलं, दुसरं सामान्य कारण म्हणजे 'प्रज्ञापराध'. आता प्रज्ञा म्हणजे काय? तर प्रज्ञा म्हणजे ज्ञान अधिक शहाणपणा.( इंटेलिजन्स आणि  अंडरस्टँडिंग). ही प्रज्ञा ज्यावेळी बिघडते , त्यावेळी व्याधी निर्माण होण्याची दाट शक्‍यता असते.  आता हा प्रज्ञापराध नेमका कसा होतो???

   तर मनाच्या तीन वृत्ती असतात. 'धी', 'धृति' आणि 'स्मृती' .या तीन वृत्तींच्या योग्य समन्वयाने मन काम करीत असतं. 

 'धी' म्हणजे बुद्धी. 'जी निर्णय देते ती बुद्धी'- अशी बुद्धीची व्याख्या आहे. ज्यावेळेस 'धीभ्रंश' होतो त्यावेळी हितकर आणि अहितकर यातला फरक समजत नाही. काय नित्य  (परमनंट) आणि काय अनित्य (टेम्पररी) यातला फरक समजत नाही.आज समाजात कोविडचे नियम न पाळणारे सगळे 'धीभ्रंश झालेले आहेत त्यामुळे संसर्गाचा आलेख उंचावतोय.

 'धृती' म्हणजे धैर्य. 'धृतिभ्रंश' म्हणजे धीर सुटणं किंवा मनावर नियंत्रण न राहणं.आज कोविडमधून बरे होत असणाऱ्या रुग्णांचीही अचानक मृत्यू ची बातमी येते.हे सगळे 'धृतिभ्रंशाचे' रुग्ण असतात.

   'स्मृति' म्हणजे स्मरण किंवा अनुभव. स्मृतिभ्रंश म्हणजे ज्या उपयुक्त स्मरणीय बाबी आहेत त्या वेळेवर न आठवणं..  आज कोविडच्या बातम्या वाचताना,ऐकताना केवळ दुर्घटना लक्षात ठेवणं आणि रुग्ण बरे होण्याचा दर,लसीकरणाचे फायदे,ई. विसरणारे ८० टक्के लोक आहेत.अशांची मानसिक खंबीरता कमी होऊन ते सहजतेने कोणत्याही आजाराला बळी पडतात.अशा प्रकारे 'धीधृतीस्मृतिभ्रंश' झालेल्या समाजात व्याधि निर्मिती होणं अटळ असतं. त्यामुळे आज मनाचं आरोग्य व्यवस्थित राखणं ही पहिली प्राथमिकता आहे .आपलं स्वतःचं आणि  आपल्या कुटुंबीयांचं सत्व परीक्षण केल्यास नेमकी सुधारणा कुठे आणि कशी करायची आहे याची दिशा स्पष्ट होते. तसंच धी, धृती, स्मृती या मनाच्या वृत्ति उत्तम स्थितीत ठेवण्यासाठी, मनाच्या आहारावर नियंत्रण, उत्तम विचारांचा स्वीकार, संयमित भावना.... असा रोज मनासाठी मेनू ठरवणं आवश्यक आहे.  तर्कशुद्ध विचार आणि  सद्भावनांच्या आहारासाठी प्रार्थना ,योग,प्राणायाम,ध्यान जप,छंद,संगीत ,वाचन,सत्संग अशा कितीतरी पाककृती भारतीय संस्कृतीत आहेत ज्यामुळे मनाला संतुलित विचार ,भावनांचा आहार मिळतो . आपल्या  संस्कृतीतच सुदृढ आणि निरोगी मनाचं संवर्धन होण्याची व्यवस्था  आहे.येवढंच काय,आपल्या कुटुंबव्यवस्थेतील दैनंदिन आचरण देखिल मनासाठी कमालीचं  पोषक आहे . 

आणखी महत्वाचं म्हणजे ,आपलं मन दोन पद्धतीनं काम करतं.पहिलं म्हणजे इंद्रियांशी संलग्न  होऊन काम करणं.त्यामुळे आपल्याला वातावरणातील शब्द ,स्पर्श ,रुप,रस,गंधाचं ज्ञान  होतं.आता  इथे आपण चूक अशी करतो की इंद्रियांच्या आहारी जाऊन त्या मनाला कायम इंद्रियांसोबत गुंतवून ठेवतो.इंद्रियांवर तर अतिरेक होतोच परिणामी मनावरही नको तो आहार थोपविला जातो. 

मनाची काम करण्याची दुसरी पद्धत ही की मन जेव्हा  इंद्रियांपासून मुक्त असतं   त्यावेळी ते अत्यंत पद्धतशीर वागतं.चिन्त्य,विचार्य,ऊह्य,ध्येय आणि संकल्प या पायऱ्यांद्वारे मन निर्णयापर्यंत पोचत असतं.

चिन्त्य  म्हणजे विचारांची योग्य/अयोग्यता ठरविणे.विचार्य म्हणजे  तर्कानुसार त्या विचारांमुळे होणारी लाभ/हानी ठरविणे.ऊह्य म्हणजे उहापोह करुन शक्यतांचा विचार करणे.ध्येय म्हणजे गुण दोषांचा विचार करुन कोणती शक्यता ग्राह्य आहे हे ठरविणे आणि  संकल्प म्हणजे निर्णयाप्रत जाणे.इतकं सुसंगत असं आपल्या मनाचं साॕफ्टवेअर आहे.....अट हीच की ते इंद्रियांपासून मुक्त असावं.हे असं इंद्रिय निरपेक्ष मन अंगिकारणं व्यावहारिक दृष्ट्या कठीण असलं तरी अशक्य मात्र नक्कीच नाही.हा सवयीचा आणि अभ्यासाचा भाग आहे.या अभ्यासामुळे मन स्थिर,शांत  आणि सशक्त होतं.

पण आपल्याला आपल्याच अंतरंगात असणाऱ्या संपत्तीचं भानच नसतं. आपण  मनाला देतो कधी मुक्ती? उलट आज आम्ही आमच्या  मनाला विकृत विचारांचा आणि बटबटीत भावनांचा अति प्रमाणात आहार देऊन अजीर्णाची स्थिती निर्माण केलीय. त्यामुळे या कोविड महामारीत तर आपल्या विचार आणि भावनांना अक्षरशः चाळणी (फिल्टर्स) या लावायची वेळ आलीय. कोविडबाधितांची आकडेवारी रोज जाहीर होत असते.त्यावरून सांख्यिकीय निष्कर्ष काढले जातात. पण कोविडग्रस्त मनांची आकडेवारी कोण काढणार? कोविडबाधित मनाला कोणती टेस्ट लावणार? आजमितीला कोविडबाधित मनांची संख्या ही कोविड रुग्णांपेक्षा कितीतरी जास्त आहे,जे खरोखरच भयावह आहे. त्यामुळे आपल्या मनाला योग्य आहार देऊन त्याची शक्ती ,क्षमता वाढवणं  आणि योगसाधना, ध्यान, स्वसंवाद याद्वारे मनाला इंद्रियांपासून रोज अलग करण्याची जास्तीत जास्त सवय लावणं हे ही लसीकरणा इतकंच प्रभावी आहे यात शंकाच नाही.


#प्रज्ञापराध

#धीधृतिस्मृति

#धीधृतिस्मृतिभ्रंश

#प्रवरमध्यमअवरसत्व

#चिन्त्यविचार्यऊह्यध्येयसंकल्प

     

      

Sunday, April 18, 2021

आयुर्वेदातील अभिनव आहार संकल्पना

 आयुर्वेदातील  अभिनव  -   

       आहार संकल्पना

आज संपूर्ण जग कोविडच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी धडपड करीत आहे. आज आपलं आरोग्य ही आपली सर्वोच्च प्राथमिकता झाली आहे. इतकी वर्ष ...ज्या आरोग्याला गृहीत धरून, आम्ही वाटेल तसं स्वच्छंदी वागत होतो.... तेच आम्ही, आता या आरोग्याला जपण्यासाठी काहीही करायला तयार आहोत. हल्ली माझ्या दवाखान्यात कोणत्याही रुग्णाचा हमखास एक प्रश्न असतो,

" मॅडम आहार कसा असावा जेणेकरून आम्हाला कोणतेही आजार  होणार नाहीत?" सोशल मिडीयाद्वारे इम्युनिटी किंवा व्याधी प्रतिकारक्षमता अबाधित ठेवणाऱ्या वेगवेगळ्या आहार/ डाएट च्या माहितीचा  दररोज रतीब असतो.' हाय प्रोटीन', 'लो कार्ब', ' फायबर रिच' , 'शुगर फ्री', क्रॕश डाएट.....असे वेगवेगळे डाएट्स आपल्याला तंदुरुस्त ठेवण्याची हमी देत असतात .पण  काटेकोर आहार आणि नियमित व्यायाम हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे का???

याशिवाय कितीतरी अशा गोष्टी आहेत,ज्यांचा आपल्या आरोग्यावर साधक-बाधक परिणाम  होत असतो . इथे आपल्याला मदत करतं ते आयुर्वेदशास्त्र. कारण आयुर्वेद हा व्याधींचा नाही तर आयुष्याचा वेद आहे .

    मुळात आहार संकल्पना - ही 'भोजन' या क्रियेशीच संबंधित आहे हा आपल्या  सगळ्यांचा गैरसमज आहे. आयुर्वेदाच्या आहार संकल्पनेचा विचार केला तर आपला  आजवर किती संकुचित विचारांचा दृष्टिकोन  होता हे स्पष्ट होईल. 

शरीराचं पोषण, वाढ करणारा - -तो आहार. ही आहाराची साधी ,सोपी व्याख्या.  बाह्य सृष्टीतून शरीर पोषणासाठी ,शरीराच्या आत जे जे काही आहरण केलं जातं ते म्हणजे आहार---ही आहाराची शास्त्रीय व्याख्या .

आता आयुर्वेदानुसार 'शरीर' म्हणजे काय?

 देह, इंद्रिये, मन व आत्मा यांचा समुदाय म्हणजे शरीर.

 देहाचा आहार म्हणजे अन्न पाणी आणि हवा.

 इंद्रियांचा  म्हणजेच कान, त्वचा, डोळे, जीभ, आणि नाक यांचा आहार  (विषय / अर्थ/ senses). म्हणजेच - शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध.

 मनाचा आहार -विचार आणि भावना.

 आत्म्याचा आहार- करुणा आणि सहसंवेदना.(compassion ).

आता आजवर, आहार म्हणजे केवळ  भोजन ही समजूत किती एकांगी आणि चुकीची  आहे हे स्पष्ट व्हायला हरकत नसावी .  या सर्वांगीण आहाराचा - अर्थातच देह,इंद्रिये ,मन आणि  आत्मा यांच्या योग्य आणि संतुलित आहाराचा आरोग्याशी अत्यंत जवळचा संबंध  आहे.आम्ही फक्त आणि फक्त भोजनाला आरोग्याशी जोडतो आणि 'चांगलंचुंगलं' खाऊनही आजार का होतात यावरुन डाॕक्टरांशी वाद घालतो. 

या लेखात आपण इंद्रियांच्या आहाराविषयी चर्चा करणार आहोत . इंद्रियांद्वारे आपण वेगवेगळी  माहिती मेंदूत साठवत असतो पण हाच इंद्रियांचा आहार आहे याबद्दल आपण पूर्णपणे  अनभिज्ञ असतो. माणसाचा जन्म होता क्षणी बाह्य वातावरणाशी त्याचा संबंध येतो - तो त्वचेच्या माध्यमातून. म्हणजेच स्पर्शनेन्द्रिय. त्यानंतर लगेच जिभेचं- रसनेन्द्रियाचं काम सुरू होतं.  मूल मोठं होतं जातं तसतसे  डोळे आणि कान सक्रीय  होऊ लागतात .म्हणजे त्या लहान बाळाच्या प्रत्यक्ष भोजनापेक्षा (दुध)  इंद्रियांच्या आहाराचं प्रमाण बरंच जास्त असतं. बाह्य वातावरणाचा जास्तीत जास्त परिणाम किंवा दुष्परिणाम होणारे शरीर घटक कोणते तर ती इंद्रिये आहेत. अविरतपणे शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हा आहार आपली इंद्रिये ग्रहण करीत असतात. अगदी झोपेत सुद्धा ही इंद्रियबुद्धी जागृत असते. 

    देहाचा आहार म्हणजे हवा, पाणी, अन्न हा मर्यादित प्रमाणात असतो. श्वासाद्वारे हवेचं ग्रहण निरंतर असलं तरी ते नियंत्रित स्वरुपात असतं पण इंद्रियांचा आहार हा अनियंत्रित आणि  अमर्यादित असतो. म्हणूनच माणसाच्या आयुष्यात इंद्रियांचं आयुष्य कमी असतं. इतर शरीर घटकांच्या तुलनेत इंद्रिये ही लवकर कमकुवत होतात. म्हणूनच उपनिषदात, वेदात "जीवेत शरदः शतम्" असं म्हटल्यानंतर,

" पश्येम शरदः शतम्  

श्रुणुयाम शरदः शतम् "

अशी प्रार्थना केलेली आहे. यातूनच इंद्रियांची योग्य जपणूक व्हावी हे अधोरेखित होतं.      भोजन घेतल्यानंतर त्यावर जाठराग्नी चे सोपस्कार होऊन पचन होत असतं ,जे आपल्याला समजतही नाही.  पण इंद्रियांद्वारे जाणता-अजाणता, आवश्यक- अनावश्यक, चांगली- वाईट, उपयुक्त -घातक अशी माहिती सतत ग्रहण केली जात असते. हल्लीच्या काळात तर या इंद्रियांचे विषय अक्षरशः शरीरावर बदाबदा कोसळत असतात. अशावेळी मन आणि बुद्धीचे त्यावर योग्य सोपस्कार आणि संस्कार  झाले नाहीत तर परिस्थिती गंभीर व्हायला वेळ लागत नाही. आपण स्वतः याबाबतीत जाणीवपूर्वक काही करतो का? अजिबात नाही. उलट लहान बाळांना-  ज्यांचं मन म्हणजे  ओल्या मातीचा गोळा असतो आणि ज्यांची बुद्धी  अद्याप प्रगत झाली नसते - - अशा बाळांना त्यांच्या  सहाव्या, सातव्या महिन्यापासून टीव्ही, व्हिडिओ दाखवायला सुरुवात करतो. बाळही ते बघताना रमून जातं आणि त्याची त्याला चटक लागते. आणि आमचं बाळ आत्तापासून कसं 'टेक्नो ' आहे हे भूषण आम्हाला वाटतं. स्वतःवर   आपण नियंत्रण ठेवतच नाही आणि कहर म्हणजे लहान बाळांना ही त्याची सवय लावतो.

    पूर्वीच्या काळी दृक्श्राव्य माध्यमं अस्तित्वात नव्हती आणि माणसाचं जगणं हे नैसर्गिक असल्याने इंद्रिये आपोआपच नियंत्रणात होती. पण आज परिस्थिती बदलली आहे .माध्यम आणि तंत्रज्ञानाचा गुलाम असल्याप्रमाणे आज आपण बुद्धी गहाण ठेवून वागतो आहोत. पण इंद्रियांच्या या अतिवापराने नेमकं घडतं काय???

 आयुर्वेदात व्याधी निर्मितीची अगदी प्राथमिक आणि सामान्य कारणं सांगताना ,अगदी पहिलं कारण सांगितलं आहे ते म्हणजे 'असात्म्यइंद्रियार्थसंयोग '. म्हणजेच - - -

असात्म्य- म्हणजे न पटणारं, सहन न होणारं, विकृत, सवय नसणारं

 इंद्रियार्थ - म्हणजे इंद्रियांच्या जाणिवा (senses) म्हणजेच शब्द ,स्पर्श, रूप, रस, गंध. आणि संयोग म्हणजे या अनावश्यक घातक विषयांचा इंद्रियांशी सतत येणारा संबंध . घातक, विकृत, अनैसर्गिक विषयांचा  इंद्रियांशी सतत संयोग होत असेल तर व्याधि निर्मितीचं ते अत्यंत महत्त्वाचं कारण असतं. आयुर्वेद शिकताना दुसऱ्याच वर्षी हा संदर्भ आमच्या समोर येतो.  विद्यार्थीदशेत गंमत वाटायची की आजारी पडण्यासाठी अशी  सुद्धा कारणं असू शकतात? पण आज   जेव्हा उत्तम संतुलित भोजन, नियमित व्यायाम आणि सगळ्या तपासण्यांमध्ये 'क्लिनचीट' मिळालेल्या व्यक्तीही आजारी पडताना दिसतात तेव्हा 'असात्म्येंद्रियार्थसंयोग' खुणावू लागतो. कारण इंद्रियांच्या आहाराचं आपण कधीच नियोजन केलं नसतं आणि तो ग्रहण करताना आपल्याला नीरक्षीरविवेकही नसतो .आज जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोविड महामारीला प्रतिकार करताना नेमका हा 'असात्म्येंद्रियार्थसंयोग'  कसा आणि किती कारणीभूत ठरतो आहे हे लक्षात आलंच असेल. शरीराला व्याधींपासून सुरक्षित ठेवण्यासाठी नाक, त्वचा आणि जिभेचा आपापल्या विषयांशी/ अर्थांंशी अकारण,अवाजवी,  अजाणता संयोग व्हायला नको ही कोविडने जगभराला शिकवण दिली जी आयुर्वेदशास्त्रात पाच हजार वर्षांपूर्वी ग्रंथात लिहून ठेवली आहे. तसंच कानाने व डोळ्याने अनावश्यक ,अतिरंजित ,असत्य आणि अति प्रमाणात माहिती ऐकणं, वाचणं, ती दुसऱ्याला सांगणं हे मानसिक आजाराचं प्राथमिक कारण आहे. आज कान आणि डोळ्यांवर अतिरेकी माहितीचा ताण आल्यामुळे नैराश्यात जाणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसागणिक वाढते आहे ही वस्तुस्थिती आहे. हे सगळं किती भयावह आहे. जे उपाय अत्यंत साधे, सोपे, आपल्या आवाक्यातले आणि निःशुल्क आहेत ते पाळण्याचंही भान आपल्याला राहिलेलं नाही. 

रोज आपण डोळ्यांनी आणि कानांनी किती अनावश्यक आणि घातक माहिती मेंदूत साठवत असतो याचा हिशोब करण्याची  वेळ आता आलीय.रोजच्या जेवणाचा मेन्यू जसा ठरवला जातो तसंच काय आणि किती बघायचं,ऐकायचं हे ठरवणं आपल्याच हातात आहे.या मेन्यूत सकारात्मक, ज्ञानवर्धक,आनंददायक माहितीचीच निवड केली तर त्या आहारानं नक्कीच शरीराचं पोषण होईल.

जिव्हालौल्य तर आपल्या जिव्हाळ्याचा विषय.कोविडमुळे बाहेरच्या खाण्यापिण्यावर बंधन  आलंय ही तर इष्टापत्तीच आहे.जिभेचे चोचले आणि गरज यातला फरक समजून रिजनल,सीझनल,आणि ओरिजीनल खाद्यपदार्थ खाण्याची सवय नक्कीच आरोग्यपूर्ण ठरेल यात शंका नाही.

कृत्रिम गंध जितके टाळता येतील तेवढं उत्तम .डिओ, रुम फ्रेशनर्स,उदबत्या,कॉस्मेटिक्स इ.पासून दूरच राहणं योग्य.तसंही मास्क हा एक उत्तम पर्याय आहेच.

जिथे गरज नाही तिथे स्पर्श करायचा नाही हे ही कोविडनंच शिकवलंय आणि ही सवय नेहमीच असावी.तसंही ऊठसूठ 'शेकहँड ' आणि 'हग' करण्याची आपली संस्कृती नाहीच.

थोडक्यात काय,इंद्रियांचा योग्य 'उपयोग' करावा.'उपभोगासाठी' त्यांचा 'वापर' होऊ नये - इतकं सोपं पण तितकंच अवघड तत्त्व आहे हे.

     आपल्या प्राचीन परंतु समृद्ध अशा आयुर्वेद शास्त्राने दिलेले इशारे अप्रगत, अवैज्ञानिक, जुनेपुराणे ठरवून तंत्रज्ञानाच्या आहारी जाणं कितपत संयुक्तिक आहे याचा आता तरी गंभीरपणे विचार होणं आवश्यक आहे. आज कोविडमुळे आधुनिक वैद्यकीय शास्त्रालाही कोडी पडली आहेत.अनेक घटनांचा कार्यकारणभाव वैज्ञानिक कसोट्यांवर बसवता येत नाहीय.अशावेळी विज्ञानाच्या पलिकडचं सत्य आयुर्वेदाच्या मदतीनं नक्कीच गवसू शकतं. आयुर्वेदात अनेक अमूल्य असे सिद्धांत आहेत ज्यामुळे समाज निरोगी होऊ शकतो. पण प्रश्न विश्वासाचा आहे ,प्रश्न समाज मान्यतेचा आहे , प्रश्न नीरक्षीर विवेकाचा आहे.

इंद्रियांच्या अतिरेकी आहाराचं नियोजन प्रत्येकानं 'मनन', 'चिंतन', 'आकलन' आणि 'अवलंबन' या पायऱ्यांनी केलं तर लसीकरणाइतकाच फायदा होईल याची खात्री आहे.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

डाॕ साधना कुळकर्णी,अकोला

9422939510

Wednesday, April 14, 2021

 थोडंसं खटकलेलं.......

 मी रोज सकाळी ६ वाजता फिरायला जात असते. माझ्या फिरण्याच्या  रस्त्यावर श्री गजाननमहाराजांचं मंदिर आहे. तिथे दर्शनासाठी मी  हमखास थांबतेच. तिथे ठराविक भक्त मंडळी आरतीसाठी जमली असतात . तीन मध्यमवयीन महिला तिथे न चुकता असतातच. त्यापैकी एक महिला खूप व्यवस्थित तयार झालेली असते.  रोज नवीन साडी, मॅचिंग बांगड्या,मॕचिंग हेअर क्लिप, हलकासा मेकअप. सगळं अगदी नीटनेटकं आणि टापटीप.  ती महिला मारवाडी असावी असं समजून मी तिचं अग्रवाल भाभी हे नावही ठेवलेलं आहे. तिच्या दोघी मैत्रिणी अगदी साध्या असतात.  त्यांची खूप घट्ट मैत्री आहे असा माझा अंदाज आहे कारण   गेल्या वर्षभरापासून मी  रोज त्यांना बघतेय आणि  त्यांचे काही ना काही संवाद कानावर  पडत असतात . मला त्यांच्या मैत्रीचं  खूप अप्रूप वाटतं. दुसरं म्हणजे अग्रवाल भाभींचं प्रचंड कौतुक वाटतं. इतक्या पहाटे इतकं व्यवस्थित तयार होऊन निघणं, सात जन्मातही  माझ्याकडून होणार नाही. किंबहुना अग्रवाल भाभींकडे बघताना मला माझ्या 'अवताराची' प्रकर्षानं जाणीव होते. सकाळी उठल्यावर तोंडावर मारलेलं पाणी, केसांवरून फिरवलेला हात- (कंगवा नाही), आणि समोर दिसणारा कोणताही कुर्ता चढवला की माझी तयारी पूर्ण होते. नाही म्हणायला, अधून मधून, चांगलं तयार होऊन फिरायला जाण्याचे संकल्प असतातही माझे.... पण सकाळी ते रीतसर ढासळतातच. असो. तर रोज भेटूनही, आमची ओळख फक्त 'स्माईल' पर्यंतच होती कारण मी नेहमी घाईत. आणि त्या तिघीजणी मस्त निवांत.

     परवा मात्र अग्रवाल भाभींची  साडी मला फारच आवडली. न राहवून मी त्यांच्याजवळ जाऊन म्हटलं ,

  'भाभी मी रोज तुमच्या कडे बघते. खरंच, खूप सुरेख साड्या असतात तुमच्या .आणि तुम्ही किती व्यवस्थित तयार झालेल्या  असता. मस्त वाटतं तुम्हाला बघून.'

     मी बोलत होते आणि माझ्या शब्दागणिक अग्रवाल भाभींचा चेहरा आनंदाने फुलत चालला होता. माझ्या बोलण्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांनी ओठांची हालचाल केली तोच त्यांच्या दोन मैत्रिणी  हसत हसत म्हणाल्या,

 ' तिला काय काम आहेत घरी? नुसती बसली असते. इकडची काडी तिकडेही करत नाही. सुना आहेत कामं करायला. रात्रीच, उद्याची साडी , बांगड्या, क्लिप, पर्स काढून ठेवते. तुमच्या माझ्यासारखी मरमर कुठे  करावी लागते तिला घरात?'

  माझ्या रोजच्या  अवतारावरून 'मरमर' हा शब्द त्यांना सुचला असणार नक्कीच .असो.पण  त्या बोलत असतांना अग्रवाल भाभींच्या चेहऱ्यावरुन, आनंद अक्षरशः झरझर उतरतांना मी बघितला.

यावर मी फक्त हसले आणि  माझ्या दिशेने चालू लागले . पण  भाभींचा तो उतरलेला चेहेरा माझ्या  डोळ्यासमोरुन जाईना.    मी त्यांना तशी परिचित नव्हते. त्यांच्या  घरगुती बाबींमधे मला काडीचाही रस नव्हता.माझ्या अगदीच वरवरच्या पण अस्सल प्रतिक्रियेवर त्या दोन्ही मैत्रिणींनी फक्त दुजोरा दिला असता तर काय हरकत होती? 

   जवळच्या-मैत्रिणींमध्ये चिडवणं, थट्टा करणं हे अपेक्षित असतं अणि त्या मैत्रिणी गंमतीनंच ते बोलल्या असाव्यात .भाभींनीही ते बोलणं मजेतच घेतलं असणार.

  पण  एखाद्याला सहजपणे ,अगदी चिमूटभर आनंद मिळत असेल तर त्यावर विरजण घातलंच पाहिजे का?असं विरजण घेऊन फिरणार्या भरपूर व्यक्ती आपल्या आसपास असतात मात्र त्याची जाणीव त्यांना स्वतःलाही नसते. आपण करत नसलेली  एखादी  चांगली कृती दुसरा कुणी करत असेल तर त्याचं कौतुक  करण्याची पद्धतच आपल्यात नाही.उलट ती चांगली कृती करण्यासाठी दुसऱ्या कडे कशी अनुकूल परिस्थिती आहे आणि त्याने ती चांगली कृती करणं म्हणजे 'फार काही विशेष नाही'...असं बेधडक म्हणताना आम्ही काहीही विचार करत नाही. 

आम्हा प्राध्यापकांची हल्ली बरीच प्रशिक्षणं होत असतात.त्यात स्वतःचं आणि सहकारी प्राध्यापकांचं मूल्यमापन करण्याचे अनेक प्रसंग येतात.अशावेळी बोलतांना सुरुवातीला सकारात्मकच बाजू मांडायची व नंतर नकारात्मक बाजूचं मूल्यमापन करायचं अशा कडक सूचना आम्हाला असतात.म्हणजे कोणत्याही व्यक्तीबद्दल व्यक्त होताना आधी सकारात्मक चष्मा लावण्याचा तो धडा असतो.दुर्दैवानं समाजात तसं घडत नाही आणि  

  त्या दिवशी अग्रवाल भाभींचा उतरलेला चेहेरा बघून मला ही वृत्ती प्रकर्षाने  खटकली , एवढंच.........

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...